आम्ही सावित्रीच्या लेकी

920

आज शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत… त्यापैकी थोडे वेगळे क्षेत्र निवडणाऱ्या मुलींची दखल.

होय. आम्ही सावित्रीच्या लेकी. शिक्षणाची ही वाट अनेक समाजसुधारकांच्या समिधा त्यात पडत गेल्या आणि ही वाट अधिकच सुकर होत गेली. आज जरी या वाटेवर अक्षरशः असंख्य पाऊलखुणा उमटत असल्या तरी अजूनही आपल्यापैकी बऱ्याच जणींसाठी ही सुंदर वाट बिकटच आहे. त्यांचे मनोधैर्य वाढावे आणि या वाटेवर चालणाऱ्या वेगळ्या पावलांचे कौतुक व्हावे यासाठी हा थोडा वेगळा प्रयत्न.

खरं तर औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे हे मनात होतंच. मायक्रो इकोलॉजी हा माझा फोटोग्राफीतला आवडता विषय. फोटोग्राफी करायची असे काही लहानपणापासून ठरले नव्हते. कारण फोटोग्राफीबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. मी बीएसी बायोटेक्नॉलॉजी पासआऊट झाल्यानंतर पदव्युत्तर करण्यासाठी बरेच विषय होते. पण माझा गोंधळ उडत होता. अशावेळी आई-बाबांशी चर्चा केली आणि एमएससी कोर्सची निवड केली. तुम्हाला बायोलॉजी, इकोलॉजी शिकायला मिळते, पर्यावरण विज्ञान काय आहेत या सगळ्याची माहिती होते. यामध्ये मला फोटोग्राफी हा विषय होता. त्यामध्ये मी जो प्रोजेक्ट करत होते त्या प्रोजेक्टमध्ये मला मायक्रो ऑर्गनिझम या विषयावर फोटोग्रापी करण्याची संधी मिळाली. त्याचे फोटो डॉक्युमेण्टेशन करता करता त्यात आवड निर्माण झाली. आता मला पुढे पी.एचडी. करायची आहे. वेगळी फोटोग्राफी करण्यात माझी आवड आहे. आज अनेक विद्यार्थिनींना परिस्थितीमुळे शिकता येत नाही. सावित्रीबाई फुले असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रचला आणि केवळ त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेतोय.

रमा परांजपे, एमएससी बायोडायव्हर्सिटी

लहानपणापासून काहीतरी वेगळं शिकायचं होतं. पण नेमकं काय ते कळत नव्हतं. एफवायला प्रवेश घेतला तेव्हा ‘रुरल डेव्हलपमेंट’ हा विषय होता. त्यात बरंच काही करता येण्यासारखं आहे असं माझे एक प्राध्यापक बोलले होते. तेव्हा मला ग्रामीण विकास हा विषय कळला आणि त्यात करिअर करण्याचा निश्चय केला. ग्रामीण विकास हा विषय जरा नवीन होता. त्यात ग्रामीण भागातील लोकांना स्कोप आहे असं वाटलं म्हणून तो निवडला. त्याचा फायदा गावातल्या लोकांना काहीतरी होईल, तिथला विकास व्हावा म्हणून… आत्ता म्हणायचं तर या विषयाला धरून एखादा जॉब मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच मी याच विषयात एम.फिल करतेय. माझ्या माध्यमातून गावातील लोकांना काही फायदा झाला तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे. कॉलेज करता करता सरकारच्या बऱ्याच स्कीम्स आलेल्या ऐकत होते. त्यातून मी काम करायचेही. पण ते तात्पुरतं असायचं. हा अभ्यास करता करताच माझं लग्न झालं आणि मी मुंबईत शिफ्ट झाले. त्यामुळे या करीयरपासून जरा लांबच झाले. पण अजूनही मी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. ग्रामीण विकास हा विषय निर्माण करण्यामागे युनिव्हर्सिटीचा उद्देश असा होता की त्यामुळे गावातल्या लोकांच्या समस्या काय आहेत ते कळतील. मुलींना शिक्षणाची आवड आहेच. त्यांना वाटतंच आपण शिक्षण घ्यायला हवं. पूर्वी गावात असा समज होता की मुली घरातच राहाव्यात. असं आता काही राहिलेलं नाही. गावातल्या लोकांनाही आपल्या मुली शिकाव्यात असंच वाटतं. ते त्यांना शिकायला पाठवताहेत.

अमृता अमित तेली, एम-फिल, ग्रामीण विकास

आपली प्रतिक्रिया द्या