‘मोने’गिरी

  •  शिरीष कणेकर

रममित्र संजय मोने याचे वर्षावर्षात नखही दिसत नाही (कुठं नखं कापतो कोण जाणे! हे काम तो त्याच्या नाटकाच्या व चित्रपटाच्या दिग्दर्शकांना सांगत असावा. कापलेली (वाघ)नखं नायिकेच्या घरात टाकायला तो कोणाला सांगत असेल?) त्याच्या न्हाणीघरात बादलीच्या मागे दडी मारून बसलं तरच त्याचं अभ्यंगदर्शन होऊ शकेल. तुमची बाथरूमपर्यंत येण्याची तयारी आहे हे कळलं तर तो महिनोन् महिने आंघोळही करणार नाही. आंघोळही तो कपडे घालूनच करत असणार. ‘दुनिया के बाजार में अपना ढोल बजाते जा’ हे गाणं त्याला पाहूनच लिहिलं गेलं असलं पाहिजे. मध्यंतरी तो भय्ये लोकांसारखा शेमला अंगावर बाळगायचा. तो शेमला तो हाफ पँटीत शर्टासारखा खोचायचा व खालून गुडघ्यापाशी बाहेर काढायचा. जाणाऱ्या येणाऱ्यांना आपण नक्की काय बघतोय तेच कळत नसे. संजयचं ‘शेमला’ प्रकरण यशस्वी झाल्याचं हे द्योतक होतं हीदेखील ‘फेज’ आम्ही ‘फेस’ केली.

संजय मोनेला समजा माहीमहून दादरला जायचं असेल तर तो व्हाया कणकवली जाऊ शकतो. त्यावरही त्याच्याकडे त्याच्या मते बिनतोड असं स्पष्टीकरण असतं. तो म्हणेल, ‘‘काय आहे माहित्येय का, कणकवली स्टेशनच्या समोर एक छोटंसं हॉटेल आहे. ते आहे हिंदूच्या मालकीचं, पण मुसलमान चालवतो. त्याचं नाव सुलतान अहमद. त्याची भावंडं मात्र जोशी आडनाव लावतात. या हॉटेलात तळलेला बांगडा जसा मिळतो तसा आलम दुनियेत कुठं मिळत नाही. तसा ऍमस्टरडॅमला मिळायचा, पण ते हॉटेल आता बंद पडलंय. तिथं लॉण्ड्री आल्येय. तर मी असा विचार केला की, कणकवलीला जाऊन तो बांगडा खावा व तिथून दादरला जावं. दादरला फार महत्त्वाचं काम होतं माझं…’’

यावर तोंडातून ‘ब्र’ काढण्याएवढी माझ्यात तरी ताकद नव्हती. ‘‘नथिंग इज इम्पॉसिबल’’ असं नेपोलियन म्हणाला असेलही, पण ते संजयला बघूनच म्हणाला ना? एकदा इराण्याकडे अड्ड्यावर संजय म्हणाला की, पुण्यात अमुक एका ठिकाणी काकी शहा नावाची महिला बेकायदेशीररीत्या शरीरविक्रीचा व्यवसाय करते. आम्ही मान वळवून, ओठ मुरडून ‘बंडल-बंडल’ या अर्थी छद्मीपणे हसलो. काकी शहा हे नावही टिपिकल संजयच्या खोपडीतून निघाल्यासारखं वाटत होतं. ‘आता मी काय करू’, या अर्थी संजयनं दोन्ही हात पसरले. त्यानंतर काही महिन्यांनी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पेपरात वाचलं – ‘वेश्याव्यवसाय केल्याबद्दल पुण्यात काकी शहाला अटक.’ कितव्यांदा तरी संजयनं आमचे दात आमच्या घशात घातले होते. त्यामुळे महंमद रफीच्या चुलतभावानं संजयच्या घरात हेमंत कुमारची गाणी म्हटली असं संजय म्हणाला तेव्हा त्याला खोटं पाडण्याइतकं त्राण माझ्या गात्रांत शिल्लक नव्हतं. असेल बाबा, गायलाही असेल…

‘‘पुण्यात प्रभात रोडवर एक जुना वाडा आहे.’’ इति संजय उवाच. ‘‘त्याचं नाव आहे ‘टणक वास.’’ जाणारे येणारे पुण्याचेच असल्यानं ते त्या वाड्याकडे व त्याच्यावरील नावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. बाहेरगावाहून आलेल्या एका माणसाचं त्या नावाकडे लक्ष गेलं व तो चक्रावून गेला. ‘टणक वास’ हे कसलं नाव? कुतूहल अनावर होऊन चौकशी करण्यासाठी न राहवून त्यानं दारावरची बेल दाबली. आश्चर्य म्हणजे ती वाजली. आताला म्हातारा शिव्या देत उठला व त्यानं केवळ पुणेकरच विचारू शकतात असे खेकसून विचारले, ‘‘काय हवंय?’’

