लेख – व्यायाम : तन-मनाचा

537

>> दिलीप जोशी ([email protected])

दिवस सुखद थंडीचे आहेत. एकूणच जागतिक लहरी हवामानात ते किती काळ टिकतील सांगता येत नाही. अर्धशतकापूर्वी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मुंबईसारख्या महानगरातही पहाटे खऱया धुक्याची चादर दिसायची. आता अहोरात्र ‘धुरक्या’ची दिसते. बदलत्या काळाबरोबर यांत्रिक सुखसोयी वाढतायत? पण माणूस तन-मनाने खऱया अर्थाने सुखी होतोय का हा प्रश्न जगातल्या सर्वांनाच पडलाय. नित्य नव्या नवलसुविधांचा उपभोग घ्यायला तन-मन दोन्ही ठिकाणावर हवीत. ‘आरोग्यम् धनसंपदा’ किंवा ‘हेल्थ इज वेल्थ’ या म्हणी काही आजच्या नाहीत. शेकडो वर्षांपासून सुज्ञ मंडळी शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाचा आग्रह धरतायत. त्यातून मनही उल्हासित होतं असं सांगतायत.

आजही ते सांगितलं जातं आणि तार्किक पातळीवर ते पटतंही, पण… हा पणच नेहमी आडवा येतो, ‘पण वेळ मिळत नाही’ असं बहुतेक जण म्हणतात. नववर्षदिन किंवा असाच काहीसा ‘मुहूर्त’ धरून उद्यापासून चहा सोडायचा व्यायाम करायचा, व्यसनं टाळायची वगैरे संकल्प केले जातात. आरंभशूरतेचे चार दिवस संपले की, एकेक संकल्प डळमळीत होऊ लागतो. ‘चहा सोडला, पण ज्यांच्याकडे गेलो त्यांना ठाऊक नव्हतं ना, म्हणून घ्यावा लागला’ अशी कारणं पुढे येतात आणि संकल्प अखेरीस चहाच्या पेल्यात बुडतो.

व्यायामाचं महत्त्व कोणीच नाकारत नाही, पण ‘वेळ नसण्याचं’ भ्रामक कारण तिथेही आड येतंच. ‘अहो, खरंच वेळ नसतो’ असं काकुळतीने सांगणारे तरुणही भेटतात. आपल्या व्यस्त दिनचर्येची यादीच सादर करतात आणि क्षणात हातातल्या सेलफोनमध्ये तासभर गुंतून पडताना दिसतात. हे सगळं पाहिलं की गंमत वाटते.

आपल्या तनमनाची काळजी आपणच घ्यायची असते. त्यासाठी खरं तर इतर कोणाच्या सल्ल्याची आणि उपदेशाची गरजच काय? ‘कळतं पण वळत नाही’ अशी ही अवस्था. ‘वेळ नाही हे सांगण्यात जेवढा वेळ घालवता तेवढा वेळ व्यायाम केलात तरी तब्येत सुदृढ राहील’ असे एकेकाळी आमचे व्यायाम शिक्षक सांगायचे. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. थोडय़ा कष्टप्रद वाटणाऱया व्यायामासाठी लागणारा उत्साह मनातून आणावा लागतो. ते साधलं तर तनमनाच्या उत्साहाचं ‘चक्रवाढव्याज’ कसं मिळतं ते अनुभवल्याविना कळणं कठीण.

पासष्टी उलटलेले काही जण एका फार्महाऊसवर गेलो होतो. जाताना रिक्षा करून गेलो. आठेक किलोमीटरचं अंतर. संध्याकाळी परतताना सुखद गारवा होता. कोणीतरी म्हणालं, ‘चालत जाऊया’. सगळे तयार झाले. अगदी संधिवाताने त्रासलेले दोघेजणही! कारण मनाला संधिवात होत नाही ना. बरोबर दोन तासांत नेमस्त चालीने तेवढं अंतर काटलं आणि प्रत्येकाला ‘एव्हरेस्ट’ सर केल्याचा आनंद झाला. आपल्या छोटय़ाशा नीरस वाटणाऱया आयुष्यात असे क्षण कमालीचा आत्मविश्वास निर्माण करतात.

एका परिचित व्यक्तीने निवृत्तीनंतर ट्रेकिंग, हायकिंग सुरू केलं आणि पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत निभावलं, विख्यात न्यूरो सर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांनी तर ऐशीव्या वर्षीपर्यंत जगातल्या अनेक मॅरेथॉनमध्ये उत्साहाने भाग घेतला. इंग्लंडमध्ये शंभरी पार केलेला धावपटू म्हणून फौजा सिंग यांचा गौरव झाला होता. ते 2016 मध्ये मुंबईत आले होते. विशेष म्हणजे त्यांनी सत्तरीनंतर धावणं सुरू केलं ते मानसिक दुःख विसरण्यासाठी. मुंबई मॅरेथॉनच्या वेळी त्यांचे वय 104 होतं.

अगदी धावपटू नको, पण रोज तीन ते चार किलोमीटर चालण्याचं आणि तरुण वयातच व्यायामाचं क्रत घेतलं तर रक्तदाब, टेन्शन, मधुमेह असे अनेक विकार दूर राहतील. माझ्या माहितीतल्या एका तरुणाने सायकलवरून मुंबई-गोवा असा प्रवास केला. ते सांगताना तो म्हणाला, ‘माझे वडील परवा मुंबई-पुणे-मुंबई असा सायकल प्रवास करून आले. आश्चर्य वाटणारीच ही गोष्ट. अशी अनेक माणसं असतील. थोडा ‘वेळ’ खर्च केला तर त्यांचं कर्तृत्व समजेल.

पण ‘वेळच नाही ना!’ ही तक्रार जगभर सार्वत्रिक आहे. अमेरिकेत एका संस्थेने सुमारे 32 हजार लोकांना व्यायामाविषयी प्रश्न विचारले. त्यांना त्यासाठी वेळ नव्हता, पण दिवसातले पाच तास ते टीव्ही, सेलफोनवरचे खेळ किंवा फेसबुक, व्हॉटस्ऍप वगैरेमध्ये घालवत होते. त्यातला अर्धा तासही ‘हेल्थ इज वेल्थ’ समजायला पुरेसा होता. अगदी साधा हलका व्यायाम कोणीही करू शकतो. शंभरीच्या घरातले एक आजोबा की पणजोबा बंगल्याच्या अंगणात रोज सकाळी व्यायाम करताना दिसत आणि त्यांना कुतूहलाने पाहायला लोक थबकत अशी एक खरीखुरी गोष्ट ठाऊक आहे, पण त्यातल्या किती जणांनी त्यापासून स्फूर्ती घेतली असेल, प्रश्नच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या