लेख – थोर राष्ट्रभक्त आणि समाजोद्धारक

>> प्रा. डॉ. गजानन . एकबोटे

दलित-शोषितांचा उद्धार करणे हे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवितकार्यच होते. ते दलितांच्या उद्धारात अखिल हिंदुस्थानी समाजाचा उद्धार पाहत होते आणि आपल्या देशाचाही उद्धार पाहत होते. म्हणून तर त्यांच्या मनात दलितांच्या उद्धाराबरोबरच आपल्या देशाच्या उद्धाराचे विचार येत होते. ते त्यांचे आद्य कर्तव्य होते. त्यांना पुढील परिस्थिती तीव्रतेने जाणवली होती.

हिंदू समाज उच्च-नीचता आणि विषमता या दोन आधारांवर अनेक जातींमध्ये विभागलेला आहे. सर्वांत वरची जात सर्वाधिक मानाची. त्यानंतर एक-एक खालची जात कमी-कमी मानाची. ज्ञान आणि तत्संबंधी साधने सर्वांत वरच्या जातीच्या अधिकारात आहेत. ज्ञान, सत्ता व संपत्ती यांवर सर्वांत वरच्या जातीचा आणि आणखी काही वरच्या जातींच्या संगनमताचा एकाधिकार आहे. अशा वरच्या जातींच्या औदार्यावर खालच्या जातींचे जीवन अवलंबून आहे, पराधीन आहे.

उच्च-नीचता विषमता आणि खालच्या जातींची पराधीनता ही हिंदू समाजाची भयानक वास्तविकता आहे. हिंदू समाजाची दुसरी भयानक वास्तविकता ही आहे, की हिंदू समाज सवर्ण आणि दलित अशा दोन वर्गांत विभागलेला आहे.

स्पृश्य वर्गात येणाऱया वरच्या जातींना आपापसात स्पर्श चालतो, पण त्यांना दलित वर्गात येणाऱया खालच्या जातींचा स्पर्श चालत नाही. म्हणून सवर्ण वर्ग दलित वर्गाबरोबर ’अस्पृश्यता’ पाळतो; त्याला ज्ञान, सत्ता व संपत्ती यांच्या अधिकारापासून वंचित ठेवतो आणि त्याच्यावर अन्याय-अत्याचार करून त्याच्याकडून वाट्टेल ती कामे कमी मोबदल्यात किंवा विना मोबदल्यात करून घेतो. त्याला आपल्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पाणी भरू देत नाही आणि त्याला मंदिरातही येऊ देत नाही.

या सर्व दाहक वास्तवामुळेच दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आणि पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवितकार्याचा आरंभ सत्याग्रहापासून केला. त्या वेळी त्यांना जाणीव होती, की हिंदुस्थानवर ब्रिटिशांचे राज्य आहे आणि पारतंत्र्यातील हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सवर्णांनी लादलेल्या जातीभेदापासून, विषमतेपासून, दारिद्रय़ापासून आणि अत्याचारापासून दलित वर्गाला मुक्त करावयाचे होते आणि त्यासाठी त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यता, जातीभेद आणि विषमता या तीन शत्रूंच्या विरुद्ध मुक्तीचा संघर्ष सुरू केला होता. त्यांना हिंदू समाजाला या तीन शत्रूंपासून मुक्त करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन जीवनमूल्यांवर आधारित समाजाचे पुनर्संघटन करावयाचे होते.

डॉ. आंबेडकरांची क्रांतिकारी, दूरदर्शी आणि विशाल दृष्टी एका अर्थाने जातीअंतावर केंद्रित झाली होती. पहिल्या गोलमेज परिषदेत आणि दुसऱया गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या सामाजिक व राजकीय हितासाठी युक्तिवाद करून ब्रिटिश सरकारकडून अस्पृश्यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची सुविधा मिळविली. त्या सोयीमुळे अस्पृश्य उमेदवार अस्पृश्य मतदारांच्याच मतांवर निवडून येऊ शकत होता. त्यासाठी त्याला स्पृश्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नव्हती. परंतु ही सोय रद्द करण्यात यावी आणि अस्पृश्य उमेदवारालाही स्पृश्यांच्या मतांवर अवलंबून राहून संयुक्त मतदारसंघाच्या सोयीतून निवडणूक लढविण्याचे मान्य करण्यात यावे, म्हणून म. गांधींनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणामुळे म. गांधींची प्रकृती खालावत चालली होती. त्या वेळी डॉ. आंबेडकरांनी देशहिताला प्राधान्य दिले. त्यांचा देशहिताचा म्हणजेच राष्ट्रहिताचा विचार नेहमीच प्रखर होता. त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या जीवितकार्याची अंतिम परिणती देशहितात म्हणजेच राष्ट्रहितात होत होती. म्हणूनच ते नेहमी आपल्या भाषणातून आपला देशहिताचा प्रखर विचार मोठय़ा आवेशाने, गांभीर्याने आणि सडेतोडपणे व्यक्त करीत.

17 डिसेंबर 1946 रोजी डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या बैठकीत पं. नेहरूंच्या ठरावावर देशभक्तीने परिपूर्ण भाषण करताना सर्वांच्या हितासाठी अखंड हिंदुस्थानचे जोरदार समर्थन केले आणि हिंदुस्थानची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करू पाहणाऱया मुस्लिमांना उद्देशून ते म्हणाले, की एखाद्या दिवशी तेही विचार करतील, की संयुक्त हिंदुस्थानच म्हणजे अखंड हिंदुस्थानच त्यांच्यासाठीही अधिक चांगला आहे. “… they too will begin to think that a united India is better for them.”

25 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीच्या बैठकीत राज्यघटनेशी संबंधित अखेरचे भाषण करताना घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या मनात येणारा पहिला महत्त्वाचा विचार भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितला – ‘26 जानेवारी 1950 रोजी हिंदुस्थान खऱया अर्थाने स्वतंत्र देश होईल, पण स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की तो पुन्हा आपले स्वातंत्र्य गमावून बसेल? माझ्या मनात येणारा हा पहिला विचार आहे.’ स्वतंत्र हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची काळजी करणारे आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा राज्य कारभार लोकहितार्थ सुव्यवस्थित चालण्यासाठी घटनाकार म्हणून स्वतंत्र हिंदुस्थानच्या राज्यघटनेची निर्मिती करणारे डॉ. आंबेडकर एक थोर देशभक्त म्हणून स्वतंत्र हिंदुस्थानच्या हिताविषयी अत्यंत जागरुकतेने आणि दूरदर्शीपणाने काळजी व विचार करीत होते.

(लेखक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या