प्रासंगिक – व्यसन : मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणारा शाप!

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम (prit00786@gmail.com)

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस दरवर्षी 26 जूनला साजरा करण्यात येतो. 1987 पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवसाचे महत्त्व म्हणजे लोकांमधे नशेसंबंधी समस्यांवर जनजागृती निर्माण करणे व दुसरीकडे व्यसनाधीन व्यक्तीच्या नशेवर नियंत्रण करून योग्य उपचार करणे आहे. जागतिक स्तरावर अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर संपूर्णरीत्या नियंत्रण करणे हादेखील एक हेतू आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी एक नवीन थीम घेऊन कार्य केले जाते. यावर्षीची थीम ‘स्वास्थ्य न्यायाकरिता व न्याय स्वास्थ्याकरिता’ आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाप्रमाणे जागतिक स्तरावर अफीम (हेरॉईन) मोठय़ा प्रमाणात तयार करून अवैध विक्री केली जाते, ज्यात हिंदुस्थानचासुद्धा मोठा वाटा आहे. आपल्या देशात साधारणपणे 1500-2000 हेक्टरवर अफीमची अवैध शेती केली जाते आणि ही खूपच गंभीर बाब आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमीच कोटय़वधीच्या हेरॉईनची अवैध तस्करी पकडल्याची बातमी ऐकायला मिळते. अशा मादक पदार्थांच्या अवैध व्यापारासंबंधी अपराध जगभरात घडतच आहेत. मानव आपल्या परंपरा, प्रथा, कर्तव्य, संस्कारांपासून दूर होऊन आधुनिकतेच्या आंधळ्या मार्गावर भरकटत चाललाय. युवा वर्गात नशा खूप वेगाने वाढत चालली आहे. पहिल्यांदा व्यसन अति उत्साहात, दबावाखाली, खूप ताणतणावात, जिज्ञासेपोटी, मित्रांसोबत मजेमजेत, उत्सवांमधे, आधुनिकतेच्या दिखाव्यात व इतर वेळा करतो. अमली पदार्थांची व्यसने पुष्कळ प्रकारची आहेत, जसे ड्रग्स, तंबाखू, अल्कोहोल, चरस, गांजा, अफीम, भांग. याव्यतिरिक्त पेट्रोल, व्हाईटनर, फेव्हिकॉलसारख्या वस्तूंचा उग्र वास घेणे व इतर.

बेकारी, निराशा, जीवनातील संघर्ष, ताणतणाव, खाली वेळ, नवा अनुभव, नैराश्य, खोटा दिखावा, फॅशन, संबंधांमध्ये कटुता, घरगुती झगडे, एकटेपणा, अज्ञान, वाईट शेजार, शारीरिक व मानसिक बिमारी, अपयश, आर्थिक तंगी, कामाची थकवा, खोटे भ्रम आणि व्यसनी लोकांची संगत यामुळे मानव आपल्या आत वाईट गुणांना जोपासतो. समोर जाऊन याच वाईट गोष्टी नशेकडे वळवतात, पण आजकाल आनंदाच्या क्षणी जसे वाढदिवस, लग्न, कोणत्याही सणासुदीच्या दिवशी, सहल, पार्टीच्या नावाखाली नशा केली जाते. आपल्या समाजात नशेसारखे वाईट विष सहजपणे उपलब्ध होते हीच चिंतेची बाब आहे.  हे व्यसन केव्हा माणसाच्या जीवनातील एक भाग बनते हे कळत नाही आणि मनुष्य व्यसनाच्या आहारी जातो.

क्षणमात्राच्या खोटय़ा आनंदाचा आहारी जाऊन नशेने माणूस शारीरिक व मानसिक रूपाने कमजोर होतो, गंभीर आजाराने ग्रस्त होतो आणि मानवाचे जीवन वेळेपूर्वीच संपते. घरच्या व्यसनी व्यक्तीला सांभाळण्यात असमर्थ होतात, परिवारात संस्कारांची कमी येते, अनैतिक आचरणाचे निमार्ण, परिवार नातेवाईक व समाजाद्वारे व्यसनींचे तिरस्कार केले जातात, व्यसनींना हीन भावनेने पाहतात, व्यसनींच्या घरात नेहमी भांडण, तंटे होतात. यामुळे पूर्ण सर्मीज प्रभावित होतो, नशेमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात, आत्महत्या, गरिबी, बेकारी, वाहन अपघात, मृत्यू दरवाढ व अपराधात विशेष रूपाने मोठय़ा प्रमाणात वाढ होतेय. अशा प्रकारे आर्थिक, पारिवारिक, सामाजिक मूल्यांचा नाश होतो. व्यसनी माणूस चांगला नागरिक, पालक, संरक्षक, मार्गदर्शक, जबाबदार व्यक्ती अशा भूमिका कधीच पार पाडू शकत नाही. समाजात अपराधांचा ग्राफ खूप वेगाने वाढतोय आणि 50 टक्के अपराध नशेमधे किंवा नशेकरिता केले जातात. व्यसन समाजात विषप्रयोगाचे काम करते.