
भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील समर्पित सहचारिणी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा आज 21 वा स्मृतिदिन. दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांच्यावरील ‘सूर्यप्रभा’ या अनोख्या स्मृतिग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केले आहे. त्याचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघात आज संध्याकाळी 5 वाजता होत आहे. त्यानिमित्त या ग्रंथाच्या आद्यलेखातील काही अंश…
2023 हे वर्ष आंबेडकरी चळवळीसाठी विशेष आणि असाधारण आहे. राज्यात ‘दलित पँथर’च्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाची यंदा एकीकडे ‘धूम’ आहे, तर दुसरीकडे माता रमाबाई आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव साजरा होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनाच्या पूर्वार्धात रमाई, तर उत्तरार्धात सवितामाई यांनी केवळ सेवा नव्हे, तर समर्पणाच्या भावनेतून जपणूक केली. त्या दोघींच्याही असीम त्यागावर आतापर्यंत प्रत्येकी किमान 25 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र त्याच्याही खूप वर्षांपूर्वी आंबेडकरी कवी-गायकांमुळे बाबासाहेबांसोबतच रमाईसुद्धा खेडोपाडी पोहोचली होती.
आंबेडकरी कलावंतांचे भावविश्व हे बाबासाहेब आणि रमाई या दोघांनी कायमचेच व्यापले आहे. ‘कोकणची हिरवाई… माझी माय रमाई’ हे कवी-गायक प्रतापसिंग बोदडे यांचे गीत त्यातलेच. या कलावंतांसोबतच बंधुमाधव आणि डॉ. यशवंत मनोहर यांनी कादंबरीतून तर नाटककार प्रभाकर दुपारे, प्रा. दत्ता भगत यांनी एकपात्री प्रयोगातून रमाईला जनामनात पोहोचवले.
…पण डॉ. माईसाहेब आंबेडकर यांना संशयाच्या वन्हीमुळे होरपळ सोसत तब्बल 15 वर्षे अज्ञातवासात जीवन कंठावे लागले. त्यामुळे रमाईंच्या तुलनेत डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या समर्पित जीवनाची कहाणी तशी उशिराच लोकांना कळली. त्यांचे ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यासाठी 1990 साल उजाडावे लागले. बाबासाहेबांचे जीवन आणि समग्र कार्य यावर गेली तब्बल 50 वर्षे निरंतर संशोधन आणि अभ्यास करत आलेले संशोधक विजय सुरवाडे यांनी माईंची कथा-व्यथा शब्दांकित केली अन् देवचंद अंबादे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात तो ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य प्रशंसनीयच नाही, तर धाडसीही होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर केवळ संशयातून आणि दुष्ट बुद्धीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केल्या गेलेल्या माईसाहेबांभोवतीचे मळभ त्या ग्रंथामुळेच खऱ्या अर्थाने झपाटय़ाने विरत गेले. त्यानंतर माईंचे आत्मचरित्र आधी कानडी भाषेत आले. त्यापाठोपाठ हिंदी भाषेतून ते आत्मचरित्र देशभरात पोहोचले. अलीकडेच अमरावतीचे प्रा. नदीम खान यांनी त्याचा इंग्रजीत केलेला अनुवाद आंतरराष्ट्रीय पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. त्यामुळे माईंचे आत्मचरित्र आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. देशातील आणखी सहा भाषांमध्ये त्याचा अनुवाद आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शिवाय मराठवाडय़ातील प्रकाश त्रिभुवन यांनी हाती घेतलेला माईंवरील मराठी चित्रपट सध्या पूर्णत्वाच्या दिशेने सरकत आहे.
