‘कर्ण खरा’ – एक सुवर्ण महोत्सव

ज्येष्ठ विचारवंत आणि संतवाङ्मयाचे अभ्यासक दाजी पणशीकर यांनी लिहिलेल्या ‘कर्ण खरा कोण होता?’ या लेखमालेला 10 डिसेंबर, 2022 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 1972 मध्ये दै. ‘मराठा’मध्ये ही लेखमाला प्रसिद्ध झाली होती. या लेखमालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ठाणे येथील स्टेशन रोडवरील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या रेगे सभागृहात एक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला असून ‘अपरिचित रामायण’ या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाच्या दुसऱया आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे. यानिमित्त स्वतः दाजी पणशीकर यांनी या लेखमालेबद्दल सांगितलेली पार्श्वभूमी…

मराठी ललित साहित्यात महाभारतातील कर्णासंबंधी एकाएकी उदात्तीकरणाची लाट आली. कोणी कादंबरी, तर कोणी नाटक, तर कोणी व्यक्तिचित्रण, तर कोणी मनोविश्लेषण, तर कोणी काही, कोणी काही अशी कर्णासंबंधी साहित्यकृती घडवू लागला. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ मुळातून वाचण्यासाठी लागणारी आवड व सवड ही वाचकांमध्ये प्रायः कमीच आढळते. त्यातून महाभारतासारख्या अतिप्रचंड, जटिल आणि गुंतागुंतीच्या कथानकातील एखाद्या व्यक्तिरेखेचे ललितलेखकाने केलेले प्रकटीकरण हे मूळ ग्रंथाला धरून आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करून सत्य-असत्याची शहानिशा करून घेणे तर फारच कठीण! जवळजवळ नाहीच. अशा परिस्थितीत एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा जर एखाद्या लेखकाने आपल्या प्रतिभेने स्वतःला अनुकूल अशी, परंतु मूळ ग्रंथातल्या चित्रणापेक्षा वेगळीच रंगविली तर, लोकमानसात तीच प्रतिमा कायमची घर करून बसते असा अनुभव आहे.

सध्याचे युग हे समर्थनाचे युग आहे. त्यामुळे दुर्दैव, दुर्गुण, दुराचार, दुर्विचार, दुष्कर्म ह्यांचे समर्थन करण्याची जणू स्पर्धाच लागलीय की काय, असे वाटते. व्यक्तिगत जीवनात काsंडलेल्या दुर्वासनांना वाट मोकळी देण्यासाठी एखाद्या ऐतिहासिक, परंतु दुर्गुणी व्यक्तित्वाच्या पडद्याआड लपून त्याच्या दुर्गुणांचे समर्थन करण्यात स्वतःची भूक शमविण्याचा तर हा प्रयास नसेल, अशीही अशुभ शंका मनात डोकावून जाते. विशेषतः कर्णासारख्या एका व्यक्तीवर शैलीदार लेखणीने यच्चयावत सद्गुणांची झूल घालण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तर, हा प्रयत्न म्हणजे केवळ चिरंतन मूल्यांचेच अवमूलन होत नसून, एकूणच समाज ऱहासाची ती नांदीही वाटते. म्हणूनच असा जेव्हा केव्हा प्रयत्न होतो तेव्हा प्रवाहाविरुद्ध जाण्याचा धोका पत्करूनही, जीवनमूल्यांचे अवमूलन थोपविणे हे एक सामाजिक कर्तव्य ठरते.

कर्णाच्या दुर्दैवाने त्याला क्षत्रियत्व लाभले नाही म्हणून त्याचे दुःख, तो एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या व्यक्तिगत दुःखाशी आपणही सहभागी होणे, हे आम्ही मानवतेच्या भूमिकेतून समजू शकतो; परंतु दुर्दैवी कर्णाच्या हातून मानवतेला काळिमा फासणाऱया घटना घडू लागतात तेव्हा त्याही कृत्याचे मानवतेच्या दृष्टीने समर्थन करणे हा भाबडेपणाचा प्रकार ठरत असतो.

अशा परिस्थितीत कर्णाचे स्वरूप जनसामान्यांसमोर आणावयाचे असेल तर त्यासाठी एखाद्या दैनिकात एक स्वतंत्र लेखमाला लिहिणे आवश्यक होते. एकामागून एक प्रकाशित होणाऱया कर्णावरील ललितकृतींमुळे एकूण समाज अशा कल्पित कर्णाचा इतका काही भक्त होऊन गेला होता की, आमच्या चिंतनाला वाट करून देण्यासाठी कोण संपादक तयार होणार? अशा चिंतेत असतानाच दैनिक ‘मराठा’च्या संपादिका शिरीष पै यांनी आमची लेखमाला ‘मराठा’च्या रविवार पुरवणीतून क्रमशः प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. प्रस्थापित कर्णाच्या ललित चित्रणापेक्षा आम्ही चित्रित केलेला कर्ण निश्चितच वेगळा होता, विरुद्ध होता.

आमच्या सर्वच लेखनात ठायी ठायी अभिनिवेश जरूर आहे. तो मान्य करूनही येथे ‘माणूस’ असलेल्या कर्णाचा ‘समाज’ म्हणून आलेख काढण्याचा एक प्रयत्न केला आहे. ज्याच्या व्यक्तिगत दुर्गुणांच्या प्रचंड झंझावातात संपूर्ण समाजविध्वंसन होते तो कर्ण म्हणूनच दोषार्ह ठरतो. याला साहित्यात आणि अप्रत्यक्षपणे समाजात प्रतिष्ठत करणे ही आत्मवंचनाच ठरणार आहे. तसे होऊ नये म्हणून लेखमाला प्रपंच होता.