आभाळमाया – त्या दोघींचे अंतराळी चालणे

791

अंतराळात रोज नव्हे तर क्षणाक्षणाला नवीन काहीतरी घडत असते. कुठे कोणता धूमकेतू घिरटय़ा घालू लागतो, एखाद्या ग्रहावर आदळतो किंवा सूर्यामध्येच विलीन होतो असे ‘सन ग्रोझिंग’ धूमकेतू खूपच असतात. हे छोटे धूमकेतू सूर्याकडे खेचले जाऊन अंतिमतः त्याच्यातच सामावतात. काही वेळा एखादा महापाषाण सुसाटत निघतो. अनेक ग्रहांच्या कक्षा भेदून आणि त्यांचे गुरुत्वाकर्षण चुकवून तो पृथ्वीजवळ येऊन कोसळण्याची भीती दाखवतो. लोणारला 52 हजार वर्षांपूर्वी कोसळला तसा क्वचित पृथ्वीचा वेधही घेतो.

या आपल्या सूर्यमालेतल्या गडबडी त्यापलीकडच्या विराट विश्वात आणखी बरेच काही घडत असते. आपल्या सूर्यासारखे अब्जावधी तारे विश्वभर पसरलेले असल्याने त्यांच्याभोवती आपल्यासारख्याच ग्रहमाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कितीतरी एक्झो-प्लॅनेटस्भोवतीच्या ग्रहमाला सापडल्या आहेत. यासंबंधीच यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. त्याविषयी पुढील लेखात.

आताचा विषय आहे तो अंतराळात अधांतरी चालण्याचा त्यातही आता काही नावीन्य राहिलंय अशातला भाग नाहीच. कारण अंतराळ प्रवासाचा आरंभ करून त्यातील पहिल्या फेरीत आघाडी घेणाऱया रशियाने 25 जुलै 1984 रोजी स्वेतलाना सावित्स्काया या महिलेला प्रथम अंतराळात पाठवण्यापूर्वी त्यांचाच ऍलेक्सी लिओनॉन 18 मार्च 1965 रोजी अंतराळात यानाबाहेर येऊन अधांतरी चालणारा पहिला माणूस ठरला होता. सोव्हिएत रशियाचा युरी गागारिन 1958 मध्ये अंतराळात जाणारा पहिला माणूस होता हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर 16 जून 1963 रोजी व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा ही व्होस्टॉक-6 या यानातून अंतराळात जाणारी पहिली महिला ठरली. थोडक्यात काय, रशियन अंतराळयात्रींनी हे पहिले विक्रम गाजवले.

अर्थातच त्याकाळी अमेरिका-रशियाचे शीतयुद्ध सुरू असल्याने रशियन यशाने अमेरिकेचा जळफळाट व्हायचा. त्याचा अंतराळ संशोधनाला मात्र फायदा झाला. 1969 मध्ये अमेरिकेने चंद्रावर पहिला माणूस पाठवला. पहिली मानवचलित चांद्रबग्गी पाठवली. पुढे या दोन्ही देशांतले शीतयुद्ध संपले आणि अंतराळ कार्यक्रमातही सहकार्याचे युग सुरू झाले.  एकत्रित स्पेस स्टेशनवर या दोन्ही देशांचेच नव्हे तर इतरही देशांचे अंतराळयात्री जाऊन राहू लागले. या सौहार्दातून पुढे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.

नंतरच्या काळात रशियाच्या सॅल्यूत-7 मधून ब्लादिमिर या अंतराळयात्रीसोबत गेलेली स्वेतलाना त्याच्यासोबत यानाबाहेर स्पेसवॉक करत धातूच्या पट्टय़ांचे कटिंग-वेल्डिंग करणारी पहिली महिला ठरली. 1984 मधील स्वेतलानाच्या या यशानंतर अनेक देशांच्या महिला अंतराळयात्री अवकाशाकडे जाऊ लागल्या. त्यात हिंदुस्थानच्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सचाही समावेश होतो. सुनीताने तर 2012 पर्यंत सात वेळा स्पेसवॉकचा विक्रम केला आणि अधांतरी चालण्यात व यानाचे काम करण्यात एकूण 50 तास 40 मिनिटे व्यतीत केली. अंतराळात आजवर गेलेल्या एकूण 564 अंतराळयात्रींपैकी 65 महिला आहेत. त्यातल्या हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन दोघीजणी कल्पना चावला दुर्दैवाने कोलंबिया अपघातात दगावली. या 65 महिलांमध्ये पेगी व्हिटसन हिचा सर्वाधिक म्हणजे 534 दिवस स्पेसमध्ये राहाण्याचा विक्रम आहे. या सर्व गोष्टींची उजळणी करण्याचे कारण म्हणजे पहिला ‘ऑल विमेन स्पेस वॉक’ 18 ऑक्टोबर रोजी सुखरूप पार पडला. तोपर्यंत स्पेसवॉक करणाऱया महिलांचे सहकारी पुरुष अंतराळयात्री होते. ‘ऑल विमेन’ म्हणजे क्रिस्तिना कोच आणि जेसिका मिर या दोघींनीच एका यानातून पृथ्वीपासून 408 किलोमीटर अंतरावरून फिरणाऱया अंतराळ स्थानकात प्रवेश केला आणि स्पेस स्टेशनच्या काही खराब बॅटऱया बदलण्याचे काम यानाबाहेर पडून तरंगत्या अवस्थेत पूर्ण केले. स्पेस स्टेशनच्या बाहेरून ऊर्जा देणाऱया सोलार-पॅनलच्या या बॅटरी बिघडल्या होत्या. त्यांची दुरुस्ती व्हायला 5 तास लागले. इतका वेळ या दोघींना यानाबाहेर तरंगत राहावे लागले.

खरे तर दोघी अंतराळयात्रींनी हे काम करण्यासाठी स्पेसमध्ये जावे असा नासाचा विचार पूर्वीच झाला होता. गेल्या मार्च महिन्यातली तारीखही ठरली; परंतु दोघींपैकी एकीचा स्पेससूट योग्य प्रकारे बनवला गेला नाही आणि त्यांचे उड्डाण लांबले. 2000 मध्ये कार्यान्वित झालेल्या स्पेस स्टेशनची देखभाल करण्यासाठी आजवर 221 स्पेसवॉक झाले आहेत. त्यापैकी 43 मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग होता. परंतु केवळ महिलांची टीम 17 ऑक्टोबरला प्रथमच काम फत्ते करून आली. हासुद्धा एक विक्रमच आहे.

या दोघींपैकी क्रिस्तिना कोच 2020 च्या फेब्रुवारीपर्यंत सर्वात लांब स्पेसवॉक करण्याचे उद्दिष्ट यशस्वी करणार आहे. उद्याच्या अंतराळयानाचा अनेक सारथी महिला असतील. त्यांच्या कर्तृत्वाने आता अवघे अंतराळ व्यापले आहे

आपली प्रतिक्रिया द्या