निष्पाप बळींचे पाप

>> दीपेश मोरे

प्रेमासाठी कायपण.., युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं,. ही वाक्य तारुण्यात ऐकायला आणि वाचायला ठीक आहेत. पण प्रेमासाठी आणि ते पण अनैतिक संबंधासाठी निष्पाप आणि चिमुरड्यांचा बळी घेणं हे कदापि माफीयोग्य नाही. विशेष म्हणजे जन्मदाते माता-पिताच आपल्या पोटच्या गोळ्य़ांवर उठले आहेत. ऐन तारुण्यातील मुला-मुलींच्या डोक्यावर प्रेमाचे भूत स्वार होते हे मान्य, परंतु लग्न आणि मूलबाळ झालेलेही अनैतिक प्रेमात अडसर तसेच लैंगिक सुखासाठी निष्पापांचे बळी घेण्याचे पाप करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढल्या असून हे फार चिंताजनक आहे.

विषप्रयोग आणि लैंगिक अत्याचार

विरार येथे राहणाऱ्या ज्योती कांबळे या तरुणीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या विवाहित पुरुषाशी प्रेम होते. ज्योती लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागली होती. पण मला पाच वर्षांची मुलगी आहे. पत्नीला सोडचिठ्ठी देईन, पण स्विटीचे काय? असे विकी सांगू लागला. त्यामुळे स्विटी ही ज्योतीच्या डोळ्य़ांत खुपू लागली. शेजारीच राहत असल्याने ज्योती हिला स्विटी ओळखत होती. ज्योती हिने अर्नाळा येथील स्विटीची शाळा गाठली. आत्या असल्याचे सांगून ती स्विटीला घेऊन निघाली. विरारहून तिने लोकल पकडली आणि स्विटी हिला घेऊन दादरला आली. दादरनजीक उद्यानात नेऊन तिने स्विटीला फ्रुटीतून विष दिले. स्विटीला ग्लानी आल्याचे लक्षात येताच ज्योतीने तिला टॅक्सीत बसविले आणि मुंबई येथील महालक्ष्मी मंदिराजवळ नेले. यादरम्यान ज्योतीने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. मंदिराजवळ स्विटीला सोडून ज्योती पळून गेली. रस्त्याच्या कडेला पडलेल्या स्विटीवर एका पोलिसाची नजर पडली म्हणून तिचा जीव वाचला.

पोटच्या गोळ्य़ाला पुरले

भिवंडीत राहणाऱ्या ममता यादव या विवाहित महिलेचे शेजारच्या राकेश पटेल याच्यावर प्रेम होते. पतीला आणि १४ महिन्यांच्या मुलाला सोडून ममता राकेशसोबत पळून गेली. भिवंडीत ती राकेशसोबत राहत होती तर चिमुरड्या आर्यनला तिचा पती सांभाळत होता. आर्यन भविष्यात आपल्या नात्याला डोकेदुखी ठरू शकतो असा विचार करून ममता राकेशला घेऊन घरी गेली. झोपेत असलेल्या आर्यनला गळा दाबून मारले आणि जमिनीत पुरले. घरी परतल्यावर आर्यन कुठेच न दिसल्याने ममताच्या पतीने पोलिसांत तक्रार केली त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला.

रेल्वे स्थानकावरील टॉयलेटमध्ये मारले

नालासोपारा येथे राहणाऱ्या अंजाली सरोज या पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह गुजरातच्या नवसारी रेल्वे स्थानकावरील टॉयलेटमध्ये सापडला. पोलिसांनी याप्रकरणी अंजली हिच्या शेजारी राहणाऱ्या अनिता वाघेला हिला अटक केली. अनिता हिचे अंजली हिच्या वडिलांवर प्रेम होते. याच प्रेमसंबंधातून दोघांचे शरीरसंबंधही जुळले, मात्र पत्नी आणि मुलीला सोडून लग्न करण्यास अंजलीचे वडील तयार नव्हते. अनिता हिने दिलेल्या माहितीनुसार अंजलीच्या वडिलांनी दोनदा तिला गर्भपात करायला लावले. याचा बदला घेण्यासाठी अंजली हिला ठार केल्याचे तिने सांगितले.

दोन वर्षांतील काही धक्कादायक घटना

जानेवारी २०१६

नऊ वर्षांच्या अमेय चौगुले याने आईला अनेकदा एका परपुरुषाच्या मिठीत पाहिले. आई ओरडली की अमेय तिला याबाबत बाबांना सांगेन अशी धमकी देऊ लागला. अमेय वारंवार दोघांच्या मध्ये येत असल्याने आईने त्याची गळा दाबून हत्या केली.

सप्टेंबर २०१७

पंढरपूरमध्ये विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या दोन मुलांची आईकडून हत्या. सोनाली मिसाळ हिने दोन वर्षांचा आदर्श आणि चार महिन्यांचा प्रशांत याची हत्या केली. पतीला सोडून तिला प्रियकरासोबत जायचे होते त्यासाठी तिने दोन मुलांना कायमचे संपविले.

ऑक्टोबर २०१७

चहाचा कप हातातून पडला म्हणून आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या मुलाला ठार केल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगर येथे घडली. पंतनगर पोलिसांनी नितीन पाठारे या प्रियकराला अटक केली.

नोव्हेंबर २०१७

वर्सोव्याच्या खारफुटीत १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. क्राइम ब्रँच युनिट-९ च्या पथकाने याप्रकरणी या मुलाच्या विकृत काकाला अटक केली. लैंगिक संबंधास नकार दिल्याने नराधम काकाने त्याला संपविले.

फेब्रुवारी २०१८

आजारपणाला कंटाळून आईने दोन चिमुरड्यांचा जीव घेत आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिह्यात घडली. मनीषा घाडगे असे या महिलेचे नाव असून तिने चार वर्षांचा मुलगा आप्पासाहेब आणि एक वर्षाची मुलगी रेणुका हिला ठार मारले.

फेब्रुवारी २०१८

भविष्यात संपत्तीचा वाटेकरी होईल म्हणून भाऊ आणि वहिनीने मिळून सहा वर्षांच्या वैभव पारखे याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाणा गावात घडली.

एप्रिल २०१८

गोवंडी-शिवाजीनगर येथे पती-पत्नीच्या वादाचा फटका तीन वर्षांच्या चिमुरडीला बसला. वारंवार भांडत होत असल्याने पती घर सोडून निघून गेला. आईने राग तीन वर्षांच्या चिमुरडीवर काढला. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी वैरीण बनलेल्या आईला अटक केली.

>> [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या