होळी एक लोकोत्सव

>> अरविंद दोडे

आज सर्वत्र होलिकादहन होईल. होळी हा एक लोकोत्सव आहे. प्रदेशानुसार प्रत्येक ठिकाणी तिचे वेगळे वैशिष्टय़ आहे.

होळी हा एक लोकोत्सव आहे. याचे दुसरे नाव शिमगा. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा करतात. शालिवाहन शकाच्या गणनेनुसार अखेरचा महिना फाल्गुन, या महिन्यात उत्सव करावा, असे पुराणग्रंथात सांगितले आहे. यास ‘होलिकादहन’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’ अशी विविध नावे असून दक्षिणेत ‘कामदहन’ असेही म्हणतात. खरे तर, वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ हा उत्सव होत असल्याने या उत्सवास ‘वसंतोत्सव’ असेही संबोधतात. होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम आणि राक्षस सारख्या पीडादायक गोष्टींपासून असल्याचे सांगतात.

मुळातच आपण हिंदुस्थानी अग्निदेवतेचे उपासक आहोत. अग्निपूजनाची परंपरा फार प्राचीन आहे, त्याच्या हा सुंदर आविष्कार म्हणजे होळी. या उत्सवाचे विधिविधान असे आहे की, फाल्गुनी पौर्णिमेच्या संध्याकाळी क्रतकर्त्याने होळी पेटवावी. अर्थात शूचिर्भूत होऊन सहकुटुंब, आप्त आणि इष्ट मित्रांसह होळीची पूजा करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. लाकडे, ढलप्या, गवऱया यांचा ढीग रचून त्यात एरंडाची फांदी उभी करावी. नंतर ‘श्री होलिकायै नमः’ असा मंत्र त्रिवार उच्चारावा. होळीची प्रार्थना करताना म्हणावे, ‘‘इडापीडा टळो, सुखाचे समृद्धीचे राज्य येवो.’’ वगैरे… नंतर होळीला तीन प्रदक्षिणा घालून बोंब ठोकावी. फाल्गुन शद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गवऱया जमा करायला आरंभ करतात, हे साहित्य चोरून आणावे अशी प्रथा आहे. होळीसाठी लागणारा विस्तव लहान मुलाच्या हस्ते आणतात. गल्लोगल्ली फिरावे, अर्थात होळी पेटविल्यानंतर वाद्ये वाजवावीत. शिव्या देत, अश्लील गाणी गात, नाचत वेळ घालवावा. काही ठिकाणी दानधर्म करतात.

होळी पूर्ण जळल्यानंतर ती दुधातुपाने शिंपतात आणि तिला शांत करतात. मग जमलेल्या लोकांना नारळाचा प्रसाद म्हणून वाटप करतात. इतर फळेही देतात. होळीची रात्र नाचगाण्यात, गप्पागोष्टी करण्यात घालवतात. दुसऱया दिवशी अश्लील बोलून रक्षा नदीत, समुद्रात किंवा तलावात विसर्जित करतात. काही ठिकाणी अंगाला राख फासून नृत्य गायन करतात.

‘विष्णुपुराणा’तील कथेनुसार ‘होळी’ कशी सुरू?
भक्त प्रल्हादाची बहीण होती. हिरण्यकश्यपूची मुलगी. प्रल्हाद ‘हरिनाम’ घेतो म्हणून त्याचा पिता भयंकर भडकला होता. प्रल्हादाला अनेकदा मारण्याचा प्रयत्न करूनही तो जिवंत राहिला होता. पिता होता राक्षसराजा. प्रल्हादाची आई कयाधू. ती गरोदरपणी एका ऋषीच्या आश्रमात राहिली. तिथे देवर्षी नारद आले. तिथे प्रार्थना केली, ‘‘मला भगवद्भक्त पुत्र हवा.’’

नारदांनी तिला सहा महिने विष्णूकथा ऐकवल्या. पुत्रप्राप्ती झाली. नाव ठेवण्यात आले प्रल्हाद. कयाधू आपल्या पुत्रास घेऊन अर्थात काही वर्षांनी आपल्या राजवाडय़ात परतली. प्रल्हाद बोलूचालू लागला होता. आई-बाबा बोलण्याऐवजी ‘हरीहरी’ म्हणत होता. राक्षसराजाने त्यास सांगितले, ‘‘देव आपले शत्रू. त्यांचं नामस्मरण करू नकोस.’’

