बिली ग्रॅहॅमनंतर?

>>डॉ. विजय ढवळे

बायबल कोळून प्यायलेला, अमेरिकेच्या आठ अध्यक्षांबरोबर जवळीक असलेला, टीव्ही माध्यमातून सुमारे दोन अब्ज ख्रिश्चन जनतेशी प्रभावी संवाद साधणारा धर्मगुरू बिली ग्रॅहॅम ९९ व्या वर्षी निधन पावला तेव्हा त्याचा मृतदेह कॅपिटॉल हिलवर दर्शनाकरिता ठेवला होता आणि तिथे लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती. अमेरिकेच्या इतिहासात फक्त चौथ्या खेपेलाच असा सन्मान व्यक्तीला देण्यात आला होता. पहिल्यांदा रोझा मार्क्स या कृष्णवर्णीय स्त्रीला – जिने अलबामामध्ये बसमध्ये मागच्या बाजूला काळय़ा लोकांकरिता राखीव जागेवर बसण्यास १९५५ साली नकार दिला आणि त्यातून समान हक्क कायदा संमत झाला. नंतरचे दोघे पोलीस ऑफिसर्स होते की, जे On Duty मृत पावले होते – आता चौथा बिली ग्रॅहॅम. नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या शार्लेट या राजधानीच्या शहरात १० मोटारींचा ताफा ग्रॅहॅमचा मृतदेह वाहून नेत होता. दुतर्फा हजारो लोकांनी हातात बायबल घेऊन त्याला मानवंदना दिली. भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन हे जातीने हजर होते. बिलीने अगणित व्याख्याने दिली. त्याचा अभूतपूर्व गौरवही झाला. प्रेसिडेंशियल गोल्ड मेडल देऊन व्हाईट हाऊसमध्ये सत्कारही झाला. सतत सहा दशके तो तीक्र प्रकाशझोतामध्ये होता. २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला.

शेवटची काही वर्षे अनेक व्याधींनी त्रस्त झालेल्या बिलीचे विस्तृत साम्राज्य त्याचा मुलगा फ्रँकलिन याच्या ताब्यात गेले. वडिलांचा करिष्मा नसला तरी त्यांच्या पुण्याईच्या जोरावर त्याने वाटचाल चालूच ठेवली. त्याने अध्यक्ष ट्रंपला आपला पाठींबा जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाह कायदेशीर असल्याचे सांगितल्यावर त्याचा निषेध केला. ‘‘अॅब्राहम हा ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रणेता. त्याला मुस्लिमांनी ‘हायजॅक’ केले आहे’’असेही स्फोटक विधान फ्रँकलिनने बिनधास्तपणे केले होते आणि अशा अनेक घटनांमुळे बिली आणि फ्रँकलिन यांच्यामध्ये गेली कित्येक वर्षे सुसंवाद नव्हता. फ्रँकलिनची बहीण अॅन लोटझने २०१६ मध्ये ‘टाईम’ मासिकाला मुलाखत दिली तेव्हा म्हटले होते, ‘‘डॅडींनी ११ सप्टेंबर, २००१ च्या न्यूयॉर्कमधील आतंकवादी हल्ल्यानंतर जे सांगितले होते ते जगातल्या कोणत्याही धर्मगुरूला शक्य झाले नसते. फ्रँकलिनला तर मुळीच नाही!’’ अॅन हीसुद्धा धार्मिक प्रवचने देते. रॅली या नॉर्थ कॅरोलिनामधील शहरात तिचे चर्च कार्यरत आहे.

बिली ग्रॅहॅममध्ये इतर धर्मगुरूंना कमी न लेखता, त्यांच्या सहकार्याने व पाठिंब्याने एकत्रपणे ख्रिश्चन मूलभूत धर्मतत्त्वांचा प्रचार व प्रसार करण्याची अभूतपूर्व शक्ती होती. तो कोणालाही कमी लेखत नसे की सापत्न वागणूकही देत नसे. आज राजकारण, मुस्लिमांचा दहशतवाद, समलिंगी लोक, स्त्रियांचे प्रश्न यावर अमेरिकेत वादंग माजले आहेत. धर्मगुरू टोकाची भूमिका घेतात याचे कारण त्या सर्वांना समजून घेणारा, समस्यांचा काथ्याकूट करण्यापेक्षा त्यावर तोडगा शोधून काढणारा बिली ग्रॅहॅम आता ख्रिस्तवासी झाला आहे!

