अवकाशमापन

60

[email protected]

रात्रीच्या आकाशाकडे दुर्बिण रोखून विविध तारकासमूहांचा वेध घेण्याचा मोसम आता हळूहळू कमी होईल. महिन्या-दीड महिन्यात पावसाळी मेघांनी ‘नभ आक्रमिले’ की, कुठलं आकाशदर्शन! अगदी पाऊस पडत नसला तरी विरळ ढगांनी अभ्राच्छादित आकाशानेही बरेच तारे नजरेआड जातात. ठळक ग्रह-तारे दिसतात, पण एखाद्या तारकासमूहातला डोळय़ांनी न दिसणारा नेब्युला (तेजोमेघ) वगैरे न्याहाळायचा तर स्वच्छ आकाशाचे दिवस थोडे उरलेत. ही झाली आपल्यासारख्या आठ महिने लख्ख सूर्यप्रकाश असलेल्या देशातली गोष्ट. मग ज्या देशात सतत ढगाळलेलं हवामान असतं तिथून तर अवकाशवेध घेणं कठीणच. तरीही युरोपातल्या अनेक देशांतील लोकांनी विविध शोध लावले. आपल्याकडे प्राचीन काळापासून नक्षत्रांची संकल्पना होतीच. आमच्या लहानपणी आम्ही सत्तावीस नक्षत्रे तोंडपाठ केली होती. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी वगैरे. पुढे खगोल अभ्यास करताना त्याचा उपयोग झाला. या सत्तावीस नक्षत्रांचे आकार, अडीच नक्षत्रांची एक अशा बारा राशी वगैरे आकाशस्थ आकार (पॅटर्न) लक्षात राहणं सोपं गेलं. मात्र ज्याला डीप स्काय ऑब्जेक्ट्स म्हणतात ते तेजोमेघ, रूपविकारी तारे, द्वैती तारे या गोष्टी साध्या निरीक्षणाने शक्य नव्हत्या. हॅन्स लेपर्शे यांनी नेदरलॅण्डमध्ये दुर्बिणीचा शोध लावला आणि गॅलिलिओने दुर्बिण पहिल्यांदा खगोलीय निरीक्षणासाठी वापरली हे आता अनेकांना ठाऊक आहे. दुर्बिणींचा वापर करून खगोल अभ्यासात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांविषयी आपण सध्या या स्तंभातून माहिती घेत आहोत. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विल्यमिना फ्लेमिंग. अवकाशातला अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध असा मृग तारकासमूहातला ‘हॉर्स हेड’ किंवा अश्वमुखी तेजोमेघ (नेब्युला) शोधण्याचं काम विल्यमिना फ्लेमिंग यांनी केलं. स्कॉटलॅण्डमध्ये (१८५७) जन्मलेल्या विल्यमिनाचं स्टीव्हन्स घराणं कलाकाराचं होतं. जेम्स फ्लेमिंग यांच्याशी विवाह झाल्यावर एकविसाव्या वर्षी ती अमेरिकेत बॉस्टन येथे आली. हा विवाह मात्र सुखाचा ठरला नाही. विल्यमिनाला प्रा. एडवर्ड पिकेरिंग यांच्याकडे गृह-व्यवस्थापिकेचं काम करावं लागलं. पिकेरिंग हे ‘हार्वर्ड कॉलेज ऑब्झर्वेटरी’चे संचालक होते. त्यांच्याकडे अवकाश संशोधनासाठी बरीच मुलं येत असत. संतापी स्वभावाचे पिकेरिंग अनेकदा त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपयशाने चिडून ओरडत की ‘‘माझी स्कॉटिश मेड यापेक्षा चांगलं काम करील!’’ … त्यांचे बोल खरे ठरले. १८८१ मध्ये विल्यमिना फ्लेमिंगला हार्वर्ड कॉलेज ऑब्झर्वेटरीमध्ये (वेधशाळा) काम करण्याची संधी मिळाली. तिथे तिने लवकरच ताऱ्यांची वर्गवारी हाती घेतली. ताऱ्यांच्या वर्णपटात हायड्रोजनचं प्रमाण किती आढळतं या तत्त्वावर ही वर्गवारी आधारित होती. भरपूर हायड्रोजन असणारे तारे ‘ए’ गटात याप्रमाणे नोंद करण्यात आली. त्यानंतरच्या काळात ताऱ्यांच्या तापमानावरून त्यांचं वर्गीकरण ऍनी कॅनन यांनी केलं. फ्लेमिंग यांनी ताऱ्यांची जी नोंद (कॅटेलॉग) केली ती हेन्री ड्रेपर कॅटेलॉग म्हणून प्रसिद्ध आहे. नऊ वर्षांच्या काळात विल्यमिना यांनी १० हजार ताऱ्यांची नोंद केली. खगोलीय कारकीर्दीत त्यांनी ५९ वायुरूप तेजोमेघ, ३१० रूपविकारी (व्हेरिएबल) तारे आणि १० नवतारे (नोवा) नोंदवून त्यांनी पुढच्या पिढय़ांमधील अवकाश निरीक्षकांचं काम खूपच सोपं केलं. १८८८ मध्ये त्यांनी प्रसिद्ध ‘हॉर्सहेड नेब्युला’ शोधून काढला. बुद्धिबळाच्या पटावरील घोडय़ासारखा दिसणारा अश्वमुखी नेब्युला मात्र मोठय़ा दुर्बिणीतूनही आपण न्याहाळू शकत नाही. प्रा. एडवर्ड पिकेरिंग यांचे भाऊ डब्ल्यू.एच. पिकेरिंग यांनी टेलिस्कोपद्वारे केलेल्या फोटोग्राफीची ‘प्लेट’ अभ्यासत असताना फ्लेमिंग याला ‘हॉर्सहेड’ नेब्युला गवसला. त्यामुळे आधी या संशोधनात त्यांचं नाव वगळलं गेलं आणि पिकेरिंगला त्याचं श्रेय दिलं गेलं. मात्र १९०८ मध्ये या नोंदीत योग्य ती दुरुस्ती होऊन फ्लेमिंगच्या अभ्यासाला, संशोधनाला मान्यता मिळाली. मात्र नेब्युलाचं क्रेडिट देण्याइतकी उदारता दाखवली गेली नाही. नंतर ती गोष्ट स्पष्ट झाली.

आपली प्रतिक्रिया द्या