लोकसंस्कृतीचा ‘व्रतस्थ’ संशोधक

111

डॉ. राहुल अशोक पाटील

लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे. लोकपरंपरा, धर्म, तत्वज्ञान, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा अनेक विषयांना कवेत घेत सामान्य वाचकांना सहज समजेल, असे विपुल लेखन डॉ. ढेरे यांनी केले. १ जुलै २०१७ हा त्यांचा पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचे संशोधन-अभ्यास उलगडणारा हा लेख.

आयुष्यात काही माणसे विशिष्ट ध्येयाने जगतात. लौकिक जगात पैसा, नोकरीच्या संधी नाकारुन स्वतः स्वीकारलेल्या वाटेवर आयुष्यभर ‘व्रत’ म्हणून चालतात. ध्येयपूर्तीसाठी जीवन समर्पित करतात. भविष्यात अशी माणसे आणि त्यांचे भव्यदिव्य काम याची नोंद इतिहासालाही घेणे भाग पडते. साहित्य क्षेत्रातील डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे (रा. चिं. ढेरे) तथा अण्णा यांच्याबाबत असेच म्हणावे लागेल. ध्येयनिष्ठ, ध्यानस्त, समर्पित व ऋषीतुल्य अशा रा. चिं. ढेरें यांचा शनिवार, १ जुलै, २०१७ रोजी प्रथम स्मृतिदिन.

पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील निगडे गावी २१ जुलै, १९३० रोजी श्री. चिंतामण गंगाधर ढेरे आणि सौ. शारदा यांच्यापोटी रामचंद्र यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी दुर्दैवाने त्यांचे आई-वडिल गेल्याने बालपण काहीशा प्रतिकूल परिस्थितीत गेले. पुढे लेखन, वाचन याच्याशी निगडीत मिळतील ती कामे करुन त्यांनी उपजिवीका चालविली. उमेदीच्या काळात नाथसंप्रदायावर केलेले संशोधन आणि प्राच्यविद्या संशोधन केंद्रात ‘अभ्यासक’ म्हणून केलेले काम या दोन अनुभवांमुळे त्यांचे आयुष्य बदलले. महाराष्ट्राची संस्कृती व प्राचीन साहित्याकडे ते आपोआप ओढले गेले.

८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तब्येतीच्या तक्रारींवर मात करत अविरत भटकंती केली. लेखन, संपादन, भाषांतर, संशोधन केले आणि तब्बल १०५ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी असंख्य हस्तलिखिते, दुर्मिळ पोथ्या, संदर्भ ग्रंथ आयुष्यभरात जमा केले. २०१६ पर्यंत त्यांच्या ग्रंथालयात सूमारे पन्नास हजार ग्रंथसंपदा जमा होती, यावरुन त्यांच्या वाचनाची व एकंदर कामाची कल्पना येते. प्राचीन साहित्य, लोकसंस्कृती, लोकदैवते, लोकसाहित्य, धार्मिक, संतविषयक चरित्रात्मक आणि संशोधन या क्षेत्रांमधील दुर्लक्षित विषय शोधत त्यांनी सातत्यपूर्ण व सकस संशोधन केले. ‘श्रीविठ्ठलः एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी त्यांना १९८७ साली ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ने गौरविण्यात आले. विनम्र स्वभावाचे अण्णा बोलण्यातही मितभाषी होते. व्यासंग व संशोधनमग्नता हे त्यांचे दोन प्रमुख विशेष होते. आपल्या कामाबद्दल ते अत्यंत निष्ठा ठेवून होते. खरे तर प्रत्यक्षात कुणाकडूनही संशोधनाचे प्राथमिक धडेही त्यांनी गिरविले नाहीत मात्र स्वयंशिस्त, चिकाटी आणि मेहनतीने स्वतःची वाट निर्माण केली. तीर्थक्षेत्रे, पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालये ही त्यांच्या आवडीची ठिकाणे होती. महाराष्ट्राला असलेली प्राच्यविद्या संशोधनातील उज्ज्वल परंपरा त्यांनी प्राणपणाने जपली. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार डॉ. केतकर, भांडारकर, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्याकडून प्रेरणा घेत ते अखंडपणे इतिहास संशोधनात कार्यरत राहिले. प्राचीन साहित्यात आलेली अपपाठांची प्रवृत्ती समजून घेत मूळ ग्रंथकाराला अभिप्रेत आशय, त्याची अर्थनिश्चिती, त्यासाठी शेकडो समकालीन संदर्भ तपासणे आणि प्राचीन देशी भाषेची जाण वापरुन मांडणी करणे यात अलिकडच्या काळात कुणीही संशोधक- अभ्यासक त्यांचा हात धरू शकणार नाही.