एका माणसाची सावली ही कित्येक वर्षे गडदपणे किती प्रभावशाली असू शकते याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. म्हणूनच कॅलिफोर्नियामधील लेक फॉरेस्ट भागातल्या सॅडलबॅक चर्चमधला पॅस्टर रिक वॉरेन म्हणाला होता – ‘‘ग्रॅहॅम गेला आणि जगात अपरिवर्तनीय बदला घडला आहे, पण त्याची कार्यधुरा ज्याच्या खांद्यावर आहे त्या फ्रँकलिनची पार्श्वभूमी तरी काय आहे? कॉलेजात असताना दारू पिऊन (व्हिस्कीधुंद झाल्याने) धिंगाणा घातल्याने त्याला काढून टाकण्यात आले होते. शेवटी बापाने रदबदली करून २९ व्या वर्षी त्याला पुन्हा कॉलेजात प्रवेश मिळवून दिला होता. फ्रँकलिनने वडिलांना मदत करण्याचे धोरण त्यावेळेपासूनच ठेवले होते. शिवाय स्वतःची ‘सॅमॅरिटन पर्स’ नावाची मानवी मूल्यांचे जतन करणे हे ध्येय असलेली संस्थाही काढली. बिली ग्रॅहॅम हा रिचर्ड निक्सनचा निकटवर्ती मानला जात असे. परंतु जेव्हा निक्सनची दुष्कृत्ये, वॉटरगेट, डेमोक्रॅटिक प्रचार मोहिमेला बेकायदेशीर सुरुंग लावण्याचे प्रयत्न उघडकीला आले व ८ ऑगस्ट, १९७४ रोजी त्याला लाजीरवाणा राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हापासून बिली नेहमी अध्यक्षांपासून सुरक्षित अंतरावर राहिला. २०१६ साली फ्रँकलिनने देशातल्या सर्व ५० राज्यांतून बसने प्रवास केला तेव्हा ट्रम्पला सहानुभूती दाखवणारी भाषणे तर केलीच, पण मुस्लिम देशांतून येणाऱ्यांवर बंदी घातली पाहिजे हे त्याने ट्रम्पच्या आधीच जाहीर केले होते!

फ्रँकलिनच्या प्रचार मोहिमेमुळे ६० टक्के ख्रिश्चन धर्मतत्त्वे मानणाऱयांनी ट्रम्पच्या पारडय़ात आपली मते टाकली. तो म्हणतो, ‘‘अमेरिकेत नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आपण पाप करण्यात गैर आहे असे कोणाला वाटत नाही व ती खरी शोकांतिका आहे. माणूस हा स्वार्थी, आपमतलबी व कोत्या मनोवृत्तीचा बनला आहे.’’ मात्र त्याची बहीण अॅन ही इतकी स्पष्टवक्ती नाही. देव फ्रँकलिनचा वापर करून घेत आहे असे तिने एका प्रवचनात सांगितले! ही ६२ वर्षांची स्त्री तिच्या भावापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. तिचा गर्भपात आणि समलिंगी विवाहांना तीक्र विरोध आहे. राजकारण हे अपरिहार्य असले तरी त्यामध्ये धर्मगुरूंनी सातत्याने सामील होऊन मतप्रदर्शन करावे हे तिला मान्य नाही. त्यामुळे तिचा आवाकाही मर्यादित आहे. तिच्या संस्थेला दरवर्षी सुमारे १ दशलक्ष डॉलर्स देणगी रूपाने मिळतात तर Firebrand फ्रँकलिन त्यांच्याहून १०० पटींनी जास्त देणग्या जमवतो. ती मवाळ आहे, शिवाय स्त्री आहे या गोष्टीही तिच्या विरोधात जातात.

