महाराष्ट्रात पावसाचा विरोधाभास का?

466

>> श्रीनिवास औंधकर

मुंबईसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यापर्यंत आणि सर्वत्र पश्चिम घाटमाथ्यावर सध्या पावसाने खूप मोठय़ा प्रमाणात थैमान घातले आहे. धुळे, नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागवान प्रदेश, संपूर्ण पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातीलच विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिह्यांत पावसाने म्हणावी तशी सुरुवातही केलेली नाही. या वर्षी अशी परिस्थिती निर्माण का झाली, या विरोधाभासावर टाकलेला प्रकाश…

सूर्यावरील सौरडागांची संख्या कमी झाल्याने पृथ्वीवर हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या बाराहून अधिक वर्षांपासून मी जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कुलिंगवर संशोधन करत आहे. येणारा काळही जागतिक तापमानात घसरण दर्शविणाराच दिसतो आहे. दोन्ही गोलार्धातील ध्रुवीय प्रदेशात कमालीची थंडी पडलेली दिसत आहे. गेल्या हिवाळय़ात उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये त्याचा फटका दिसून आला. अतिशय थंड वाहणारे ध्रुवीय वारे दक्षिणेला सरकल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईकरांनादेखील स्वेटर घालायला भाग पाडले.

इतिहासात मागे वळून पाहिले तर दोन वेळा छोटय़ा कालावधींचे हिमयुग आल्याची नोंद दिसते. ही हिमयुगे येण्याची कारणमीमांसा लक्षात घेतली तर सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण न झालेले सौरडाग (अथवा सोलर मिनिमम) हे प्रमुख कारण आहे. सौरडाग कमी निर्माण झाले की सूर्याकडून कमी प्रमाणात ऊर्जा स्रोत निर्माण होतो व यामुळे पृथ्वीवरील वातावरणाच्या वरच्या पातळीच्या तापमानात घट दिसून येते. सध्या त्याचाच परिणाम म्हणून एकूणच जागतिक पातळीवर तापमानात घट दिसून येत आहे.

त्याशिवाय, त्यामुळे पृथ्वीवर वैश्विक किरणांचा मारा वाढतो. पृथ्वीवर वैश्विक किरणांचा स्थिरांक वाढला की त्यामुळे विषुववृत्तावरील पावसाच्या ढगांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते व पावसाचे प्रमाणही वाढते. सौरडागांची संख्या ही परिस्थिती निर्माण करीत आहे. कारण सध्या सूर्यावरील सौरडाग साखळी क्रमांक चोवीस चालू आहे अन् ती पुढील वर्षी म्हणजे 2020 च्या जुलैदरम्यान न्यूनतम पातळी गाठेल असे अपेक्षित आहे, मात्र ही सौर साखळी वेळेआधीच म्हणजे या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान न्यूनतम पातळी गाठेल अशी भीती व्यक्त केली जात आहे व यानंतर सौरडागांची साखळी क्रमांक 25 सुरू होणार आहे.

मान्सून आगमनाला अल निनोचा फटका
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील तापमानाचा सतत अभ्यास केला जातो व या ठिकाणी असलेल्या तापमानात झालेल्या फरकाचा फटका अथवा फायदा जागतिक पातळीवर होतो असा निष्कर्ष काढला जातो. हिंदुस्थानच्या संदर्भात बोलायचे झाल्यास प्रशांत महासागरातील विषुववृत्ताच्या 3.4 या ठिकाणी असलेल्या तापमानातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. जर सरासरी तापमानापेक्षा 0.5 अंश तापमान वाढले की ही परिस्थिती अल निनो आहे संबोधले जाते व जर सरासरी तापमान 0.5 पेक्षा कमी असेल तर ती परिस्थितीला निना आहे असे संबोधले जाते. जर अल निनोची परिस्थिती असेल तर आपल्या हिंदुस्थानातील मान्सूनमुळे मिळणाऱया पावसात घट दिसून येते तर ला निना परिस्थितीमध्ये जास्त पाऊस मिळतो.

जून 2019 मध्ये केलेल्या निरीक्षणानुसार अल निनो 65 टक्क्यांवर होता व तो आपल्याकडील पावसाळा संपेपर्यंत 60 टक्क्यांवर पोहचेल अशी भीती केली गेली होती. यंदाच्या पावसाळय़ात अल निनोच्या या परिस्थितीमुळे आपल्याकडील पावसाला सुरुवातीला खो बसला व महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन जवळपास पंधरा ते वीस दिवस लांबले. एकूणच यंदाही मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण कमी असणार याचे स्पष्ट संकेत मी यापूर्वीच दिले होते.

मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण कमीच
5 ऑगस्ट रोजीच्या अल निनोच्या ताज्या घडामोडींनुसार प्रशांत महासागरातील तापमानात मोठय़ा प्रमाणात घट दिसून येत आहे. यामुळे अल निनो स्थिरांक आता 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील कमी झालेल्या तापमानामुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून येत आहे. परिणामतः मोठय़ा प्रमाणात निर्माण होणारा पाऊस आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ येथून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात दाखल होताना कमकुवत होतोय व वाऱयाच्या उत्तरेकडील दिशेमुळे मोठय़ा प्रमाणात मध्य प्रदेश, गुजरातमार्गे उत्तर हिंदुस्थानात पाऊस थैमान घालत आहे.

पृथ्वीवरील वैश्विक किरणांचा स्थिरांक वाढला की त्यामुळे विषुववृत्तावरील पावसाच्या ढगांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. लघु हिमयुगाच्या काळात विषुववृत्तीय ढग उत्तरेकडे सरकतात. आताही हे ढग उत्तरेकडे सरकत आहेत. त्याचा मुख्य फटका विदर्भ व मराठवाडय़ाला पुढील दोन वर्षे बसणार आहे.

‘धन आयओडी’मुळे पावसाचे थैमान
‘धन आयओडी’ स्थिरांकामुळे पश्चिम किनारपट्टीवर अर्थात कोकणात या वर्षी पुढील काळदेखील मोठय़ा पावसाचा असणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अर्थात कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच हा प्रदेश अरबी समुद्राकडून येणाऱया पावसाचा आहे व हा पाऊस आयओडी अर्थात इंडियन ओशन इंडेक्स हा धन किंवा सक्रिय असेल तर मोठय़ा प्रमाणात थैमान घालतो हा इतिहास आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील कमी झालेल्या तापमानामुळे हिंद महासागरातील इंडोनेशिया/ऑस्ट्रेलिया भागात म्हणजेच हिंदुस्थानच्या पूर्व बाजूकडील समुद्राचे तापमान अचानक घसरले व पश्चिम दिशेला म्हणजे मादागास्करकडील समुद्राच्या तापमानापेक्षा कमी झाले. यामुळे आयओडी स्थिरांक हा धन झाला. जुलै 12 पर्यंत आयओडी स्थिरांक कमकुवत होत होता व तो 0.4 अंशापेक्षा कमी जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र तो पुढील दीड-दोन महिन्यांत 1.2 अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन महिने मुंबईसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे, संपूर्ण पश्चिम घाटमाथा, धुळे, नाशिक जिल्हय़ातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागवान प्रदेश आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांत मोठय़ा प्रमाणात पावसाचे संकेत मिळत आहेत.

(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या