शिवराज्याचा व्यवहारकोश

>>राज मेमाणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला होता. मराठी राजभाषा दिनानिमित्त या ग्रंथाच्या निर्मितीची माहिती सांगणारा हा लेख.

पण अस्खलित मराठी बोलतो का हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारला तर बहुतांशी त्याचे उत्तर नाही असेच येईल. कारण मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागात वेगवेगळय़ा पद्धतीने बोलली जाते. विविध प्रांतांत बोलली जाणारी मराठी भाषा ही त्या-त्या प्रांताचे वैशिष्टय़ दर्शविते. मराठी भाषेच्या इतिहासावर नजर टाकली असता आपल्या असे लक्षात येईल की, आपण सर्वच जण आता जी मराठी बोलतो ती अस्खलित आणि शुद्ध मराठी भाषा नाहीच, तिच्यात अनेक मूळ फार्सी भाषेतील शब्द आहेत. आता आपण जी मराठी भाषा बोलतो त्यात शंभरपैकी जवळपास साठ ते सत्तर शब्द हे मूळचे फार्सी शब्द आहेत किंवा फार्सी भाषेतील शब्दांवरून तयार झालेले मराठी शब्द आहेत.

हे फार्सी शब्द मराठी भाषेत कसे काय आले, याचे उत्तर आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये सापडते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठय़ांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या आठव्या खंडाच्या प्रस्तावनेत याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी साधारणपणे इ.स. १२९० च्या सुमारास ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी ग्रंथातील मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने रसाळ आणि अस्खलित म्हणायला हरकत नाही. त्यातील श्लोक नुसते वाचले असता लक्षात येते की, आपण आताच्या काळात बोलत असलेली मराठी आणि त्या काळातील मराठी यात जमीन आस्मानाचा फरक आहे. इसवी सन १२९० पासून पुढे साधारण १३२८ सालापर्यंत महाराष्ट्रात यादवांचेच राज्य असल्यामुळे तोपर्यंत मराठी आपल्या मूळ स्वरूपातच राहिली. परंतु त्यानंतर मात्र बाहेरून आलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या शासनकाळात मराठी भाषेत फार्सी शब्दांची सरमिसळ व्हायला सुरुवात झाली. शासनकर्ते मुस्लिम असल्यामुळे त्यांची भाषा फार्सी हीच प्रामुख्याने राजभाषा म्हणून वापरात येऊ लागली. परंतु त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी इथल्या स्थानिक मराठी माणसांचा आधार घ्यावाच लागला. अशा अनेक गोष्टींचर परिणाम होत ही भाषा व्यवहारात वापरली जाऊ लागली. याचा प्रत्यय जुन्या मोडी कागदपत्रांमधून येतो.

इराण-अफगाणिस्तान इथून आलेल्या मुस्लिम शासकांनी नुसता देशच काबीज नाही केला तर इथल्या संस्कृतीवरही आक्रमण केलं. मात्र या गोष्टीला लगाम घालण्याचे काम एका महापुरुषाने केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय असण्याचं हेही एक प्रमुख कारण आहे की, ते एक द्रष्टे राज्यकर्ते होते. त्यांनी ही गोष्ट ओळखली की, स्वराज्य उभारणीच्या कार्याबरोबरच इथल्या संस्कृतीवर झालेलं परकीयांचं आक्रमणही परतवून लावायला हवं. त्यासाठी त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश’ नावाचा एक ग्रंथ रघुनाथ नारायण हणमंते यांच्या देखरेखीखाली विद्वान धुंडिराज लक्ष्मण व्यास यांच्या हस्ते लिहून घेतला. या ग्रंथामध्ये त्यांनी फार्सी शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत शब्द वापरून व्यवहाराचे मराठीकरण केले.

