प्रासंगिक – होळीचा सण!

>> दिलीप देशपांडे 

होळी हा रंगांचा सण आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सर्व जणांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याचा हा सण आहे. रंगांची उधळण तर असतेच, पण मनातील राग होळीच्या दिवशी आरोळय़ा मारून काढतात. ग्रामीण भागात त्याला बोंबा मारून राग व्यक्त करणे म्हणतात. एखाद्याच्या नावाने शिमगा करण्याची प्रथाही या सणात आहे. त्या दिवशी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक गमतीदार भाग म्हणून स्वीकारला जातो. तरी पण अशाप्रकारे आरोळय़ा मारताना त्या कृतीने आजूबाजूला तणाव निर्माण होईल अशी कृती मात्र व्हायला नको हे बंधन प्रत्येकाने पाळायला हवे.

आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते, मग रामनवमी, अक्षय तृतीया, गणपती, दुर्गा उत्सव, नवरात्र (दसरा), दिवाळी (वसुबारस, पाडवा, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, भाऊबिज.) आणि शेवटचा सण तो होळीचा सण असतो. फाल्गुन पौर्णिमेला आपण ‘होळी’ सण साजरा करत असतो. त्यालाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. होळीला शिमगा असेही म्हणतात. तसेच होरी हा शब्दसुद्धा प्रचलित आहे.

वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. वातावरणात नैसर्गिक बदल झाला असतो. थंडी संपून ऊन तापायला सुरुवात झाली असते. उन्हाळय़ाची चाहुल लागते. पानगळ सुरू झाली असते. पळसाला फुले आली असतात. पूर्वीच्या काळी होळीच्या वेळी रंग ओढण्यासाठी पळसाच्या फुलाचा वापर केला जात असे. फुलाचा रंग काढून तो लावला जात असे. आयुर्वेदातही पळसाच्या फुलाचे महत्त्व आहे. आंघोळीच्या पाण्यात पळसाची फुले टाकून आंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसा होतो, असे म्हटले आहे.

उत्तर भारत, दक्षिण भारत, महाराष्ट्रात होळीचा सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, कोकण या ठिकाणीसुद्धा वेगवेगळय़ा पद्धतीने होळी साजरी करतात. कोकणात होळीचा सण जवळपास पंधरा दिवस साजरा केला जातो, तर इतर ठिकाणी होळी पौर्णिमा धुलिवंदन म्हणजेच धुळवड, नंतर रंगपंचमी शिमगा असा हा सण वेगळय़ा पद्धतीने साजरा होतो.

कोकणात होळीचा उत्सव मोठा असतो. विशेष रत्नागिरी जिह्यात जास्त. तसेच मालवण. तिकडे याला ‘शिमगो’ असेही म्हणतात. कोकणात हा सण 5 ते 15 दिवस असतो. होळीचा हा मुख्य दिवस असतो. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावण्याचा मान असतो व त्यातील निखारा घेऊन मग गावातील ठिकठिकाणी होळी पेटवली जाते. होळी पौर्णिमा, धुळवड आणि रंगपंचमी असा हा सण साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण समजला जातो. तसेच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. तसेच पारंपरिक नृत्य, पारंपरिक गाणी यामध्ये साजरी केली जातात. वंजारी समाजात होळीला फार महत्त्व आहे. पारंपरिक पोषाख घालून नृत्य करण्याची प्रथा आहे.

 होळी सण साजरा करत असताना वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी. वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते याचे भान ठेवावे. तसेच त्याच्या गल्लीतील लोक स्वेच्छेने देतील तेवढय़ा गोवऱ्या आणि लाकडे होळी जाळण्यासाठी घ्यायला हवीत. उगीच त्यासाठी वादावादी करू नये. सगळय़ांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा सण असल्यामुळे अशा गोष्टी घडायला नको. जेणेकरून हा सण बंधूभावाने व आनंदाने साजरा होईल.

[email protected]