भीमसेनी कापूर

कापूर हा देवपूजेसाठी, आरतीसाठी वापरतात. त्याच्या सुगंधाने घरात प्रसन्न वातावरण होते. पण नेहमीच्या कापरापेक्षा आयुर्वेदिक भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीनेही खूप गुणकारी आहे.

 • भीमसेनी कापूर  कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते.
 • सर्दी, खोकला झाला असल्यास एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात कापराची पूड टाकून त्याची वाफ घ्यावी.
  हा कापूर नाकाला, कपाळाला, छातीला लावलेला तरी चांगला. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
 • रुमालावर कापराची पूड करून ती हुंगावी किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. आराम मिळेल.
  बर्फाळ प्रदेशात गेल्यावर चालताना श्वास लागत असल्यास हा कापूर हुंगावा.
 • सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी तिळाच्या तेलातून हा कापूर सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रित तेल लावल्यावर कपडय़ांना वास येतो.
 • सतत सर्दीचा त्रास होत असल्यास तिळाच्या तेलात कापराची पूड मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे किंवा खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. कोंडा कमी होतो.
 • दाढदुखीकरिता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
 • खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात.

काही सूचना
प्रवासी बॅग, कपडे साठवण्याच्या बॅगमध्ये कापूर ठेवला तर एक सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ लागत नाही.
पावसात कपडे चांगले वाळत नाहीत, ओलसर राहून त्यांना कुबट वास येतो. अशावेळीही कापूर ठेवावा.
घरात डास जास्त असल्यास झोपताना सभोवती हा कापूर ठेवा. डास फिरकत नाहीत, अन्य कीटकही लांब राहतात.
कापूर पायमोज्यात घातल्यास कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.

कापराचे वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.

आपली प्रतिक्रिया द्या