आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? वाचा आषाढी एकादशीची कथा व महत्त्व

>> निळकंठ कुलकर्णी

आषाढी एकादशीचे नक्की महत्व काय आणि ही इतकी मोठ्या प्रमाणात का साजरी करतात हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडतो. खर तर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असं म्हटलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला महाएकादशी असे नाव आहे. तसेच कार्तिकात येणारी एकादशी सुद्धा मोठी म्हणून गणली गेलेली आहे.

आजपासून वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो. ज्याला चातुर्मास असे म्हणतात. म्हणून या एकादशीला फार महत्व आहे. या एकादशीला ‘शयनी’ एकादशी असेही नाव आहे. ‘शयन’ म्हणजे झोप. आजपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात. या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला ‘परिवर्तनी एकादशी’ असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हणतात.

वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’ आढळतो. आषाढ हा महिना पचन संस्था बिघडवणारा असतो. म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तऱ्हेचे उपास, काही व्रतवैकल्ये ही उपवासाच्या दृष्टीने केलेली आहेत. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात.

एकादशी महात्म्य कथा-

एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. पण एकादशी महात्म्य कथा आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा आहेत. अशीच एकादशी महात्म्य कथा जाणून घ्या.

भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी भगवान शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी भरपूर पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता.

या देवीच नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याची प्रथा पडली. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते. आपल्या पुढील प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या