ईशाचं 37 Days Challange

385

>> वरद चव्हाण

ईशा… अर्थात गायत्री दातार. मालिकेच्या चित्रीकरणात कितीही व्यस्त असली तरी सकाळचा व्यायाम चुकवत नाही.

नमस्कार, फिटनेस फ्रिक्स. कसे आहात सगळे? व्यायामाला सुरुवात केलीत की नाही अजून? जर नसेल केलीत तर आजचा लेख वाचून नक्कीच सुरुवात कराल. कारण आज मी एका अशा मुलीचा लेख तुमच्यासमोर सादर करतोय जिने तिच्या पहिल्याच मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठलेय. ती जरी ‘तुला पाहते रे’ म्हणत असली तरी आज संपूर्ण महाराष्ट्र तिला पाहतोय अशी आपली गायत्री दातार. लहानपणापासूनच ती जिम्नॅस्टिक स्टेट लेव्हल, बास्केटबॉल प्लेयर, ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग अशा विविध ऍडव्हेंचर स्पोर्टस्मध्ये भाग घेत असे. या सगळय़ा खेळांमुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा खूप सक्षम होता. तुमचा स्टॅमिना वाढतो. तुमची लोअर बॉडी मजबूत होते. यासाठी तिने माऊंटेनरिंगचा कोर्ससुद्धा केला आहे. याशिवाय पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यामधून ती बास्केटबॉल खेळत असे.

या सगळय़ासाठी तिने एक विशिष्ट आहार कधीच घेतला नाही. घरचा सात्त्विक आहार घेणं, खाणं आणि बाहेरचे जंक फूड टाळणं ही तिची शिस्त होती. पण आता ‘तुला पाहते रे’ ही मालिका मिळाल्यापासून तिला हे स्पोर्टस् खेळायला मिळत नसल्यामुळे तिने व्यायामशाळेत जायला सुरुवात केली. आतासुद्धा तिने ’37 day challenge’ सुरू केले. यासाठी ती तिच्या जवळचे मित्र व प्रशिक्षक प्रणीत स्मिकर यांची मदत घेत आहे. गायत्रीला 37 दिवसांसाठी प्रणीतने हाय प्रोटिन डाएट चार्ट दिला आहे. या 37 दिवसांत कधी तुम्हाला डाएट चिट करून काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तरी तुम्ही त्यांना फोन करून तुम्ही तुमच्या डाएट चार्टमध्ये असलेल्या आहाराशिवाय अजून काय खाल्लंत ते सांगायचं असतं. मग ते त्यांचा डाएट प्लॅन बदलून तुम्हाला नवीन चार्ट प्लॅन करून देतात.

सध्या ती गोरेगाव येथील गोकुळधाममध्ये राहत असून ‘गोल्ड जीम’मध्ये जाते. तिंचं रूटीन खूप व्यस्त असल्यामुळे ती रोज सकाळी 6 वाजता न चुकता जिमला जाते. साधारण तासभर व्यायाम करून सकाळी 8.30 ला ती शूटिंग सेटवर हजर असते. रोज 12-14 तास शूटिंग करून परत सकाळी व्यायामासाठी उठणे ही सोपी गोष्ट अजिबात नाही. पण गायत्रीचं असं मत आहे की, ती कितीही दमलेली असली तरी ती व्यायाम न चुकता करते. कारण बाकी तिच्या दिवसभराच्या रूटीनमध्ये इतकं अनहेल्दी खाल्लं जातं किंवा आता घरचं जेवण कमी खाल्लं जात असल्यामुळे शरीराला शिस्त लागणं अत्यंत गरजेचे आहे आणि यासाठी व्यायामाची खरंच खूप गरज आहे. सध्या तिचं ध्येय बारीक होणं किंवा मसल्स टोन असणं हे नसून फिटनेससाठी व्यायाम करणं हे आहे. मी तिला विचारलं की प्रसिद्धीचं दडपण येतं का? ही प्रसिद्धी तुला फिट राहण्यासाठी भाग पाडते का? त्यावर तिचं उत्तर होतं की, तिला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ती व्यायाम करीत नाही तर फिट राहण्यासाठी करते. आज कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्टय़ा फिट असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम हा एकच उपाय आहे. जीममध्ये कुठल्या व्यायामाचा कंटाळा येतो विचारल्यावर तिचं उत्तर होतं की, तिला जिममध्ये सायकलिंग करायला अजिबात आवडत नाही.

कारण आपण ती सायकल जागच्या जागी चालवतो. एकाच ठिकाणी राहून सायकल चालवण्यात काय मज्जा आहे? पण मीटरवर जेव्हा आपण किती कॅलरीज बर्न केल्या ते दिसतं तेव्हा मात्र जरा बरं वाटतं. तिला तिंच्या फॅन्सना आवर्जून सांगावंसं वाटतं की, तुम्ही तुम्हाला जमेल तसा व्यायामाला वेळ दिलाच पाहिजे. मग जरी तो फक्त 15 मिनिटे असला तरी चालेल. व्यायामामुळे आपला दृष्टिकोन खूप बदलतो. आपले वागणे सकारात्मक होते. सो व्यायाम हा केलाच पाहिजे. आता गायत्रीनेच तिच्या फॅन्सना हा सल्ला दिलाय म्हटल्यावर तिच्या मालिकेप्रमाणेच व्यायामाचासुद्धा टीआरपी वाढेल अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही. बरोबर ना?

आपली प्रतिक्रिया द्या