‘‘नाही, हे तुमच्या वाड्याचं नाव कळलं नाही.’’

‘‘अनेक गोष्टी आपल्याला कळत नाहीत.’’ म्हातारा चरफडला ‘‘लालकृष्ण आडवाणी अजून राजकारणात का लुडबुडतात आपल्याला कुठं कळतं? त्यांनी दिल्लीत ‘फरसाण मार्ट’ काढावं. भरदुपारी बेल वाजवून झोपमोड करता? अख्खं पुणं दुपारी एक ते चार झोपतं तुम्हाला माहीत नाही? बाहेरचे दिसताय. मुंबईचे वाटते?’’

‘‘नावाचं तेवढं सांगता का?’’

‘‘सांगतो ना.’’ झोपमोड झालेला म्हातारा कातावून म्हणाला, ‘‘तुमच्या तीर्थरूपांचा नोकरच आहे मी. ऐका. ते ‘पाटणकर निवास’ असं आहे. त्यातल्या पाटणकरमधली ‘पा’ आणि ‘र’ ही पहिली व शेवटची अक्षरे गळून पडलीत. त्यामुळे ‘टणक’ एवढंच उरलंय. तसंच ‘निवास’मधलं ‘नि’ गळून पडलंय. नुसतं ‘वास’ राहिलंय. कळलं? पडला प्रकाश? नसत्या चांभारचौकश्या हव्यात कशाला तुम्हाला? टळा आता.’’

हा किस्सा साभिनय सांगून संजय आम्हाला तो वाडा दाखवायला घेऊन जायला निघाला. अट एकच – दुपारी एक ते चारमध्ये जायचं.

अलीकडे प्रसिद्ध चित्रपट गीतांवर आधारित राजकीय विडंबनगीते करायची व ती नको तिथं गायची हा नाद त्याला लागला होता. लागला होता म्हणजे त्यानं लावून घेतला होता. हे घ्या त्यातलं एक गाणं. ‘लाखों मे एक’ चित्रपटातील किशोर कुमारने गायलेले गाणं – ‘चंदा हो चंदा, किसने चुराई तेरी मेरी निंदिया.’ मोने स्वरचित गाणे म्हणायचा, ‘गुलझारीलाल नंदा, पी. एम. झाले तीनदा.’ पुढचं ऐका. मूळ गाणं ‘हमराही’तलं ‘ये आँसू मेरे दिल की जबान है.’ त्यावर संजयचं कलम – ‘रा. सु. गवई, तुम्हीच आमचे देव…’

संजयची ही व अशी गाणी माझ्या इतकी डोक्यात बसलीत की, आता तीच मला ‘ओरिजिनल’ वाटायला लागलीत.
मी कोल्हापूरला जात असताना रा. सू. गवई (माजी गव्हर्नर बिहार) शेजारच्या ‘कुपे’त होते. त्यांच्याबरोबर त्यांची माणसं होती. ‘कॉरिडॉर’मध्ये त्यांचा ‘बॉडीगार्ड’ बंदुकीसह उभा होता. मी त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो व संजयचं स्मरण करून गाऊ लागलो –

‘रा. सू. गवई तुम्हीच आमचे देव
हसतील रा. सू. हसूही आम्ही
रडतील रा. सू. रडूही आम्ही
रा. सू. गवई तुम्हीच आमचे देव’

‘बॉडीगार्ड’ला कसं ‘रिऍक्ट’ व्हावं कळेना. दुर्लक्ष करणंही त्याला शक्य होईना. शेवटी या हातातली बंदूक त्या हातात करीत तो अस्वस्थपणे जागच्या जागी चुळबूळ करीत म्हणाला, ‘‘साहेब, तुमच्या जागेवर जाऊन बसा.’’
मी गप गेलो. बंदूकधारी ‘बॉडीगार्ड’समोर काय करायचं असतं संजयनं कुठं शिकवलं होतं?
‘९ कोटी ५७ लाख’ या फार्सच्या लेखनाचे ‘झी टीव्ही’ पारितोषिक नुकतेच संजयला मिळाले. मी त्याला अभिनंदनपर फोन केला. त्यानं फोन घेतला या सन्मानानं भारावून जाऊन मी गायला लागलो – ‘रा. सु. गवई, तुम्हीच आमचे देव…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या