दिल्ली डायरी – बिहारमधील सुशासनाची ‘कल्हई’

668

>> नीलेश कुलकर्णी ([email protected])

बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद तुरुंगात आहेत. विरोधी पक्षनेते असलेले त्यांचे चिरंजीव तेजस्वी हे अनेक महिन्यांपासून ‘लापता’ आहेत तर दुसरे पुत्र तेजप्रताप दररोज नवनवे ‘अवतार’ धारण करून लोकमनोरंजन करीत आहेत. तेथील काँग्रेस पक्ष व्हेंटिलेटवर आहे. या पार्श्वभूमीमुळे नितीशबाबू जनतेला गृहीत तर धरत नाहीत ना, असा सवाल निर्माण झाला आहे. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि बिहारला लालू यादवांच्या गुंडपुंड कारभारातून मुक्त करून सुशासन देणारे नितीशकुमार हेच का, असा प्रश्न पडावा इतपत नितीशबाबू यांचा कारभार ढिला झाला आहे.

गंगा आणि कोसीचा प्रलय बिहारसाठी काही नवा नाही, मात्र प्रलय न येताही अतिवृष्टी झाल्यावर एखादे शहर बुडू शकते याचे उदाहरण नितीशकुमार यांच्या प्रशासनाने पाटणा शहरात दाखवून दिले आहे. बिहारमध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, मात्र तेथील जनता विरोधी पक्षाची भूमिका वठवताना दिसत आहे. जनतेचा हा क्षोभ लक्षात घेऊनच एरवी बेताल बडबड करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह कधी नव्हे ते मुद्दय़ाचे बोलले.  ‘ताली भी सरदार को तो गाली भी सरदार को’ असे सांगत त्यांनी सुशासनाचे श्रेय नितीशबाबू घेत असतील तर कुशासनची टीकाही त्यांनी सहन करावी, असा हल्लाबोल नितीशकुमार यांच्यावर केला आहे. एवढय़ावरच न थांबता स्वपक्षीय उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही त्यांनी फटकारले आहे. ‘यदी सुशील मोदी हमारे नेता है और पार्टी में सारा श्रेय उनको जाता है तो उन्हे आलोचना भी उठानी पडेगी’, असे सांगत गिरिराज यांनी बिहारी मोदींचे कान टोचले. पाच वेळा मुख्यमंत्रीपद मिळाल्याने एक प्रकारची राजकीय बेफिकिरी नितीशबाबूंमध्ये हल्ली जाणवते आहे, मात्र ही बेफिकीरी ‘शतप्रतिशत’च्या अधूनमधून आरोळ्या ठोकणाऱ्या भाजपला परवडणारी नाही. बिहारची जनता ही राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ आणि संवेदनशील आहे. याच जनतेने नितीशकुमार यांच्यात आशेचा किरण दिसल्यावर लालूंचे जंगलराज संपवले होते, मात्र तीच जनता आता एखादे नवे नेतृत्व पुढे आले तर नितीशबाबूंच्या सत्तेची वळकटी वळू शकते याचे  भान संबंधितांनी ठेवायला हवे. पाटणा कुणी बुडवले यापेक्षा ते का बुडाले? याच्या तळाशी जाऊन सत्ताधारी जनता दल (संयुक्त), भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विचार करायला हवा. अन्यथा पुढील वर्षी बिहारी जनताच सत्ताधाऱ्यांचे ‘सिंहासन’ पाण्यात बुडवेल.

गांधी जयंतीचा असहकार

gandhi-f

महात्मा गांधी नक्की कोणाचे, असा प्रश्न पडावा इतपत गांधीजींचे श्रेय उपटण्यावरून भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांत गेल्या आठवडय़ात लठ्ठालठ्ठी झाली. गांधीजी आमचेच असे सांगताना काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास उगाळते तर गांधीजी आम्हाला ‘प्रातःस्मरणीय’ असल्याचे सांगत भाजपवाले पंतप्रधान मोदी यांनीही गांधीजींप्रमाणे सुतकताई केल्याचे सांगत असतात. गांधीजींनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि सहिष्णुतेची शिकवण दिली, मात्र त्याच गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांचा असहकारच केला. हल्ली भाजपलाही गांधीजी महत्त्वाचे वाटू लागले आहेत. त्यामुळे राजघाटावर  सकाळी झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह इतर नेतेमंडळी उपस्थित होती. त्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमालाही पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी ही मंडळी उपस्थित होती. अर्थात, राजघाटावर मोदी आणि सोनिया आमने सामने आल्यानंतरही त्यांनी एकमेकांना साधा नमस्कार-चमत्कारही केला नाही. सेंट्रल हॉलमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. नव्या दमाच्या राहुल गांधींनीही पंतप्रधान म्हणून का होईना मोदींना नमस्कार करायला हवा होता, मात्र तो केला नाही. मोदी यांनीही पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षातल्या लोकांना राम राम करायला हवा होता तोदेखील झाला नाही. अनेक सरकारे आली. त्यांच्यात आपापसात राजकीय कटुता होती, मात्र वैरभाव कधीच दिसून आला नाही. इंदिरा गांधींवर त्यांचे विरोधक हुकूमशाहीचा आरोप नेहमीच करायचे, मात्र इंदिराजींनी शिष्टाचाराचे संकेत कधी पायदळी तुडवले नाहीत. आता चित्र वेगळेच दिसत आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमालाही सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी शिष्टाचाराचे संकेत पाळले गेले नाहीत.

जेटलींच्या कुटुंबीयांना सलाम..!

arun-jaitley-family

राजकारण म्हणजे केवळ खिसेभरूंचा उद्योग आहे अशी टवाळकी करणाऱ्या बुद्धिवाद्यांच्या डोळ्यांत दिवंगत अरुण जेटलींच्या कुटुंबीयांनी झणझणीत अंजन घातले आहे. जेटली गेले तरी त्यांच्या आठवणी अजूनही कायम आहेत. मुळातच एक प्रचंड यशस्वी वकील असणारे अरुण जेटली राजकारणात आले ते समाजसेवेसाठी. राजकारणात येऊन पैसे कमावण्याचा त्यांचा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे आपल्याला जे  सुख मिळाले ते इतरांना वाटावे याच वृत्तीने ते नेहमी वागले. सरकारी बंगल्यात ते कधीच राहिले नाहीत तर भाजप आणि विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या निवासासाठी त्यांनी आपले घर जणू समर्पितच केले. याच बंगल्याच्या हिरवळीवर अनेक कार्यकर्त्यांच्या लग्नाचे स्वागत समारंभ जेटलींनी स्वखर्चाने केले. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे रिसेप्शन जेटलींच्या सरकारी बंगल्याच्या हिरवळीवर झाले होते. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मुलांसह अनेक होतकरू तरुणांना जेटलींनी फुकटात वकिलीचे धडे शिकवले, आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला आपल्या मुलांच्याच महागडय़ा शाळेत शिकवले, अनेक गरीब विद्यार्थ्यांना विदेशात शिकायला स्वखर्चाने पाठवले. अशा दिलदार जेटलींचा वारसा त्यांच्या कुटुंबीयाने त्यांच्या पश्चातही पुढे चालवला आहे. जेटलींच्या निधनानंतर त्यांना माजी खासदार या नात्याने मिळणारे सगळे पेन्शन राज्यसभेत काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे आणि ही रक्कम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावी, अशी विनंती जेटली यांच्या पत्नी संगीता यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे. जेटली यांच्या पश्चात जेटलींच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या