अक्षय आनंद देणारी अक्षय तृतीया

>> दिलीप देशपांडे

वैशाख शु. तृतीया म्हणजेच ‘अक्षय तृतीया.’ जे साडेतीन शुभ मुहूर्त आपण मानतो त्यातीलच अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे. अक्षय म्हणजेच क्षय न होणारे, नाश न पावणारे. खान्देशात (धुळे, जळगाव, नंदुरबार, या भागात) या सणाला ‘आखाजी’ म्हणून संबोधले जाते. या दिवशी दानाचेही अत्यंत महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाचेही अधिक पटीने पुण्य मिळत असते, ते चिरकाल टिकणारे असते म्हणून अनेक जण अक्षय तृतीयेस छत्री, पायातल्या वहाणा, पाण्यासाठी माठ, रांजण, रुमाल, पंचे, कापड, वस्त्र्ा आदींचे गरजू व्यक्तींना, वृद्धाश्रमात, गोरगरीबांच्या वस्त्यांत जाऊन दान करत असतात. ज्याला ज्या प्रमाणात शक्य असेल तेवढे त्यांनी जरूर करावे. सतपात्री दान करावे, अशी भावना आहे.
या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात. विधिवत पूजा केल्यास आपले मनोरथ पूर्ण होतात. या सुमारास उन्हाचे प्रमाण वाढले असते. तपमान खूप असते. म्हणून अनेक व्यापारी मंडळी, रस्त्यारस्त्यावर पाणपोई सुरू करतात. जनावरांच्या पाण्यासाठी हौद, हाळ, बांधतात. ज्यापासून पुण्यप्राप्ती होईल ते ते करतात. कारण ते अक्षय आहे. अक्षय तृतींयेला पितरांचे स्मरण करून श्राद्ध घालण्याचीही प्रथा आहे. या सणाच्या निमित्ताने मनात पितरांची स्मृती जागृत होते. त्यांचे आशीर्वाद घराला मिळतात.

अक्षय तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगितले आहे.

अस्यां तिथौ क्षयमुपैति ह्रतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।।

हा मुहूर्ताचाच दिवस असल्याने सोने, चांदी, दागिने, मौल्यवान वस्तूंची खरेदी व अनेक शुभ कामांचा प्रारंभ केला जातो. शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात. शेतकरी शेती कामासाठी नवीन सालदाराची नेमणूक करत असत. आज ही प्रथा काहीच ग्रामीण भागात आढळून येते. काळानुसार प्रथा बदलतात.

सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अशा परिस्थितीत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणपोई काढून पुण्य पदरी पाडावे, अशी स्थिती आहे. या काळात नामस्मरणालाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याला प्रिय असलेल्या देवतेचे होईल तेवढे नामस्मरण करावे. विष्णुसहस्त्र्ानाम, लक्ष्मीची उपासना करतात. या दिवशी केलेल्या नामस्मरणाने घरातील दोष नाहीसे होतात. स्त्र्ायांनी घरात चैत्र गौरीची स्थापना केली असते. या शेवटच्या दिवशी स्त्र्ाया हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात.
खान्देशात अक्षय तृतीया सण फार उत्साहात साजरा होतो. या भागात ‘आखाजी’ म्हणून हा ओळखला जातो. ग्रामीण भागात पत्त्यांचे डाव रंगतात. जुगार खेळायला परवानगी असते. तरुण, वयस्कर, सर्वच यात सहभागी होतात. गल्लीत, देवळाच्या ओटय़ावर, गोठय़ात, पारावर, जागोजागी डाव रंगलले दिसतात.

मुली माहेरवाशीण म्हणून आलेल्या असतात. त्यांच्यासाठी पुरणपोळी, आंब्याचा रस, कटाची आमटी, काही ठिकाणी मांडे (म्हणजे खापरावर केलेल्या मोठय़ा पुरण पोळ्या) हा बेत असतो. शिवाय आखाजीची गाणीही म्हटली जातात.

आथानी पैरी तथानी पैरी,
पैरी झोका खाय वं
पैरी तुटनी खडक फुटना,
झुय झुय पानी व्हाय वं

किंवा-

आखाजीचा आखाजीचा
मोलाचा
सन देखा जी
निंबावरी, निंबावरी
बांधला छान झोका जी
माझा झोका
माझा झोका
चालला
भिरभिर जी
माझा झोका
माझा झोका
खेयतो वाऱयावर जी

अशी गाणी झोक्यावर बसून माहेरवाशिणी म्हणतात. त्यातून आपला आनंद व्यक्त करत असतात. सासर-माहेरच्या सुखदुःखाचे त्यात प्रतिबिंब असते. माहेरवाशिणींत गुजगोष्टी होत असतात.

अक्षय तृतीयेच्या नंतर माहेरवाशिणी सासरी जातात. त्याच्या सोबत वडे, कुरडया, पापड, शेवया, सांजोऱया देण्याची प्रथा आहे.

अक्षय तृतीयेला भगवान परशुरामाची जयंती असते. भगवान विष्णूचा हा सहावा अवतार आणि अष्टचिरंजीवापैकी एक चिरंजीव अशी त्यांची महती आहे. त्यांचे पूजन केले जाते. आपल्या महाराष्ट्रात चिपळूणजवळ भगवान परशुरामाचे मंदिर आहे.

अनेक दृष्टीने अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. सुख-समृद्धी-आनंद देणारा सण आहे. काळाच्या ओघात अनेक प्रथा-परंपरा कमी होत असल्याचे जाणवते. असे सणवार आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. त्याची जपणूक करणे आपले काम आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्व जण एक संकल्प करू… देवासमोर एक धान्याचा आणि दुसरा पाण्याने भरलेला असे कलश ठेवून सुख-समृद्धीसाठी अक्षय वरदान मागूया.

आपली प्रतिक्रिया द्या