लेख – झुंजार स्वातंत्र्यसेनानी

  • विलास पंढरी

आज थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 जयंती आहे. केंद्र सरकारने नेताजींची जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी करण्याचे जाहीर केले आहे. यानिमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. नेताजींच्या सवाशेव्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम पश्चिम बंगालमधील व्हिक्टोरियल मेमोरियल इथे होणार असून पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. यंदा एप्रिल–मेमध्ये बंगालमधील येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक हेही नेताजींची जरा जास्तच आठवण येण्याचे कारण असावे. दरम्यान नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी सरकारच्या घोषणेचे स्वागत केले असून गेली अनेक वर्षे जनता नेताजींचा जन्मदिवस ‘देशप्रेम दिन’ म्हणून साजरा करीत असल्याने हा देशप्रेम दिवस म्हणून जाहीर केला असता तर अजून बरे झाले असते असे म्हटले आहे.

सुभाषचंद्र बोस यांनी दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ‘जय हिंद’चा नारा आजही हिंदुस्थानचा राष्ट्रीय नारा बनून राहिला आहे. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की जर 1947 मध्ये नेताजी हिंदुस्थानात उपस्थित असते तर कदाचित हिंदुस्थानची फाळणी न होता हिंदुस्थान एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. अगदी गांधीजींचेदेखील असेच मत होते. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1889 रोजी ओडिशामधील कटक येथे झाला. लहानपणीच कटक रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूलमधील वेणीमाधव दास या शिक्षकांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे. कोलकात्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयातील एक इंग्रज प्राध्यापक ओटेन हे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. याविरोधात त्यांनी महाविद्यालयात संप पुकारला होता. 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाषचंद्र भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु देशभक्त सुभाषचंद्र यांनी इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

त्या काळी गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. बंगालमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या दासबाबूंबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलून त्यांना हिंदुस्थानी नावे दिली गेली. स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली. लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली.

26 जानेवारी 1931 च्या दिवशी, कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगा ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की, याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.

21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची म्हणजेच स्वाधीन हिंदुस्थानचे अंतरिम सरकार स्थापन केले. ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान व संरक्षणमंत्री बनले. नेताजींच्या या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली होती. आझाद हिंद फौजेत स्त्र्ायांसाठी ‘झाँसी की रानी’ रेजिमेंटही बनवली होती. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक हिंदुस्थानी लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे व आार्‘िथक मदत करण्याचे आवाहन केले. ही आवाहने करताना त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौज माघार घेत असताना जपानी लष्कराने नेताजींना निसटून जाण्यासाठी व्यवस्था केली. पळून जाणे शक्य असूनही नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या महिला सैनिकांच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला. सुभाषबाबूंचे समग्रजीवन हा पिढ्यान्पिढय़ांसाठी आदर्श राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या