प्रासंगिक – विजयाचे प्रतीक असलेला सण

>> दिलीप देशपांडे

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडव्यापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. आपल्या दाराशी गुढी उभारणे हे विजयाचे तसेच समृद्धीचे प्रतीक समजले जाते. याच दिवशी अनेक जण नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात. नवीन कार, नवीन फ्लॅट अशा नानाविध वस्तूंची खरेदी करतात. जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करतो. एक ग्रॅम का असेना, पण घेतात. त्या दिवशी ते महत्त्वाचे मानले गेले आहे. ते समृद्धीचे समजतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक जण शुभसंकल्प करतात. या दिवशी केलेले संकल्प फलदायी ठरतात असा अनेकांना अनुभव आहे. गुढीपाडवा आपापसातील वैरभाव, मतभेद विसरून शांतता मिळवून देणारा आनंददायी असा सण आहे. गुढीपाडवा साजरा करण्यामागे नैसर्गिक, आध्यात्मिक कारणे आहेत.

नवसंवत्सराचा प्रारंभ होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस महत्त्वाचा तसेच पवित्र समजला जातो. याच दिवशी नवीन वर्षाचे पंचांग आणून त्याचेही पूजन केले जाते, वाचन करतात. अनेक शहरांत, गावांत पहाटेच भक्तिसंगीताचे ‘पाडवा पहाट’सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात  अनेक ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करून शोभायात्रा काढल्या जातात आणि नववर्षाचे स्वागत केले जाते. आनंददायी सुरुवात केली जाते.

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून रावण आणि राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून घरोघरी तोरणे, पताका लावून स्वागत केले.

प्रभू श्रीरामचंद्रांचे विजयाचे प्रतीक, रावणावरच्या विजयाचे कौतुक असा हा आनंददायी सण.

विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी

प्रभु आले मंदिरी….

गुलाल उधळूनी नगर रंगले

भक्तजनांचे थवे नाचले

रामभक्तीचा गंध दरवळे

गुढय़ातोरणे घरोघरी गं घरोघरी

प्रभु आले मंदिरी

अयोध्येचा आला राजा

या गाण्यात त्याचे खूप छान वर्णन केले आहे. रावणाच्या त्रासातून मुक्त झाल्याने व श्रीरामाचे आगमन झाल्याने नगरवासी आनंदित झाले आहेत. त्यांनी गुढय़ा उभारल्या, तोरणांनी घर सजविले…गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी हे गाणे ऐकायला मिळते.

पार्वती आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला अशीदेखील कथा आहे. भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्यावतार घेतला. या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले. या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

सत्ययुगाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा… प्रभू श्रीरामाच्या आगमनाचा दिवस! आता गुढीपाडवा हाच नववर्षाचा दिवस आहे आणि पाश्चात्त्यांनी आपल्यावर लादलेला नववर्ष दिवस हा मोडीत काढायला हवा. त्यादृष्टीने सर्वसमावेशक प्रयत्न करायला हवेत.  गुढीपाडवा… आध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि ते योग्यच आहे.

पाश्चात्त्यांचे करत असलेले अंधानुकरण रोखण्यासाठी  आपण सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. गुढीपाडव्याला मांगल्याची गुढी उभारून, नववर्षाचे स्वागत करून, एकमेकांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन  आपला मराठी बाणा जपू या!