मात्र माईसाहेब यांचे सत्य आणि त्यांचे समर्पित जीवन त्यांच्या आत्मचरित्रातून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या पूर्वीच त्यांना न्याय देण्यासाठी सरसावण्याचे धाडसी कृतीशील पाऊल सर्वात आधी उचलले होते ते दलित पँथरचे नायक राजा ढाले यांनी! ही गोष्ट आहे पँथरच्या स्थापनेच्या काळातली, म्हणजेच 1972 सालातली. माईंच्या वाटय़ाला आलेली शोकांतिका संपविण्याची ढाले यांची भूमिका सर्वच पँथर नेत्यांनी पुढील काळात कर्तव्य भावनेतून पार पाडली होती. त्यात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतलेले परिश्रम मोलाचे ठरलेत. त्यामुळे माईंचा अज्ञातवास, त्यांच्यावरील अघोषित बहिष्कार संपुष्टात आला होता अन् आंबेडकरी समाजात परतण्याची, मिसळण्याची माईंची आस बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर 15 वर्षांनी पूर्ण झाली होती. नंतरच्या काळात माईंनी भारतीय दलित पँथरच्या ‘मार्गदर्शक’ म्हणून भूमिका पार पाडली. त्या 1978च्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढय़ापासून रिडल्सचे दलित एकजुटीचे आंदोलन, बौद्धांना सवलती, स्वतंत्र कायद्यासाठी लढा आणि 1997 सालात पोलिसांनी बेछूट गोळीबार करत घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात दहा दलितांच्या घडवलेल्या हत्याकांडापर्यंत आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहिल्या होत्या. त्या हत्याकांडावेळी रमाबाई कॉलनीत धावून गेलेल्या माई कमालीच्या प्रक्षुब्ध झाल्या होत्या. त्यांनी पत्रकारांशी बोलताना निर्भयपणे ‘रक्तरंजित क्रांती’ची भाषा केली होती! माईसुद्धा आंतरबाह्य ‘आंबेडकर’ होत्या, म्हणूनच जराही न डगमगता रक्तरंजित क्रांतीचा इशारा सरकारला त्या देऊ शकल्या होत्या!
माईसाहेब आणि भय्यासाहेब आंबेडकर या दोघांत आणखी एक साम्य होते, ते म्हणजे तरुण पँथर्सशी सख्य. त्यामुळेच 1977च्या लोकसभा निवडणुकीत माई आणि भय्यासाहेब यांचे सुखावणारे ऐक्य आणि एकत्रित दर्शन आंबेडकरी जनतेला घडले होते. त्यावेळी भय्यासाहेब हे बौद्धांच्या सवलतींच्या प्रश्नावर ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले होते, तर त्यांच्या प्रचार सभांसाठी माईसाहेब या पँथर नेत्यांसोबत झटल्या होत्या. माई आणि पँथर्स यांचे नाते माय-लेकरांचे होते.
यंदाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पँथर चळवळीवर एकापाठोपाठ एक ग्रंथ प्रकाशित होत आहेत. अशा वेळी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्याही जीवनकार्यातील स्मृतींचे संकलन झाले. हा ठेवा जतन केला गेला तर सुवर्ण महोत्सवातील ते मौलिक संचित ठरेल. माझ्या या कल्पनेशी आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांनी, विचारवंतांनी, मित्रांनी सहमती व्यक्त केली. सहकार्य देऊ केले. त्यातून माईंवरील या स्मृती ग्रंथाच्या संपादनासाठी मला बळ मिळाले आणि ग्रंथाच्या कामाला गती आली.
रमाबाई आंबेडकर (1898-1935) या बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी, तर डॉ. सवितामाई आंबेडकर (1912-2003) या उच्चशिक्षित दुसऱ्या पत्नी. रमाई आणि बाबासाहेब यांचे सहजीवन (1907-1935) 27 वर्षांचे, तर माईसाहेब आणि बाबासाहेब यांचे सहजीवन (1948-1956) अवघे आठच वर्षांचे. त्या दोघींच्याही सहजीवनाच्या कालखंडातला फरक मोठा जरूर आहे, पण रमाई आणि माई यांचे बाबासाहेबांच्या जीवनातील स्थान, योगदान आणि परस्परांवरील प्रेम यात तसूभरही फरक नाही. त्या दोघींचीही पतिनिष्ठा, निस्सीम सेवा आणि समर्पण हे समतुल्य आहे. रमाई आणि माई या दोघीही भिन्न कालखंडात बाबासाहेबांसाठी संघर्ष पर्वात शक्तिस्रोत बनल्या होत्या. सिंहाला पराक्रमासाठी बळ देणाऱ्या सिंहिणी ठरल्या होत्या.