परदेशी शिक्षणाच्या वाटा

>>मंजुषा खेडेकर

परदेशी शिक्षण घेताना अनेक अडचणी समोर उभ्या असतात. मात्र या अडचणींबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले की परदेशातील शिक्षणाची धास्ती वाटत नाही.

बारावीनंतर विद्यार्थी खऱ्या अर्थाने करिअरच्या उपलब्ध पर्यायांचा विचार करत असतात. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊन शिकणाऱयांची संख्या वाढत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी, परदेशी विद्यापीठाची निवड कशी करावी, असे अनेक प्रश्न मनात असतात. मागील एका लेखात बारावीनंतर अमेरिकेत शिकायचे असेल तर कुठल्या परीक्षा आवश्यक असतात याबद्दल आपण चर्चा केली. आता आपण याव्यतिरिक्त कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात याबद्दल बोलू.

शैक्षणिक पात्रता – साधारणत- बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण असले पाहिजे. अशी विद्यापीठाची अट असते. स्टेट बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई यासारखे सगळे बोर्ड यासाठी पात्र आहेत. याशिवाय ज्यांनी डिप्लोमा केला आहे ते विद्यार्थीदेखील पात्र ठरतात. ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला आहे आणि ते प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले असतील तर त्यांना काही विषय माफ केले जाऊ शकतात. त्याला ‘क्रेडिट ट्रान्सफर’ असे म्हणतात. डिप्लोमामध्ये मिळवलेल्या गुणांनुसार हे विषय माफ केले जातात.

अमेरिकेतील विद्यापीठे थोडा पुढचा विचार करतात. आपल्याकडे फक्त हुशार विद्यार्थी न येता अष्टपैलू विद्यार्थी आला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला सॅटमध्ये जास्त गुण असतील पण त्याच्याशी स्पर्धा करणारा, त्याच्याएवढेच गुण असणारा खेळाडू असेल तर प्राधान्यक्रम खेळाडूला दिला जातो. आपापल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये विविधता असली पाहिजे याबद्दल अमेरिकन विद्यापीठे आग्रही असतात. कला क्षेत्रातील प्रावीण्यदेखील तुम्हाला उपयोगी पडू शकते. थोडक्यात, अभ्यास सगळेच करतात. त्यात सगळेच हुशार असूदेखील शकतात/ सगळ्यांनीच आवश्यक त्या परीक्षा दिलेल्या असतात. पण त्याशिवाय तुम्हाला आणखी काय काय येते ही गोष्ट तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी ठरवते. हीच गोष्ट हेरण्यासाठी अमेरिकन विद्यापीठे उत्सुक असतात जी तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी जास्त उपयोगी ठरू शकते.

पण बारावीनंतर अमेरिकेला का जावे, बारावीनंतर अमेरिकेत शिकल्याने नक्की काय फायदा होतो याचीही माहिती घ्यायला हवी. अमेरिकेतील शैक्षणिक संधींचा लाभ घेताना या कारणांचाही विचार व्हायला हवा.

विषयांतील वैविध्य आणि अभ्यासक्रमातील लवचीकता – अमेरिकेत कुठलीही पदवी ही बॅचलर ऑफ सायन्स (बीएस) किंवा काही अपवादामध्ये बॅचलर ऑफ आर्टस् (बीए) म्हणून ओळखली जाते. मग तो अभ्यासक्रम केमिस्ट्री असो की संगीत असो की मग कॉम्प्युटर इंजिनीयरिंग असो. साधारणत- १२५ ते १३५ क्रेडिट पूर्ण केले की पदवी मिळते. चार वर्षांमध्ये हे संपले पाहिजे अशी अपेक्षा असते पण आग्रह नसतो. आपल्याकडे कितीही हुशार मुलगा असला तरी त्याला चार वर्षांच्या आत इंजिनीयरिंग संपवता येत नाही किंवा दोन वर्षांत बीएससी/बीकॉम/बीए करता येत नाही. अमेरिकेत ही सोय उपलब्ध आहे. आपापल्या वकुबानुसार विद्यार्थी अभ्यासक्रम ३ ते ५ वर्षांत संपवू शकतो.

पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचे प्राध्यापक – आपल्याकडे काही महाविद्यालये सोडली तर या दोन गोष्टींबद्दल आनंदीआनंद असतो. किती महाविद्यालयांत उत्तम प्रयोगशाळा आहेत आणि असल्याच तर त्यात किती चांगली उपकरणे आहेत आणि तीही असलीच तर ती आधुनिक आहेत का किंवा ती व्यवस्थितपणे सुरू आहेत का हा संशोधनाचा विषय आहे.

अमेरिकेतील साधारण महाविद्यालयातदेखील उत्तम पायाभूत सुविधा आणि चांगले प्राध्यापक उपलब्ध असतात. याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात होतो. पदवी करतानाच मिळणारा संशोधनाचा अनुभव पुढील करीअरमध्ये उपयोगी ठरू शकतो.

वैचारिक क्षमता – अमेरिकेत भरपूर अभ्यास करावा लागतो. कसाही अभ्यास करून चालत नाही तर व्यवस्थित करावा लागतो. आपल्याकडे पाठांतरावर भर असतो . थोडक्या काळात अमेरिकेत अभ्यासाला ‘ऑप्शन’ नसतो. कारण विविध परीक्षा, असाईन्मेंट्स विद्यार्थी गढून गेलेला असतो. ‘तुम्हाला असाईनमेंट्स ओरिजिनल’ अभ्यासाला हव्यात यावर विद्यापीठाचा कठाक्ष असतो. यात कुठलेही चौर्यकर्म आढळल्यास शिक्षा होऊ शकते.

स्कॉलरशिप – गुणांवर जाताना स्कॉलरशिप तर मिळतातच त्याशिवाय शिकताना तुमच्या प्रगतीचा आढावा घेऊन विविध स्कॉलरशिप दिल्या जातात. यामुळे शिक्षणावर होणारा खर्च खूपच कमी होऊ शकतो. साधारण वेळापत्रकानुसार खालीलप्रमाणे अमेरिकेला जाता येऊ शकते. जर अकरावी किंवा बारावीला (जूनमध्ये) सुरुवात केली तर – बारावीनंतर अमेरिकेत बारावीला (ऑक्टोबरनंतर) सुरुवात – बारावीनंतर किंवा सहा महिन्यांनी सीईटीनंतर – सहा महिन्यांनी किंवा एका वर्षाने नियोजन कसे करावे?

अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी – ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये अकरावी आणि बारावीची परीक्षा द्यावी. त्यानंतर विविध विद्यापीठांमध्ये अर्ज भरून मेच्या आसपास प्रवेश मिळतो. जून/जुलैमध्ये व्हिसा मिळवून ऑगस्टमध्ये अमेरिकेला जाता येईल. जर बारावीनंतर जानेवारी सत्रासाठी जायचे असेल तर मे/जूनमध्ये परीक्षा देऊन जाता येईल. जूनमध्ये विद्यापीठात अर्ज भरून मग ऑक्टोबरच्या आसपास प्रवेश आणि मग नोव्हेंबरमध्ये व्हिसा घेता येऊ शकतो.

सध्या पालक आणि विद्यार्थी बरेच जागरूक झालेत. इंजिनीयरिंग किंवा मेडिकलच्या पलीकडे विचार करू लागलेत. याच कारणासाठी पालक अमेरिकेचा विचार करायला लागले आहेत.