आशा पारेख

चित्रपट सृष्टीत सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना घोषित झाला. एखाद्या महिलेस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी प्रख्यात गायिका आशा भोसले या फाळके पुरस्काराच्या मानकरी होत्या. आज नवी दिल्लीत 68व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी आशा पारेख यांना या पुरस्काराचे वितरण झाले. आधी ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्या आशाताई भोसले आणि आता ज्यांना हा पुरस्कार घोषित झाला त्याही आशाताईच. विशेष म्हणजे आशाताई पारेख यांचा येत्या 2 ऑक्टोबरला वाढदिवसही आहे.

रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश करणाऱ्या आशाताई पारेख आज 80 वर्षांकडे वाटचाल करीत आहेत. मुंबईत 2 ऑक्टोबर 1942 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला. तर ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून त्या सर्वप्रथम प्रमुख नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर झळकल्या. पन्नास वर्षांची त्यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द लखलखीत ठरली. ती रसिकांना भुरळ घालणाऱया अभिनयाने. ‘कटी पतंग, तिसरी मंजील, बहारों के सपने, प्यार का मौसम, मेरा गाँव मेरा देश, लव्ह इन टोकियो, आया सावन झुमके, आन मिलो सजना’, यासारखे 95हून अधिक चित्रपट सांगता येतील. विशेष म्हणजे कृष्णधवल चित्रपटांपासून ते रंगीत चित्रपटांच्या प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत. 1959 ते 1973पर्यंतचा काळ त्यांनी गाजवला. या काळातील त्या बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी नायिकांपैकी एक प्रमुख नायिका होत. हिंदी चित्रपटांमधील पहिला सुपरस्टार राजेश खन्नासोबत आशा पारेख ‘दिल देके देखो’, जब प्यार किसीसे होता है, तिसरी मंजील,’ या चित्रपटांत होत्या. विशेष म्हणजे आजही ‘कटी पतंग’ बघितला जातो, त्यातील गाणी अजरामर आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी आशाजींचा 1971 साली फिल्म फेअर या पुरस्काराने गौरव झाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1992मध्ये त्यांचा ‘पद्मश्री’ने सन्मान झाला. आशा पारेख या लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री तर आहेतच, पण त्याचसोबत त्या हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्यांगना, दिग्दर्शक व निर्मात्याही आहेत.

1952मध्ये ‘आसमाँ’ या चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी विमल रॉय यांच्या बाप-बेटी चित्रपटात त्यांनी भूमिका केली. नासीर हुसेन यांच्या चित्रपटात त्यांना 1959 साली ‘दिल देके देखो’ या चित्रपटात पहिल्यांदा नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अभिनेते शम्मी कपूर हे या चित्रपटात नायक होते. 1990च्या दशकात त्यांनी निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 1998 ते 2001पर्यंत त्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख होत्या. हा सर्वच प्रवास त्यांच्या ‘द हिट गर्ल’ या आत्मकथनात विस्ताराने आला आहे. आशा पारेख यांनी ज्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारल्या, त्याच्यावर चित्रित झालेली काही गाणी व चित्रपट यांचाही उल्लेख येथे करणे आगत्याचे व महत्त्वाचे वाटते. ‘ना कोई उमंग है’ (कटी पतंग), ‘मैना मिलुंगी’ (प्यार का मौसम), ‘रात का समय झुमे चंद्रमा’ (जिद्दी), ‘सौ सौ साल जियो’ (सौ दिन सास के), ‘हर खुशी हो वहाँ’ (उपकार), ‘ये कली’ (आये दिन बहार के), सुनो सजना (आये दिन बहार के), यही मेरी जिंदगी (जिद्दी), नाचे मन मोरा मगन (मेरी सूरत तेरी आँखे), मेरे दुश्मन (आये दिन बहार के), जाई ये आप कहाँ जाएँगे (मेरे सनम), छाई बरखाँ बहार (चिराग), तेरी आँखो के सिवा (चिराग), बोलो बोलो कुछ तो बोलो (दिल देके देखो) आणि जब चली ठंडी हवा (दो बदन) अशी अनेक सुपरहिट गाणी रसिकांना आठवतात.

प्रतिवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळणार याची उत्सुकता तमाम सिनेरसिकांना असते. आशा पारेख यांना हा पुरस्कार मिळतोय याचा आनंदच आहे. एक योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान झाला आहे.

प्रशांत गौतम