‘आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचते आहे. काम करताना आपल्याला मिळालेला आनंद आज ते साहित्य वाचताना वाचकांनाही मिळतो आहे.’ याचे समाधान त्यांना होते. दीर्घकाळापासून आजारी असूनही मेहनत व नव्या उमेदीने ते सतत नव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत होते. त्यामुळेच ‘वस्तूनिष्ठ संशोधक’, ‘भारतीय संस्कृती व लोकविद्येचा चालता-बोलता विश्वकोश’, ‘प्राच्यविद्येचे जागतिक पातळीवरचे तज्ञ जाणकार’ अशा विविध बिरुदांनी ते साहित्यक्षेत्रात ओळखले जात. व्रत- तपश्चर्या म्हणून स्वीकारलेले संशोधनाचे आव्हानात्मक काम करताना ते प्रसंगी कठोर भूमिका घेत. प्राचीन वाड्.मयातील सौंदर्य शोधून त्यातील अध्यात्मिक जाणिवा, धार्मिक मांडणी व भक्तिभाव उलगण्यावर जसा त्यांचा भर होता तसाच आद्यकवी मुकुंदराज, संत नामदेव व विसोबा खेचर यांनी दिलेल्या योगदानाचे यथोचित मूल्यमापन करण्यावरही होता.

आपला सांस्कृतिक इतिहास बारकाईने अभ्यासताना त्यांनी महाराष्ट्रभर विखुरलेली लोकदैवते, त्यांच्याशी संबंधित साहित्य, संस्कृती आणि लोकविद्या या क्षेत्रांत अजरामर काम करुन ठेवले आहे. लोकदैवत म्हणून खंडोबा, श्रीविठ्ठल, श्रीमहालक्ष्मी, श्रीतुळजाभवानी, श्रीगुरुदेव दत्त, महात्मा चक्रधर, संत नामदेव, श्रीनृसिंह सरस्वती, बहिणाबाई, यांच्यावर विविध अंगाने लेखन केले. या व्यतिरिक्त अनेक संतांच्या आत्मकथा व चरित्रकथाही त्यांनी लिहिल्या. हे संशोधन केवळ वरवरचे किंवा वर्णनात्मक नव्हते तर आत्मीयतेने हजारो नव्हे लाखो कागदपत्रे शोधून ती मूळातून वाचून त्यातील संदर्भ समजावून घेत सत्य पडताळून ही मांडणी त्यांनी केली. पौराणिक, लोकप्रिय अशा देवदेवता, व्यक्तिमत्त्वांवर लिहिण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले.

अथक परिश्रमाने सिद्ध केलेले ‘चक्रपाणी’ व ‘षट्स्थलः एक अध्ययन’ हे त्यांचे प्रबंध संशोधनाचा उत्तम नमूना आहेत. पैठणची माहिती देणारे ‘एका जर्नादनी’, गाणगापूरवर ‘श्रीगुरुंचे गंधर्वपूर’, नरसोबाच्या वाडीवर ‘श्रीगुरुदेव दत्त’, नाशिक- त्र्यंबकेश्वरवर ‘श्रीगोदे भवताप हरी’, जगन्नाथपुरीवर ‘जागृत जगन्नाथ’, देहूवर ‘तुका झाले कळस’, भुवनेश्वरवर ‘भुवनेश्वर लिंगराज’, औंढा नागनाथवर ‘नागेशं दारुकावने’, घृष्णेश्वरावर ‘बारावे जोर्तिलिंग’, मोरगाववर ‘मंगलमूर्ती मोरया’, देवीच्या साडेतीन शक्तीपीठांवर ‘माता पुत्राची जगन्माता’, अंबेजोगाईवर ‘योगेश्वरीचे माहेर’, आळंदीवर ‘ज्ञानोबा माऊली’ या ग्रंथांचे लेखन केले.

पारंपरिक एम. ए. न करता ढेरे यांची संशोधनाची वाट धरली. अथक परिश्रमाने ‘चक्रपाणी’ हा प्रबंध लिहिला. तो पुणे विद्यापीठात सादर केला, काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर त्यांना ‘विद्यावाचस्पती’ पदवी मिळाली. या सर्वश्रेष्ठ पदवीनंतर त्यांना प्राध्यापकाची नोकरी सहज मिळाली असती पण त्यांनी नोकरीत अडकून पडण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मार्गावरुन चालायचे ठरविले. महाराष्ट्रातील संस्कृती, लोकसाहित्य, प्राचीन मराठी साहित्य याचे वाचन करताना त्यांच्या साहित्याचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. समाजाच्या श्रद्धा, आस्था, दैवते यावर संशोधन करणे आपल्याकडे किती आव्हानात्मक आहे, याची आपणा सर्वांना जाणीव आहेच.

आयुष्यभर साहित्यशारदेच्या सेवेत रमलेले अण्णा १ जुलै २०१६ ला आपल्यातून निघून गेले पण अपरंपार कष्ट सोसत त्यांनी आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती याचा सूक्ष्म अभ्यास करुन ठेवला. हजारो पोथ्या-पुराणे संकलित करुन ठेवली. त्यांच्या साहित्यसेवेचा वारसा कन्या डॉ. अरुणा ढेरे काही प्रमाणात चालवत आहेत पण अजूनही अशा हजारो अभ्यासकांची गरज आहे, जे अण्णांचे काम पुढे घेवून जातील. शंभर माणसे मिळून जे काम करता येणार नाही ते या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाने एकटयाने करुन ठेवले आहे. याबद्दल समग्र महाराष्ट्राने त्यांचे असंख्य उपकार मानायला हवेत आणि त्यांचा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा… आणि असे घडले तर तीच अण्णांना खरी आदरांजली ठरेल.

(लेखक समीक्षक, संशोधक, लेखक आहेत)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या