१९२५ साली अमेरिकेमध्ये फारसे धर्ममंथन होत नव्हते. अशा वेळी बिली ग्रॅहॅमचा उदय झाला. त्याचे वक्तृत्व मोहिनी घालणारे होते. बायबलचा अभ्यास वाखाणण्यासारखा होता. मुख्य म्हणजे प्राचीन काळातली उदाहरणे देत न बसता त्याने ख्रिश्चन धर्मतत्त्वे आजच्या काळातही तितकीच कशी महत्त्वाची आहेत व त्यांचा अवलंब करणे म्हणजेच ख्रिस्तसेवा आहे हे अमेरिकन्सच्या गळी उतरवले. बाबा रामदेव हे योगगुरू आता पतंजली उत्पादने विकून हजारो कोटींचे मालक बनले आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्या हिंदुस्थानची लूट करीत आहेत म्हणून आम्ही देशात निर्माण केलेली निर्भेळ उत्पादने वापरा हा त्यांचा टीव्हीवर सतत संदेश असतो व त्याचा प्रचंड प्रभाव पडला आहे. फ्रँकलिनने फक्त ख्रिश्चन धर्म, त्यामधील उपदेश याचेच जन्मभर भांडवल केले आणि वडिलांनी कमावलेले नाव, कीर्ती व अफाट संपत्ती शाबूत ठेवली. बिली ग्रॅहॅम हा कोणी साधू पुरुष वा महात्मा नव्हता. निक्सनच्या टेप्स प्रसिद्ध झाल्या तेव्हा त्याने ज्यू लोकांविषयी अपशब्द काढल्याचे उघडकीस आले होते, परंतु त्याचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, त्याच्याविषयी फारसा अनादर कोणालाही बाळगणे शक्य होत नसे. त्याचा स्वभाव दिलखुलास होता.

बिली नव्वदीत शिरला तेव्हा अमेरिकन लोकांच्या विचारसरणीत मूलभूत बदल झाला होता. १/३ लोकसंख्या धर्म मानत नाही असे सर्वेक्षणात दिसून येत होते. फक्त ४१ टक्के जनता धर्माचे आमच्या जीवनशैलीत महत्त्वाचे स्थान आहे असे कबूल करीत होती. आता जी नवीन धर्मगुरूंची टीव्हीवर प्रवचने चालतात, त्यामध्ये बिली ग्रॅहॅमची एकांगी भूमिका समर्थनीय मानली जात नाही. मुख्यतः विवाहाच्या बाबतीत. जर दोन प्रौढ व्यक्ती एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध ठेवत असतील तर ते पाप आहे, धर्माच्या विरुद्ध आहे. कारण ते समलिंगी आहेत, असे सांगण्याचा कोणालाच अधिकार नाही, असे हे आधुनिक धर्ममार्तंड सांगतात. त्याला उत्तर म्हणून २०१६ साली शिकागोत एका कृष्णवर्णीय प्राध्यापिकेने संततीनियमन गोळय़ा कॅम्पसवर मशिन्समधून उपलब्ध व्हाव्यात असा प्रचार केला तेव्हा मूलभूततत्त्ववादी ख्रिश्चनांनी तिच्या विरुद्ध रान उठवले व शेवटी तिला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. तेव्हा सर्वच ठिकाणी उदारमतवादी विचारसरणीचा विजय होतो असे दिसत नाही.

टेड क्रूझ, मारिओ कोमो, जेब बुश किंवा मार्को रुबियो यांच्याकडे ख्रिश्चन धर्मपालन करण्याचा प्रथम कल होता, पण प्रायमरी निवडणुकांत ट्रम्पने प्रत्येकावर शरसंधान करून त्याचा खात्मा केला व त्याच्या मदतीला फ्रँकलिन ग्रॅहॅम ठामपणे उभा राहिला. ट्रम्पचे तीन विवाह, आत्मप्रौढी, इतरांचा अपमान करणारी भडकाऊ भाषणे यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकन्सनी त्याला व्हाईट हाऊसमध्ये पाठवले. आपली कारकीर्द वर्षभराची होते न होते तोच ट्रम्पने २०२० साली ‘‘मी पुन्हा उमेदवार असणार आहे’’ असे बेधडकपणे जाहीरही करून टाकले आहे व त्याचा पाठीराखा फ्रँकलीन गॅहॅम याच्याही लोकप्रियतेत वाढ झाली आहे. फेसबुकवर त्याचे साडेतीन दशलक्ष ‘फॉलोअर्स’ होते ते आता साडेसहा दशलक्ष झाले आहेत. या समीकरणाची दुसरीही बाजू आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा बिली ग्रॅहॅमच्या अंतिम शोकसभेला जिवंत असलेले सर्व अमेरिकन अध्यक्ष हजर राहतील अशी अटकळ होती, पण दोन मार्चला जी शोकसभा झाली त्यावेळी फक्त विद्यमान अध्यक्ष ट्रंपच होते, इतर कोणताही अध्यक्ष नव्हता. ना बुश पितापुत्र, ना क्लिंटन, ना ओबामा. अमेरिकेतली धार्मिक दरी अधिकच रुंदावल्याचे हे चिन्ह आहे.

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)