एक उडान अशीही!

145

ऋतुजा आनंदगावकर व्यवसायाने एरॉनॉटिकल इंजिनीअर आणि आता बीडमधील मंजरथ या छोट्याशा गावची सरपंच

बीडमधील मंजरथ या छोट्याशा गावातील ऋतुजा आनंदगावकर… अवघ्या २५ वर्षांची ही तरुणी. व्यवसायाने एरोनॉटिकल इंजिनीअर असतानाही ती आपल्या मातीशी इमानी आहे. तिने आपल्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतलाय. ग्रामस्थांना हे कळले. म्हणूनच तर मंजरथ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी तिची निवड झाली. तरुणांनी शहरात नोकरी करता करता आपल्या गावच्या विकासाकडेही लक्ष द्यायला हवे असाच तिचा उद्देश आहे. तिच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वच स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

मंजरथ हे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठचे गाव. ऋतुजाचे बालपण गावात गेले. ती इथल्या मातीत घडली. तिने एरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. ती सध्या अहमदाबाद येथे एका संस्थेत एरोनॉटिकल ऍनालिस्ट म्हणून काम पाहतेय. तिचे आई-वडील गेली अनेक वर्षे समाजकारणात आहेत. त्यांची कामे पाहातच ती मोठी झाली. त्यांची गावाबद्दल, माणसांबद्दल असलेली ओढ तिने जवळून पाहिली आहे. त्यामुळे तिला समाजकारणाचे बाळकडू तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाले आहे. या गावातील गावकऱ्यांना सरपंच म्हणून एक उच्च शिक्षित उमेदवाराची गरज होती. गावकऱ्यांचे मत होते की ऋतुजाने सरपंच व्हावे, ती त्या पदासाठी सक्षम आहे, त्याबाबत तिला विचारण्यात आले आणि तिने लगेच होकार दिला. त्यामुळे या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदावर ऋतुजा आनंदगावकर निवडून आली.

महिलांच्या समस्यांकडे तिचा कल असणार आहे. आजही गावात सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जनजागृती नाही. शिवाय त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होतो. गावात कचरापेटी हा प्रकार नाही. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. गावात लहान-लहान उद्योग आहेत, पण त्यांना हवीतशी दिशा मिळालेली नाही. तर त्यांना संधी करून देणार असल्याचे ऋतुजा सांगते. प्राथमिक स्थरावर विचार केला तर इथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक सुविधा नाही. इथे कचरा अस्ताव्यस्त आहे ते आधी सुरळीत करणार आहे. गावात पोलीस चौकीही नाहीये. एखादी तक्रार करायची झाली तर लोकांना ११ किलोमीटर दूर जावे लागते. त्यामुळे त्यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचे तिने सांगितले. गावात १५ वर्षांच्या मुलीचे लग> लावून देतात. तिच्यावर एवढय़ा लहान वयात जबाबदारी येते. त्यापेक्षा मी तर बरीच मोठी आहे असे मला वाटते. सरपंच ही मला जबाबदारी वाटत नाही. सगळे गावकरी माझे कुटुंबच आहे. त्यांच्यासाठीच थोडेफार आपण काम केले तर त्यापेक्षा वेगळे समाधान कशात असेल? असे ती स्पष्ट करते.

पर्यटनासाठी प्रयत्न करणार

गाव नदीकाठी आहे. त्यामुळे त्याला पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अशा दोन्ही गोष्टी करून देण्यामागे प्रयत्न असणार आहे. ते प्रक्रियेत असून ते जलदगतीने कसे होईल याकडे लक्ष देणार आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे. रस्त्याचे डांबरीकरण आणि सुसज्ज रस्ता कसा होईल त्याकडे पाहणार आहे.

तरुणांनो गावच्या विकासासाठी वेळ काढा

नोकरी तर अजून करतेच आहे. ती सोडण्याचा सध्या तरी विचार केलेला नाही. मला असे वाटते की इथला तरुणवर्ग बाहेर शिक्षणासाठी गेला आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात गेला आहे. त्यांना सांगू इच्छिते की तुमचा थोडा वेळ इथे द्या. म्हणजे तुमची जशी प्रगती झाली तशी त्या लोकांमध्येही प्रगती होईल. पण आपल्या मातीत काम केल्याचा जो आनंद आहे तो दुसऱ्या कुठल्या नोकरीत नाही.

विकासाला मॉडर्न तंत्रज्ञानाचा टच

इथल्या राजकारण्यांना, समाजकारण्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून थोडी फार प्रगती केली आहे. त्या प्रगतीला मॉडर्न तंत्रज्ञानाचा टच देऊन मी तो वारसा पुढे चालवेन. रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो बऱ्याच योजना आहेत.  राबवायच्या कशा त्यासाठी अभ्यास करणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा टच देण्यासाठी माझ्या शिक्षणाचा वापर करणार आहे, असेही ती स्पष्ट करते.

लक्ष्य आयडियल गावाचे

 एरोनॉटिकल इंजिनीअर तर मी आहेच, पण त्यापेक्षा मी समाजाचे भरपूर देणे लागते. समाजाने माझ्यासाठी खूप केले आहे. मग किती दिवस घेत राहायचे, आता द्यायची वेळ आहे… म्हणून मी निर्णय घेतला समाजात येऊन समाजासाठी करायचे आहे. आता लक्ष्य आयडियल गावाचे असेल असेही ती आवर्जून सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या