निरामय – कोरोना आणि आहार

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

कोरोना येऊन सहा महिने उलटून गेले आहेत. अजून त्यावर लस निर्माण व्हायची आहे. पण आपल्या सात्त्विक, पौष्टिक आहारातून आपण या महामारीला नक्कीच मात देऊ शकतो आपल्या नव्या ‘निरामय’ सदरातून!!

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरी आता अनलॉककडे प्रवास सुरू झाला आहे. हळू हळू सर्वच जण सामान्य आयुष्य जगण्याकडे वाटचाल करत आहेत. अनेक जण अजूनही घरूनच काम करत असले तरी काही ना काही कामानिमित्त बाहेर पडणं होतं.

आहारातून ऊर्जादायी पदार्थ, प्रथिने, स्निग्धपदार्थ व आवश्यक जीवनसत्त्व व खनिजे शरीराला पुरवली पाहिजेत. पण ज्यांचा घरच्या घरी वावर आहे व व्यायामाची कमी आहे अशांनी हलका आहार घेतला पाहिजे.

कर्बोदके – आहारात कर्बोदकांमध्ये धान्यांचा समावेश असावा. पोळी, पराठे, भाकरी, ठेपले, भाताचे प्रकार असे पदार्थ असावे. त्याच बरोबर न्याहारीमध्ये उपमा, पोहे, थालीपीठ, घावनं किंवा इडलीडोसे असे असावे.

प्रथिने – कडधान्य डाळी, उसळ, घरी लावलेले दही, ताक, दूध अशा प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असावा. अंडी व मांसाहारी पदार्थ बेताचे खावेत व ते चांगले शिजवून खावेत. ताज्या भाज्या व फळे यांचा समावेश आवर्जून करावा.

भाज्या – पावसाळी भाज्या किंवा विविध भाज्यांचा समावेश आहारात असावा. यामुळे शरीराला अनेक उपयुक्त घटक मिळतात.

त्याच बरोबर, मधल्या वेळेस एखादं फळ किंवा सुका मेवा असा पर्याय योग्य आहे. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं व खनिजे मिळण्यास मदत होते. अशा प्रकारे एक संतुलित आहार घेऊन प्रत्येकाने आपले आरोग्य जपणे गरजेचे झाले आहे. निरोगी असाल तर शरीराची सांसर्गिक रोगांवर मात करायची क्षमताही वाढते. म्हणूनच पौष्टिक खा, स्वस्थ राहा!

आपली प्रतिक्रिया द्या