त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणचे छत्रपतींच्या राज्याभिषेकाआधीची पत्रं पाहिली तर त्या पत्रांची सुरुवात ज्या मायन्याने होत असे तो मायना फार्सी होता – अजरख्तखाने इसविसन १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरच्या पत्रांमध्ये जो मायना दिसतो तो साधारण असा आहे, ‘‘स्वस्ति श्रीराज्याभिषेक शक ३ नलनाम संवत्सरे माघ व।। पंचमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतांस श्री राजा शिवछत्रपती याणी…’’ म्हणजे इसविसन १३१८ ते १६५६ पर्यंत म्हणचेच शिवाजी महाराजांचा अंमल चालू होईपर्यंत फार्सी शब्द मराठीत प्राधान्याने वापरले जात. परंतु १६५६ ते १७२८ या दरम्यान फार्सी शब्दांचे मराठी भाषेतील प्रमाण जलदगतीने कमी होत गेले. परंतु पेशवे कालखंडात मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानभर पसरल्यामुळे पुन्हा एकदा विविध मुस्लिम राजवटींशी मराठय़ांचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध प्रस्थापित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा फार्सी शब्दांचा वापर होऊ लागला तो आजतागायत चालूच आहे. नंतरच्या काळात इंग्रजी अंमल आल्याने यात इंग्रजी शब्दांचीही भर पडली.

आता रोजच्या व्यवहारात आपण कोणकोणते फार्सी शब्द वापरतो ते पाहुया. दरवाजा, इमारत, दालन, हौद, दिवाणखान, ओसरी, महाल, रंगमहाल, देवळी, कप्पा, जमीन हलका, कुलूप, किल्ली, छप्पर, खजिना, कारंजे, मैदान, फवारा, गच्ची, पिंजर, पलंग, खुर्ची, मेज, बाजार, दरबार, फौज असे कित्येक शेकडय़ांनी शब्द आहेत जे मूळचे फार्सी आहेत. शफथ खाणे असा एक शब्दप्रयोग मराठीत केला जातो. परंतु मूळ शब्दप्रयोग शफथ घेणे असा आहे. परंतु खाणे या क्रियापदाला शफथेची जोड देण्याची कल्पना फार्सी प्रयोगावरून आली आहे. फारशीत कसम खुर्दन म्हणजे शफथ खाणे असा प्रयोग आहे. असेच अनेक प्रयोग फार्शीतून मराठीत घेतलेले आहेत. उदाहरणाथ, खाली कर्दन म्हणजे (घर) खाली करणे, राह दादन म्हणजे रस्ता देणे, माफ कर्दन म्हणजेच माफ करणे, रद्द कर्दन, रद्द करणे, दूर कर्दन – दूर करणे, हजीमत कर्दन – हजामत करणे, नाखून गिरीफत्न – नखे काढणे इत्यादी कितीतरी शब्दप्रयोग आहेत. त्याचप्रमाणे अनेक उद्गारवाचक शब्द जसे की, अलबत, बेलाशक, खूप, छे, वाहवा, अफसोस, शाबास, खूश हेसुद्धा फार्सीमधूनच मराठीत आलेले आहेत. थोडक्यात काय तर आपल्या रोजच्या बोलण्यात शंभरपैकी जवळपास साठ ते सत्तर शब्द हे मूळचे फार्सी आहेत.

या शब्दांची दीर्घकाळ सवय झाल्यावर त्यांना वगळून मराठी बोलणे अवघडच नाही तर अशक्य आहे. कारण हे फार्सी शब्द आता मराठीचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. पण कमीतकमी आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो की, बोलताना उगीच हिंदी किंवा इंग्रजी शब्द न वापरता केवळ मराठीतच बोलू शकतो. जागतिक मराठी दिनानिमित्त इतकी खुणगाठ जरी प्रत्येक मराठी माणसाने मनाशी बाळगली तर मराठी भाषेसाठी आंदोलने करण्याची गरजच भासणार नाही. कारण चांगल्या कार्याची सुरुवात आपणच करायची असते. बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा.

memane.raaj@gmail.com