गंगादशहरा समाप्ती : जय गंगे भागीरथी!

ravindra-gadgil>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

जय गंगे भागीरथी. गंगा ही केवळ एक नदी नाही तर भारताचा इतिहास, भूगोल, साहित्य संस्कृती या सर्वांचा गतीप्रवाह गंगेच्या प्रवाहाशी जणू एकरूप झाला आहे. आपल्या संस्कृतीचे खास वैभव असे की आपण नेहमीच निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. इथला निसर्ग, इथले पाउसपाणी आणि इथली एकूण परिस्थिति नेहमीच्या जगण्यावागण्यात प्रतिबिंबीत व्हावी, अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे आणि ही रचना हजारो वर्षे अबाधितपणे आचरणात आणली जात आहे. नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र, त्यात गंगा ही जास्तच पवित्र. अगदी शपथ घ्यायची झाली तरी ‘गंगा की सौगंध’ म्हणून घेतली जाते. ही गंगा भूतलावर जेंव्हा अवतीर्ण झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमी.

या आधी दहा दिवस दहा विविध फुलांनी, फळांनी दहा प्रकारच्या उपचारांनी पूजा केली जाते. त्यामुळे दहा पापांचा नाश होतो असे मानतात. ईश्वाकू कुळातील राजा भगीरथ याने ही नदी भारतवर्षात आणली, अशी कथा आहे. एका ऋषींच्या शापामुळे आपल्या सागर नावाच्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगा येथे भगीरथाने पृथ्वीतलावर आणली. त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली व यश मिळवले. समुद्राजवळ मृत झालेल्या सागराच्या पुत्रांचा तिने उद्धार केला म्हणून समुद्राला आपण सागर म्हणतो. त्याचा उगम गंगेच्या उगमाशी आहे. म्हणून आजही आपल्या कष्ट व प्रयत्नांना यश येण्यासाठी भागीरथ प्रयत्न असे म्हंटले जाते.

गंगा ही हिमालयची कन्या ती सागराला मिळते. गंगा ही फक्त शिवमंगलाच नव्हे तर ज्ञानाची आणि परमसौंदर्याची साक्षात मूर्ति आहे, म्हणूनच महेश्वर तिला मस्तकी धरण करतो. सर्वांची माता असलेली आणि सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी गंगा ही सर्व प्रकारच्या पापांचा तापांचा नाश करणारी आहे, अशी भारतीयांची पुर्वांपार धारणा आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ होतो. तेथून पुढील दहा दिवस गंगेचे स्मरण पूजन केले जाते. धार्मिक उत्सवाला आज प्रारंभ होतो. ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती होते. त्यालाच ‘गंगादशहरा’ असे म्हणतात.

आपली बहुतेक तीर्थक्षेत्रे महानद्यांच्या तीरावर वसलेली आहेत. आपली मानव वस्ती सुद्धा नद्यांच्या कडेकडेनेच वसलेली आहेत, म्हणूनच आपल्याला ‘सिंधु संस्कृती’ असे नाव पडले आहे. गोदावरी तीरावर रामकुंड,पंचवटी,त्र्यंबकेश्वर,वणीची सप्तशृंगी,शिर्डीचे साईबाबा,शनि शिंगणापूर आहेतच. तीर्थराज काशी ही गंगाकिनारी वसली आहे. यमुनेच्या तिरावरही अनेक क्षेत्रे आहेतच. यमुनेची परिक्रमा,यमुनेचे पर्यटन हे कित्येकांचे परम ध्येय ठरलेले आहेत. ‘हर नर्मंदे’ असा जयघोष करत कित्येकांची नर्मदा परिक्रमा चालू असते. गंगा निर्मलच आहे पण आपण मानव जात मात्र एखाद्या कृतघ्न करंटया माणसासारखे तिच्याशी वागतो. “ राम तेरी गंगा मैली” तिला आपण प्रदूषित केले आहे. आता केंद्र व राज्य सरकारे मिळून ‘सुवर्ण चतुष्कोणी नदीजोड प्रकल्प’ खूप पैसा खर्चून एक महाप्रकल्प साकार करीत आहेत. त्याला आपण खोटा विरोध न करता, आपलाही अल्पस्वल्प हातभार लावून ही भारतभूमी हरीतभरीत करू या व पूर्वीचीच ‘सुवर्णभूमी’ म्हणून प्रसिद्धी तिला प्राप्त करून देऊ या.

गंगा आणि यमुना यांचे पाणी निर्मल व शुद्ध आहे. शरीराने नाही, तर मनाने तरी तिथे जावे. म्हणून आपण आंघोळीच्या वेळेस ‘गंगेचे श्लोक’ म्हणतो. जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला त्या श्लोकाद्वारे होतो. कारण गंगास्नान हे पुण्यकरक व पापनाशक आहे. गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषधी गुणधर्म असल्याचेही सांगतात. आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते. मोगल बादशहा स्वारीस जातांना गंगेचे पाणी आपल्याबरोबर भरून घेत असे. त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी पिण्यास चालत नसे. आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात शेवटी गंगाजल व तुलसिपत्र घालतात. “काशीस जावे नित्य वदावे” स्नान नाही निदान दर्शन तरी व्हावे अशी प्रत्येक हिंदूंची इच्छा असते. धार्मिक पूजेच्या वेळी जरी विहीरीचे, तलावाचे, नदीचे, कालव्याचे, नळाचे पाणी वापरत असलो तरी ते मंत्र म्हणून आपण त्याचे रूपांतर गंगाजलात करतो. “ गंगे चे यमुने चैव, गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी, जलेस्मिन सन्ंनिद्धीम कुरू.” हा अतिशय महत्वाचा पंचनद्यांचा उल्लेख असलेला मंत्र आपण म्हणतो.

गंगा यमुनेचे स्थान आपल्या संस्कृतीत तेवढेच मोलाचे आहे. पंडित जगन्नाथ यांनी गंगेवर आधारित बावन्न श्लोकाचे स्तोत्र ‘गंगालहरी’ हे प्रासादिक काव्य लिहिले आहे. त्यांच्या हातून एक प्रमाद घडला. ज्या बादशहाने त्यांना राजकवि ही पदवी बहाल केली, त्यांच्याच मुलीच्या प्रेमात ते आकंठ बुडाले, परंतु समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांना अपमानित केले. त्यावेळी ते गंगेला शरण गेले व त्यांनी गंगेची स्तुतीपर श्लोक निर्माण करून गंगेची प्राप्ती करून घेतली व गंगेनेच त्यांना पोटात घेतले. गंगेवर शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली,कालिदास,अशा अनेकांनी काव्यरचना केली आहे. अनेक अडचणींवर मात करीत, सभोवतालीच्या झाडाझूडपांना,पशुपक्षांना पाणी देत,वाढवीत, अनेक लोकांची तहान भागवीत,ही धरती सुजलाम सुफलाम बनवीत, गंगा आपल्या प्रियकरला म्हणजे सागराला जाऊन मिळतेच, तसेच आपणही आपले ध्येय समोर ठेऊन अनंत अडचणींवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करू या. “जय गंगे भागीरथी”.