लेख – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण

>> अॅड. यशोमती ठाकूर 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण मांडण्यासाठी शब्द आणि वेळ दोन्ही पुरू शकत नाहीत. पण या महामानवाने केवळ दलित बांधवांना अस्पृश्यतेच्या गर्तेमधून बाहेर काढले असे नाही, तर या देशातील समस्त महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी करून दिली. त्यामुळेच या देशात महिलांच्या हक्कांना, कर्तव्यांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले आणि  खऱया अर्थाने महिला सक्षमीकरण होऊ शकले.

एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे मी मोजत असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये आयोजित ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये म्हटले होते. हिंदू कोडबिलाबाबत कायदामंत्री म्हणून आपली भूमिका मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘समाजाच्या विविध वर्गात असलेली असमानता, स्त्री-पुरुषांमधील असमानता कायम ठेवून आर्थिक समस्यांशी निगडित कायदे मंजूर करत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करण्यासारखे आहे, शेणाच्या ढिगाऱयावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. हिंदू संहितेला मी हे महत्त्व देतो.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खऱया अर्थाने या देशात महिलांच्या सशक्तीकरणाची मोहीम सुरू केली. देवदासी, मुरळय़ा, जोगतीण या प्रथांच्या माध्यमातून महिलांचे होणारे शोषण रोखण्याची चळवळ, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह यांसारख्या आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. काळाराम मंदिर सत्याग्रहातदेखील पहिली अटक ही स्त्रियांच्याच तुकडीला झाली होती. स्त्रीमुक्तीसाठी केवळ आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग वाढणे उपयोगाचे नव्हते. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलात स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हे ध्येय होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेनुसार मंदिर प्रवेशाचा आणि धर्म आचरणाचा महिलांनाही पुरुषांइतकाच मूलभूत हक्क आहे. यात कुठलाही लिंगभेद होऊ शकत नाही. याच अधिकाराच्या जोरावर आज देशभरात महिलांना बंदी असलेल्या मंदिरांमध्ये प्रवेशासाठी महिला संघर्ष करू शकत आहेत.

शतकानुशतके मनुस्मृतीच्या नावाने केवळ दलितांवरच नाही तर महिलांवरही अत्याचार केले गेले. हीच मनुस्मृती दलित आणि महिलांच्या ऱ्हासाचे कारण असल्याचे बाबासाहेब कायम सांगत.  शूद्र जातींचा आत्मविश्वास नष्ट करून त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक गुलामगिरीत ढकलणारा ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ माणुसकीविरोधी असल्याचा ठराव पारित करून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. बाबासाहेबांच्या या कृतीने दलितांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. स्त्री-पुरुष तसेच जातीभेद नाकारणे हाच या मनुस्मृती दहनाचा उद्देश होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना अधिकार दिल्याने सक्षमीकरणासाठी स्त्रियांच्या अनेक चळवळी उभ्या राहू शकल्या आणि यशस्वी झाल्या. आज महिला आणि बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाली असे मी मानते. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा संदेश केवळ दलित बांधवांकरिता नव्हता तर तो स्त्रियांकरितासुद्धा होता. बाबासाहेबांनी महिला शक्तीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्यानं अलीकडच्या काळात झालेली अनेक आंदोलनं किंवा चळवळींमध्येही महिलांचा सहभाग मोठा राहिलाय. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी जो मोठा लढा उभा झाला होता, त्यातसुद्धा मोठय़ा संख्येने महिला सामील झाल्या होत्या.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी शिकले पाहिजे हा संदेश महात्मा फुले यांनी दिला तर स्त्रियांना त्यांचे हक्क कायद्याने मिळवून देण्याचे सगळ्यात मोठे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या महापुरुषांच्या याच कार्यामुळे आज आम्ही महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहोत. शेतीपासून ते देशाच्या संरक्षणापर्यंत, ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदेपर्यंत महिला सर्वत्र दिसत आहेत, हे शक्य झाले ते या महामानवांच्या कार्यामुळे. महिला कामगारांना बाळंतपणासाठी हक्काची वैद्यकीय रजा मिळवून देण्याचे श्रेयसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशेष पाठपुराव्याला जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट अस्तित्वात आला. यात कालांतराने प्रसूतीनंतरच्या रजेचा कालावधी वाढत गेला. याचा फायदा आजपर्यंत देशातील कोटय़वधी महिलांना झाला आहे. या महामानवाने देशातील समस्त महिलांना आणि येणाऱ्या सर्व पिढय़ांना एक कायमस्वरूपी देणगी दिली ती म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला.

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. हिंदू कोड बिलाद्वारे स्त्रीला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार, वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला वाटणीचा हक्क आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर दर्जा… या निर्णयांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुस्थानी स्त्रीला खऱया अर्थाने सक्षम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी तयार केलेल्या या मार्गावर प्रत्येक स्त्रीला येता आले पाहिजे याची जबाबदारी ही समस्त स्त्रीवर्गाची आहे. महिलांची केवळ आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊन समानता येणार नाही, त्यासाठी महिलांच्या सामाजिक प्रगतीची सर्वाधिक गरज आहे.

माझा महिला आणि बालविकास विभाग याच महिला सक्षमीकरणासाठी झटतोय. कारण एक महिला सक्षम झाली तर तिचे बाळ सुदृढ होते आणि त्यातूनच सुपोषित महाराष्ट्र घडू शकतो. म्हणूनच महिला आणि बालविकास विभाग गरोदर माता असेल, स्तनदा माता असेल किंवा अगदी किशोरवयीन मुली असतील या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. यासाठी अंगणवाडी ताई घरोघरी जात आहेत. माविमच्या माध्यमातून आम्ही महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर भर देत आहोत. कारण महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या तर त्यांचे सामाजिक महत्त्व वाढते, घरातील निर्णय प्रक्रियेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. घरातील पुरुषांनी बाळाच्या संगोपनात मदत केली तर महिलांना त्याची खूप मोठी मदत होते.

बालविवाहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विरोध होता. बाबासाहेबांच्या याच विचारांचा आदर्श समोर ठेवून महिला आणि बाल विकासमंत्री म्हणून मी बालविवाह रोखण्याला प्राधान्य देते आहे. म्हणून कोरोना संकटाच्या गदारोळातही अनेक बालविवाह रोखण्याचे काम माझ्या विभागाने तत्परतेने केले आहे.

या सर्व गोष्टींकडे आपण समाज म्हणून जागरुकतेने पाहिले तर नक्कीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

(लेखिका महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या मंत्री आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या