>> पांडुरंग भाबल
गणेशोत्सव जवळ आला की, गणपतीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येतात, परंतु कोकणात चित्रशाळेत मूर्तीची ऑर्डर देऊन ती बनवून घ्यावी लागते. त्यासाठी एक-दोन महिने आधी चित्रशाळेत पाट द्यावा लागतो. अर्थात हा पाट फक्त बाप्पासाठीच असल्याने तो अन्य कुठल्याही कारणासाठी वापरला जात नाही. अपवाद फक्त छोट्या मूर्तींचा ! त्यासाठी मात्र पाट दिला जात नाही.
विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे प्राचीन काळापासून कोकणचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील सह्याद्रीच्या कुशीतील डोंगराळ प्रदेश म्हणजे कोकण. त्याला सुमारे 720 किमीची पांढऱ्याशुभ्र वाळूसह किनारपट्टी लाभली आहे. अनेक राजसत्तांनी येथे राज्य करून येथील संस्कृती, धर्म, कला, साहित्य व परंपरा यामध्ये वैभवशाली भर घातली. त्याला शेती, बागायती, खनिज संपत्ती व जल संपत्तीने साथ देत कोकणला समृद्धीकडे नेले. त्यातूनच अनेक कलावंत व प्रतिभावंत निर्माण झाल्याने त्याला अधिष्ठान लाभले ते तेथील कला, लोककला, संस्कृती, धार्मिक सण व उत्सवांच्या परंपरांचे ! अर्थात कालपरत्वे यामध्ये बदल घडत गेला असला तरी कोकणी माणसाचे आपल्या लोक संस्कृतीवरील प्रेम मात्र तसूभरही कमी झालेले नाही. अलीकडे तर ग्लोबल कोकण ही नवी संस्कृती मूळ धरू लागली असली तरी कोकणचा वैभवशाली वारसा मात्र पुसून टाकता येणे शक्य नाही. शिक्षण क्षेत्रात गतिमान आणि गुणात्मक बदल झाले तरी कोकणी माणूस आपली बोलीभाषा, खाद्य संस्कृती, धर्म आणि कुळाचार, सण व उत्सव आदींच्या रूढी व परंपरांची जपणूक करताना दिसतो. उत्सवप्रियता ही येथील माणसाच्या मनात ठासून भरल्याने प्रसंगी कर्ज काढून आपले सण व उत्सव तो आपल्या गावाकडे साजरे करताना आपण पाहतो. मग तो होळीचा, ग्रामदैवताचा असो किंवा गणेशोत्सव असो !
प्राचीन काळापासून श्री गणेश देवतेला विशेष मान असल्याने कोकणच्या मातीत गणपतीवर प्रेम करणारे सर्वात जास्त आहेत. नारळी पौर्णिमेनंतर येणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. त्यानंतरच येथील शेतकरी व मच्छीमार आपल्या पुढील कामाला सुरुवात करतात. गणेशमूर्ती घडवण्याच्या अनेक चित्रशाळा येथे आहेत. त्यामुळे कलेचा वारसा पिढ्यान्पिढ्या जोपासला जात असून रायगडमधील पेण शहर तर गणपतींचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील मूर्ती संपूर्ण देशात व परदेशात प्रसिद्ध आहेत. तेथे वर्षभर गणेशमूर्ती बनवण्याचे काम घराघरांत दिसून येते. म्हणूनच किनारपट्टीवरील कोकण परिसर महाराष्ट्राची शान असून याच मातीतून अनेक चित्रकार, शिल्पकार, रंगकर्मी व व्यंगचित्रकार यांनी आपल्या समृद्ध कलेचा निर्विवाद ठसा उमटवला आहे. परिणामी, चित्रकला व शिल्पकलेच्या प्रांतात रंगकला, रेखाटन, मूर्तिकला, शिल्प, रांगोळी व कला दिग्दर्शन आदींमध्ये सिंधुदुर्गाला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. आजही मुंबईतील अनेक गणेश मूर्तिकार हे मूळचे कोकणातील असल्याचे दिसते.
बहुतांश गणेशमूर्ती या आसनारूढ असतात, तर फारच कमी या उभ्या स्वरूपात साकारल्या जातात. असे असले तरी मूर्तींची प्रतिष्ठापना ही लाकडी पाटावर करण्याची प्रथा घरोघरी अवलंबली जाते. त्यामुळे पाटाला फार महत्त्व असते. त्याचप्रमाणे गणेशाची मूर्ती चित्रशाळेतून आणताना ती प्रामुख्याने पाटावरून आणण्याची पद्धत आहे. पूर्वी मोठ्या मूर्ती डोलीतून वा पाळण्यातून आणल्या जायच्या. काही जण सामूहिकरीत्या पाळण्याचाही वापर करीत, तर छोटी मूर्ती आणण्यासाठी पाट व टोपली यांचा वापर करत. किनारी भागात होडीतूनही मूर्ती आणल्या जात. अलीकडे मात्र वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने आता कोणताच द्राविडी प्राणायाम करावा लागत नाही.
गणेशमूर्तीचे स्थान लाकडी पाटावर असल्याने सर्वत्र गणपतीसाठी एक खास पाट अथवा चौरंग तयार केला जातो. तो पाट घरात अन्य कोणत्याही कामासाठी वापरला जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून गणपतीचा खास पाट चित्रशाळेत देण्याची परंपरा आजही कोकणात टिकून आहे ती इथली संस्कृती असल्यामुळेच ! गणपतीचा हा पाट वर्षभर देवघरात नीट जपून ठेवण्यात येतो. त्यावर फक्त लाडका बाप्पाच विराजमान होणार असतो. वडिलोपार्जित चालत असलेली ही परंपरा असून प्रत्येकाचे मूर्तिकारही परंपरेनुसार ठरलेले असतात. त्यांच्याकडे सवडीनुसार एक-दोन महिने आधीच पाट देण्यात येतो. तसेच आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीचे चित्र दिल्यास त्याच पाटावर ते साकारले जाते. म्हणूनच चित्रशाळेत पाट देण्यामागची भावना ही इथल्या संस्कृतीचा एक भाग असावा.
कोकणात गणपती विकत घेतला जात नसल्याने तो घेणारा प्रत्येक जण मूर्तीच्या शेजारी पाटावर विडा ठेवून मूर्तीला मान देत असतो. मूर्तीच्या बाजूला पैसे न ठेवता गणेशमूर्ती उचलल्यानंतर पैसे देण्यात येतात. त्यात कोणतीच सौदेबाजी करण्यात येत नाही. यात भक्तिभावाला महत्त्व असल्याने आर्थिक व्यवहाराला गौण स्थान असते. त्यानंतर मूर्ती नीट बांधून दिली जाते. शहरात याच्या उलट म्हणजे गणेशमूर्ती विकायला ठेवताना त्यावर किमतीचे लेबल लावलेले असते. त्यामुळे देवाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जातो. यावरून गणपतीचा पाट पारंपरिक मूर्तिकाराकडे देण्याची आगळीवेगळी ‘संस्कृती’ आजही कोकणात टिपून असल्याचे दिसते.