लेख – प्रासंगिक – श्री गणपती – त्याचे गुण आणि शक्ती!

348

>>आसावरी पांचाल

महाराष्ट्राचे सर्वात लाडके दैवत म्हणजे गणपती. गणपतीचे आगळे-वेगळे रूप मनाला आकर्षित करणारे आहे. दरवर्षी सर्वांना या उत्सवाची उत्सुकता असते. मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरी येणारा गणराया. ‘गणपती बाप्पा मोरया’चा नाद गल्लोगल्ली कानावर पडू लागतो. सर्वांच्या मनामध्ये एक भावना जरूर असते की गणरायाच्या आगमनाने आमच्या जीवनातले सर्व विघ्ने आता दूर होणार.

कोणी दीड दिवसाचा गणपती तर कोणी पाच किंवा सात दिवसाचा तर कोणी अकरा दिवसांचा गणपती घरी बसवतात. प्रेम भावनेने त्याची आराधना करतात. मोदकाचा खास नैवेद्य दाखवतात. हे सर्व कार्य मनोभावे केले जाते. ज्या भावनेने पूजा अर्चा केली जाते त्या अनुसार मनोकामनाही पूर्ण होण्याचा अनुभव आपल्या सर्वांकडे असेलच. असे या देवतेमध्ये काय आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील विघ्ने दूर होतात. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपती वंदनेने केली जाते कारण गणरायाचे रूप जर व्यवस्थित न्याहाळले तर प्रत्येक अंग गुणांनी भरलेले आहे. म्हणूनच गणपती म्हणजे गुणपती असेही म्हटले जाते.

जीवनामध्ये जेव्हा विघ्नं येतात तेव्हा मनुष्याचा कल पूजाअर्चा, उपवास, नवस … या सर्व गोष्टींकडे जातो, पण आपल्या जीवनातले विघ्न दूर करण्यासाठी आपल्यालाच अचूक पाऊल उचलावे लागते. विघ्नविनाशक बनण्यासाठी गणरायासारखे बनावे लागेल. आपल्या सर्वांना गणेशाची जन्म कथा माहीतच असेल. पार्वतीच्या मळाने एका पुत्राचा जन्म होतो. शंकर आपली तपस्या पूर्ण करून जेव्हा परत येतात तेव्हा पार्वती स्नान करायला गेली. अशा वेळी या पार्वतीनंदनाला बाहेर बसवून तसेच ताकीद देऊन गेली होती की कोणीही आले तरी त्यांना आत पाठवायचे नाही. जेव्हा शंकर आत जाऊ लागले तर या पुत्राने त्यांना अडवले. शंकर यांना प्रश्न पडला की हा कोण मला अडवतोय? रागात येऊन ते या पुत्राचे शिश धडापासून वेगळे करतात. पार्वती अंघोळ करून बाहेर येते तेव्हा झालेला प्रकार बघून त्यांना सांगते की, मीच त्याला सांगून गेले होते. हा आपलाच पुत्र आहे. काहीही करा पण याला कोणाचेही तोंड लावून जीवंत करा. तेव्हा भगवान शिव हत्तीचे तोंड या मुलाला लावतात आणि याच शिवपुत्राचे नाव ‘गणपती’ असे ठेवले जाते.

हत्तीचेच तोंड का, हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला असेल. हत्तीला बुद्धीवान, बलवान, आज्ञाधारक…मानले जाते. हत्तीच्या प्रत्येक अंगामध्ये रहस्य आहे. सुपासारखे कान हे चांगले आणि वाईट यांचा भेद करून चांगले आपल्या जवळ ठेवण्याची कला शिकवणारे आहे. वाईट ऐकण्याची सवय ही आपल्या जीवनाला चुकीच्या मार्गावर घेऊन घेऊन जाऊ शकते. शरीर इतके मोठे, मात्र डोळे किती छोटे. दूरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला डोळे छोटे करावे लागतात. हे डोळे दूरदृष्टीचे प्रतीक आहे. कोणतेही कार्य करण्यासाठी त्याचे होणारे परिणाम पहिले लक्षात घ्यावे. कारण आजचा मनुष्य पहिले करतो आणि मग त्यावर विचार करत राहतो. परंतु पहिला विचार करावा व मग कार्याला लागावे ही सवय आपण स्वतःला लावावी. हत्तीचे सोंड ही बलशाली असण्याचे प्रतीक आहे. या सोंडेने भलीमोठी झाडे मुळासकट उपटून काढली जातात. याच सोंडेने देवाला हारही अर्पण केला जातो. या सोंडेमध्ये कोणीही काहीही दिले तर ते मालकापर्यंत पोहोचवण्याची इमानदारी ही दिसून येते. अशक्य कार्य शक्य करण्याची शक्ती हत्तीमध्ये दिसून येते. मानवी मनामध्येसुद्धा अद्भुत शक्ती आहे ज्याद्वारे असंभव कार्य संभव होऊन जातात. तसेच नम्रता आणि इमानदार राहिल्याने जीवनातल्या समस्या कमी होतात.

या गुणांचा वापर दैनंदिन कार्यामध्ये आपण केला जसे दूरदृष्टी ठेवून जे आवश्यक आहे तितके ऐकणे, बोलणे … यावर लक्ष ठेवले तर वेळेचा सदुपयोग तर होईलच, पण व्यर्थ गोष्टींपासून मुक्तही होऊ. आपल्यामध्ये जे गुण आणि शक्ती आहेत त्यांचा व्यर्थ व्यय न करता खऱ्या मार्गाने वापर केला तर विघ्नं कमी येतील आणि जर परिस्थिती आलीच तर त्याला आपण कसेही तोंड देऊ शकतो.

या गणेशोत्सवानिमित्त आपण आज संकल्प घेऊ या की रोज या गणरायाचे दर्शन करून त्यांचे सर्व गुण आणि शक्ती मला माझ्यामध्ये आणायचे आहेत. मी स्वतःला इतके शक्तिशाली बनवेन की कितीही विघ्नं आली तरी ती या शक्तींनी समाप्त होतील. मी सुद्धा गणपति सारखे गुणांनी स्वतःला भरपूर करीन.

आपली प्रतिक्रिया द्या