>> जे. डी. पराडकर
उत्सवी कोकण प्रदेशातील दिवाळीदेखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. घरासमोरच्या अंगणात आकाश कंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामटय़ांपासून ‘पारंपरिक पद्धती’चा आकाश कंदील बनविणे व तो अधिकाधिक उंचीवर टांगणे ही मजा आजही येथे अनुभवायला मिळते.
दातावर दात आपटतील अशी गोठून टाकणारी थंडी पडू लागली की, आपोआपच दिवाळी सण जवळ आल्याची चाहूल लागते. पहाटे उठून चुलीवर तापलेल्या गरमागरम पाण्याने अभ्यंगस्नान करणे हा आनंद अवर्णनीय असाच. कोकणातील दिवाळी सणाचे वेगळेपण येथील लोकांनी अजूनही जपले आहे. कोकण हा उत्सवी लोकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दिवाळीदेखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. घरासमोरच्या अंगणात आकाश कंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामटय़ांपासून ‘पारंपरिक पद्धती’चा आकाश कंदील बनविणे व तो अधिकाधिक उंचीवर टांगणे ही मजा आजही येथे अनुभवायला मिळते. सध्या आकाश कंदील ‘रेडिमेड’ मिळतात तरी ग्रामीण भागात ‘पारंपरिक पद्धती’चे आकाश कंदील अजूनही बनविले जातात. गावागावातील देवळांसमोर असलेले दीपस्तंभ दिव्यांनी उजळून निघालेले असतात.
आकाश दिवा म्हणजे पूर्वजांची आठवण! समाजाच्या सर्व स्तरातील मंडळींचा उत्साह द्विगुणित करणाऱया या सणात सर्वाधिक महत्त्व आकाश दिव्यालाच आहे. हिंदुस्थानच्या महान संस्कृतीमध्ये आकाश दिव्याचे खरे महत्त्व सांगण्यात आले असून दिवाळीचे केवळ चारच दिवस हा आकाश दिवा लावायचा नसून आश्विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या एक महिन्याच्या कालावधीदरम्यान हा आकाश दिवा प्रज्वलित करून ठेवायचा असतो. घराच्या बाहेर लावला जाणारा आकाश दिवा म्हणजे पूर्वजांचे स्मरण अशी त्यामागची खरी संकल्पना आहे.
दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी. याला कोकणात अनेक ठिकाणी ‘धनतेरस’ असेही म्हटले जाते. पूर्वी या दिवशी छोटे किल्ले तयार करण्याची प्रथा होती. या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ही परंपरा व्यापारी वर्गाने टिकवून ठेवली आहे. याच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनही करण्याची परंपरा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये या परंपरेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. धन्वंतरी पूजनच्या निमित्ताने कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा ‘सात्विन’ वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. ती अजूनही बऱयाच ठिकाणी पाळली जाते.
दिवाळीच्या सणात नरक चतुर्दशीला एक निराळं महत्त्व आहे. नरक चतुर्दशी दिवशी भल्या पहाटे उठणे, अभ्यंग स्नान करणे आणि कारेट फोडणे यासाठी घराघरातून शर्यती लावल्या जातात. दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असेही म्हटले जाते. या दिवशी कोकणात महत्त्व दिले जाते ते घरोघरी तयार केल्या जाणाऱया पोह्यांना. या दिवशी शेजाऱयांना तसेच नातेवाईकांना पोहे खायला येण्याचे निमंत्रण दिले जाते. न्याहारीसाठी फोडणीचे खमंग पोहे, सोबत केळीच्या पानात सजलेली रताळी ठेवलेली असतात. तिखट पोहे, गोड पोहे, गूळ पोहे, दूध पोहे, बटाटा पोहे आदी प्रकार यानिमित्ताने होत असतात. प्रथेनुसार काही काही ठिकाणी त्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळही असते.
यादरम्यान भाताचे नवीन पीक हाती आलेले असते. तो भात हे पोहे तयार करण्यासाठी आदल्या रात्री भिजत घालावा लागतो. सकाळी तो भात गाळून घेऊन चुलीवर मडक्यामध्ये भाजण्यात येतो. नंतर व्हायनामध्ये अर्थात लाकडी उखळात हे भात घालून मुसळाने कुटले जाते, याला ‘कांडपणे’ असं म्हणतात. कांडल्यानंतर तयार होणारे पोहे चुलीवरच शिजविले जातात. या अस्सल वाफाळलेल्या गावठी भातांच्या पोह्याची चव काही निराळीच असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी नैवेद्य म्हणून ‘साळी’ लाह्या आणि ‘बत्तासे’ वाटण्याची प्रथा आजही सुरू आहे. घरात, दुकानात ताटामध्ये पैसे, नाणी ठेवून त्याचीच लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. जमा-खर्चाच्या वह्याही बदलल्या जातात. यानिमित्ताने आंब्याच्या पानांचे तोरण हेसुद्धा विशेष मानले जाते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला कोकणात काही ठिकाणी प्रतीकात्मक शेणाचा गोठा तयार केला जातो. कारेटीला चार ‘हिर’ टोचून श्रीकृष्णाचे रूपक बनविले जाते. कारेटीचा अर्धा भाग घेऊन त्याचीच वाटी तयार करून त्यामध्ये दही नैवेद्य म्हणून ठेवले जाते. काही ठिकाणी त्याऐवजी ‘रोवण’ करण्याची पद्धत आहे. ज्या ठिकाणी दुर्गादेवीची पूजा केली जात नाही, तेथे रोवण केले जाते. गोठय़ातील जनावरांची शिंगे भडक रंगांनी रंगविण्याची आणि जनावरांना गोडधोड खाऊही घालण्याची प्रथा आहे. भाऊबीज सर्वच ठिकाणी धूमधडाक्यात साजरी केली जाते.
कोकणात विशेषत रायगड जिह्यात काही ठिकाणी बलिप्रतिपदेला एक प्रथा पाळली जाते. त्या दिवशी सकाळी घरातील कचरा भांडय़ात एकत्र करायचा, त्यात राखाडी, एक झाडू, एक नाणं, थोडाचा फराळ टाकायचा. नंतर त्यात पणती पेटवून ते भांडे एकाने हातात घेऊन निघायचे. त्याच्या मागून दुसऱयाने ताट लाटण्याने वाजवत घराच्या अंगणाबाहेर जायचे. तेथे तो कचरा पेटवून द्यायचा आणि फटाके वाजवायचे, अशी ती प्रथा आहे.
कोकणातील एक वैशिष्टय़ म्हणजे गणेशोत्सवापासून सुरू होणारी पारंपरिक भजने दसरा-दिवाळीपर्यंत जोरात सुरू असतात. भात कापणीचा हंगाम संपत आलेला असतो. पिकलेला भात घरात आलेला असतो. याच धावपळीत दिवाळीचे दिवस सरतात आणि तुलसी विवाहाने कोकणातील दिवाळीची समाप्ती होते. कोकण हा उत्सवी लोकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. कदाचित या उत्सवांमुळेच कोकणी माणसातले एकमेकांतील आपुलकी आणि ऋणानुबंध आजही दृढ आहेत.