कॅरोलिन हर्शेल

khagoldilip@gmail.com

अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग असल्याच्या दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनच्या नोंदी आहेत. इसवी सनाच्या ४०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया येथे सर्व विषयांच्या अभ्यासाचं मोठं केंद्र होतं. आपल्याकडच्या नालंदा किंवा तक्षशीला या प्राचीन विद्यापीठासारखं मध्यपूर्वेतील प्रगत विद्यापीठ आणि विशाल ग्रंथालय तेथे होतं. काळाच्या ओघात त्यातलं बरंच काही नष्ट झालं. विज्ञान – इतिहासाच्या काही खाणाखुणा आणि नोंदी शिल्लक राहिल्या. याच अलेक्झांड्रिया येथील हायपेटिया या महिलेला पहिला अवकाश अभ्यासकाचा मान दिला जातो. हिंदुस्थान किंवा चिनी संस्कृतीत असं कोणी असेलही, पण त्याची ठोस नोंद मिळालेली नाही.

हायपेटियाच्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये रोमन साम्राज्य होतं. कलागुण आणि विज्ञानाचा विकास होत होता. काही विद्वज्जनांनी एकाच वेळी अनेक विषयांचा अभ्यास केला. ती तत्त्वज्ञ, गणितीसाठी जिओप्लॅनेटिक संस्थेची प्रमुख होती असा उल्लेख आढळतो. अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालयाचा ऱ्हास झाल्यामुळे हायपेटियाचं लिखाण आता उपलब्ध नसलं तरी तिथे युक्लिडची भूमिती आणि टॉलेमीच्या अल्मागेस्टचा अभ्यास केला असावा असं मानलं जातं. गणिताचा वारसा तिला गणितज्ञ असलेले वडील थिओर ऑफ अलेक्झांड्रिया यांच्याकडून लाभला होता. डायोफॅन्टसच्या अंकगणितावर टीका (विवरण) करणारे खंड हायपेटिसने लिहिले. तिने खगोलीय अभ्यासासाठी काही यंत्रे बनवली असं म्हटलं गेलं. ती आधीही उपलब्ध होती असंही म्हटलं जातं.

युरेनस या ग्रहाचा शोध लावणाऱ्या विल्यम हर्शेलची बहीण कॅरोलिनही खगोल अभ्यासक होती. धूमकेतूंचा वेध होण्याचा छंद तिला होता. तिचा जन्म जर्मनीतील हॅनॉव्हर येथे १७५० मध्ये झाला. तोपर्यंतच्या शतकभरात अवकाशाचा वेध घेण्याच्या दुर्बिणीमध्ये बरीच सुधारणा झाली होती.

कॅरोलिन म्हणते, ‘‘सौंदर्य किंवा पैसा नसला तरी बुद्धिमत्तेच्या प्रभावानेच मला काही करता येईल याची जाणीव वडिलांनी करून दिली आणि मी भाऊ विल्यम याच्याबरोबर संगीताच्या क्षेत्रात आले, परंतु १७८१ मध्ये विल्यमने युरेनस ग्रहाचा शोध लावल्यानंतर माझी संगीताची आवड कमी होऊन मी खगोल अभ्यासात रुची घेऊ लागले.’’

त्यानंतर कॅरोलिनने दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण करण्याचा ध्यास घेतला आणि निरीक्षणांची नोंद करून ठेवली. विल्यमने युरेनसचा शोध लावल्यावर तो राजज्योतिषी (म्हणजे खगोलविद) झाला आणि ही बहीण-भावंडं बर्कशर येथे आली.

१७८३ मध्ये कॅरोलिनने दुर्बिणीद्वारे तेजोमेघांची (नेब्युले) निरीक्षणं केली. त्या काळात ती मुख्यत्वे भावाला अवकाश संशोधनात मदत करीत असे. एका गुडघाभर बर्फात अंधाऱ्या रात्री अवकाशाचा वेध घेत असताना तिचा पाय एका हुकात अडकला आणि ती जखमी झाली, पण तिने निरीक्षण थांबवलं नाही.

१७८६ मध्ये कॅरोलिन धूमकेतूचा शोध घेणारी पहिली महिला ठरली. त्यानंतर थोडय़ाच काळात तिने आणखी सहा धूमकेतूंचा शोध लावला. त्यावर खूश होऊन राजा तिसरा जॉर्ज याने तिला ‘पहिली महिला खगोल अभ्यासक’ असा किताब देऊन वार्षिक ५० पाऊंड मानधनही दिलं.

विल्यम हर्शेलचं १८२८ मध्ये निधन झालं. त्यानंतर कॅरोलिन हॅनोव्हरला परतली आणि तेथे तिने आपला खगोल अभ्यास सुरू ठेवला. तिच्या या कार्याचा गौरव म्हणून १८२८ मध्येच तिला रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक मिळाले. तिने अवकाशस्थ वस्तूंची जी नोंद (कॅटलॉग) केली होती त्याची दखल घेतली गेली. रॉयल ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचं मानद सभासदत्वही कॅरोलिनला लाभलं. त्यावेळी या संस्थेतील दोनच महिला सभासदांपैकी ती एक झाली. कॅरोलिनला दीर्घायुष्य लाभलं. वयाच्या ९७ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. मात्र तोपर्यंत तिचा अवकाश निरीक्षणाचा ध्यास थांबला नव्हता.