अखेरचा प्रयत्न म्हणुन राक्षसराजाने चित्ता रचायला सांगितली. तो होलिकेस म्हणाला, ‘‘तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चित्तेवर बस. आग लागली की, प्रल्हाद वैकुंठाला जाईल. तू जिवंत राहशील.’’

कारण तिने तपस्या केली होती. शिवाने तिला वर दिला होता, ‘‘तुला अग्नी जाळू शकणार नाही.’’ झाले चित्ता पेटवण्यात आली.

होलिका भस्म झाली. प्रल्हाद जिवंत राहिला. भक्तीचा प्रताप सिद्ध करण्यासाठी ही भक्तिकथा बोधप्रद आहे. आपले राक्षसी विचार जळून नष्ट व्हावेत. तामसगुणांचा शेवट व्हावा. सात्त्विक गुण वाढवून मानवाने ‘देवत्व’ मिळवावे. सर्वांना आपला आदर वाटावा. आयुष्याचे सार्थक व्हावे म्हणून ही दृष्टांतकथा!

– गोव्यातही उत्सव मजेदार असतो. पंडित महादेवशास्त्री जोशी हे गोवेकर. त्यांनी म्हटले आहे, ‘शिमगा करणं आम्हास मान्य नाही. आम्ही गातो, नाचतो, वाजवतो अन् खेळतो. आमची होळी जळत नाही तर उभी राहते. ग्रामदेवतेसमोर ती उभी राहिल्यावर तिची पूजा करतात. आम्रपर्णांनी तिला सजवून एक सोललेला नारळ (शहाळे) ठेवतात. कागदी झेंडा अडकवतात. हळदीकुंकू अन् अक्षता वाहतात. त्यावेळी बोंबा मारतात. सोंगे निघतात. ‘खेळये’ येतात आणि राधानृत्य होते.

– तामीळनाडूत मात्र जे कामदहन करतात. ते असे असते की शिवमंदिरासमोर होळी पेटवतात. मदनाचा पुतळा त्या होळीत दहन करतात. यामागे भावना मात्र उदात्त असल्याचे दिसते. मानवी मनोकामभावना तीव्र असते. भक्ती करताना आपल्या कामभावनेवर नियंत्रण हवे हे सांगणारा हा प्रकार प्रतीकात्मक असून शिवासारखा ईश्वर हा भोळा असल्याने निर्मळ, निरागस, भक्तीचा चाहता आहे तेव्हा त्याच्या गाभाऱ्यात ‘निष्काम’ भावनेनेच प्रवेश मिळतो,
असा त्या होळीचा अर्थ!

– होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवाचे दिवस वेगवेगळय़ा प्रकारे साजरे होतात. बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला ‘दोलायात्रा’ सुरू होते. घरचा पुरुष उपवास करतो. सकाळी कृष्णपूजा करतो. सायंकाळी अग्निपूजा करून कृष्णमूर्तीवर गुलाल उधळतो. फल्गू म्हणजे गुलाल. जमलेल्या व्यक्तींवर गुलालाचा शिडकावा करतो. घराबाहेर गवताची मनुष्याकृती जाळतो. पौर्णिमेच्या दिवशी कृष्णमूर्ती झोपाळय़ावर किंवा पाळण्यात ठेवतात. झोके देत कृष्णगीते गातात.

-ओडिशा राज्यात चैतन्यपंथाचे लोक कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढतात. घरोघरी कृष्णास अबीर लावतात. गुलाल लावतात. वस्त्र, अलंकार, धन, धान्य देतात. काही ठिकाणी एका मुलास कृष्णवेष देतात. त्याच्याभोवती
टिपऱ्यांचा नाच करतात.

– उत्तर प्रदेशात ‘बुरा ना मानो होली है’ म्हणून हास्यकवितांचे कार्यक्रम होतात. लालपिवळे कपडे घालून गुलाल उधळतात. गाणी गात गल्लोगल्ली फिरतात. होळीच्या दिवशी चव्हाटय़ावर होलिकापूजन होते.

आपली प्रतिक्रिया द्या