मायलेकी आणि त्यांचे मर्मबंध

>> नमिता दामले

मनीषा दीक्षित यांची ही तिसरी कादंबरी डायरी. झटपट लिहून, वाचून टोकदार परिणाम साधत नसले तरी खोलवर परिणाम करणारे कादंबरी हे एक सशक्त माध्यम आहे आणि याचा प्रत्यय डायरी वाचून पुनश्च आला. या डायरीमध्ये सहृदय स्त्रियांना आपले प्रतिबिंब तर पुरुषांना प्रतिमा दिसतील त्यांच्या अवतीभवतीच्या जगातल्या.

आत्मकथानात्मक शैलीच्या ढंगाने जाणाऱ्या या कादंबरीतून शारदा, नंदिनी आणि आभा वाचकांशी थेट संवाद साधतात. प्रतिमाची व्यक्तिरेखा अत्यंत कणखर आणि संवेदनक्षम आहे. शारदाच्या डायरीतून मायलेकींच्या नात्याचे अनेक पडसाड उलगडत जातात. आजी आणि आईच्या जीवनातील न उमजणाऱ्या सत्यांची उमज पाडणारी ही डायरी आभाला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर भक्कम पाया देते. तिच्या अस्थिर व्यक्तिमत्त्वाला एक उत्तम आकार देते. डायरीतील आजीचे मनोगत हा या कथानकाचा गाभा आहे.

दादा, श्री आणि अजय हे पुरुषांचे तीन भिन्न चेहरे. दादा जुन्या पिढीतले तर श्री आणि अजय समकालीन. शारदा आणि बडी माँ एकाच पिढीच्या, पण तरी त्यांच्या मानसिकतेही प्रचंड तफावत आहे. शारदा आणि नंदिनी या मायलेकीची भावनिक जवळीक आणि नंदिनी आणि आभा यांचे दुरावलेपण आणि त्यांचे नंदिनीच्या आयुष्यातील पडसाद हे कादंबरीचे स्पंदन आहे. शारदाने जे भोगले त्यावरची तिची प्रतिक्रिया आणि नंदिनीने जे हट्टाने केलं त्यासाठी तिने मोजलेली किंमत यांच्या बेरीज-वजाबाकीतून आपण काय उत्तर काढतो हे फार महत्त्वाचे.

आभा आणि प्रतिभा ही तिसरी पिढी. त्यांचे स्वातंत्र्य मोलाचे आहे. दोघीही आईपासून वेगवेगळया कारणांनी दुरावलेल्या घट्ट मैत्रिणी. प्रतिमाची समजूत शाश्वत करणारी आणि आभाची अढी अस्वस्थ करणारी. काळ खरंच बदलला आहे का. कुटुंबातील स्त्रीच्या जबाबदाऱ्या, तिला गृहित धरणे, कामांची विभागणी कोण ठरवणार, स्त्रीच स्त्रिची शत्रू आहे का, पुरुषांची मानसिकता प्रगतिशील बनते आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण करणारी ही ‘डायरी’ मनाचा आणि समाजाचा आरसा आहे.

डायरी
लेखिका : मनीषा दीक्षित
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ       : २९६, मूल्य : रु. ३५०