चूकभूल द्यावी – घ्यावी

>> दिलीप जोशी
khagoldilip@gmail.com

इंग्रजीत एक म्हण आहे. ‘टू अर इज ह्य़ुमन, टू फर्गिव्ह इज गॉड’ म्हणजे चुकणे हा माणसाचा आणि क्षमाशील असणे हा देवाचा स्थायिभाव आहे. सुज्ञ माणसांचा परस्पर व्यवहार वाढीला लागल्यापासून माणसांच्या कर्तृत्वाबरोबरच त्यांच्या चुकांचाही आरंभ झाला. जो माणूस काही कार्य करतो तो केव्हातरी चुकतो. निक्रिय माणूस कसा काय चुकणार? असं चूक झाल्यानंतर म्हटलं जातं. आयुष्यात एकदाही एकही चूक केली, घडली नाही असा माणूस अस्तित्वात असणं कठीण. किती काळजी घेतली तरी चुका होतातच. काही घाईगडबडीत, अनावधानाने तर काही वेळा परिस्थितीचं योग्य आकलन न झाल्याने ‘विचारपूर्वक’ घेतलेले निर्णयही कालांतराने चुकीचे ठरू शकतात. चूक जेव्हा अपराध आणि गुन्ह्य़ामध्ये रूपांतरित होते तेव्हा ती शिक्षेस पात्र ठरते. अनावधानाने किंवा गफलतीने झालेल्या चुकांच्या बाबतीत माणसं एकमेकांना सांभाळून घेतात ही संस्कृती असते. पु.ल. देशपांडे यांनी एकेठिकाणी म्हटलंय की, एखाद्याला चुकून धक्का लागला तरी नमस्कार करणं ही सांस्कृतिक गोष्ट आहे. गर्दीच्या ट्रेनमध्ये असं अनेकदा घडतं आणि माणसं ओशाळून एकमेकांना नमस्कार करतात कारण दुसराही क्षमाशील असतो. निगरगट्ट आणि हेतुपुरस्सर धक्काबुक्की करणाऱ्यांसाठी मात्र कायद्याचा बडगाच आवश्यक ठरतो.

काही चुका नकळत घडतात. बरं करायला जावं तरी ती गोष्ट चुकते कारण आपला अंदाज चुकलेला असतो. क्षुल्लक चुकांचे परिणाम फार होत नाहीत. मागच्या वेळी झालेली गफलत टाळून पुढच्या वेळी तशाच परिस्थितीत अधिक सावधानतेने वागण्याचा इशारा अंतर्मन आपल्याला देतं. ‘सेल्फ करेक्शन’ किंवा स्वतःमध्ये उत्तरोत्तर सुधारणा ही आयुष्यभर न संपणारी गोष्ट असते. जुन्या चुका टाळल्या तरी नव्या होतच राहतात.

तसं पाहिलं तर नवीन काही शिकतानाची सुरुवात चुकतमाकतच होते. पाटीवर (किंवा आता वर्कबुकमध्ये) पहिली अक्षरं गिरवताना नवं यंत्र चालवायला शिकताना, नवा खेळ खेळताना, नवी कला आत्मसात करताना नवोदित म्हणून चुका करतच प्रत्येकजण पुढे जातो. त्या चुका सुधारण्यासाठी बालपणी आईवडील शिक्षक असतात. मोठेपणी विशिष्ट शिक्षण घेताना ‘गुरू’ करावा लागतो तो त्या क्षेत्रातील चुका टाळून यश मिळविण्यासाठीच.आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर संभाव्य चुका टाळत सावधपणे प्रवास करावा लागतो. तरीसुद्धा भल्याभल्यांचे अंदाज चुकतात. ऐतिहासिक गफलती होतात. फार मोठय़ा माणसांकडून होणाऱया चुकांचे परिणामही मोठे असतात. उर्दूमध्ये असं म्हटलं जातं की, ‘लम्होंने खता की और सदियों ने सजा पायी’ म्हणजे कधीतरी काही ‘क्षणांनी’ चूक केली आणि त्याची शिक्षा पुढे (समाजाला) अनेक शतकं भोगावी लागली.

संत प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आजवर जगाला क्षमाशील होण्याचा सल्ला दिलेला आहे. व्यावहारिक जगात प्रत्येक चूक क्षम्य नसली तरी अगदी लहानसहान चुकांसाठी एखाद्याला धारेवर धरणं चुकीचं. यासाठी तारतम्याने, विवेकाने वागण्याची गरज असते. आपण जेव्हा चुकतो तेव्हा इतरांकडून आपल्या ज्या क्षमाशील वृत्तीची अपेक्षा करतो तसंच आपणही इतरांच्या बाबतीत वागतो का हा खरा प्रश्न असतो. अनेक अहंकारी माणसं सतत इतरांच्या चुका दाखवून त्यांना घालूनपाडून बोलत असतात, पण आपणही कधी चुकू शकतो याचे त्यांना भान नसतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असंही म्हटलं जातं. ही सत्ता समाजजीवनात ठायी ठायी विविध प्रकारची असते. अगदी चार मित्रांमध्येसुद्धा एखादा प्रभावी (डॉमिनन्ट) म्हणजे औट घटकेचा सत्ताधीशच असतो. अशा नेतृत्वगुणांचा समाजाला फायदाही होतो, पण नेतृत्व बरोबरच्यांचा उत्कर्ष करणारं असलं तर!

जगाच्या इतिहासातील उन्मत्त सत्ताधीशांच्या मनमानीमुळे राज्यच्या राज्य लयाला गेल्याचं इतिहास सांगेल म्हणून राजसत्तेनेही ‘सम्यक’ (बॅलन्स्ड) वर्तनच्या राजधर्म पाळायचा असतो असं आपली संस्कृती सांगते. सत्तेपुढे शहाणपणापेक्षा सत्ताधीशच (मग ते कोणत्याही स्वरूपाचे) सुज्ञपणाने वागले तर अधिक उत्तम. हे सर्व चूक अथवा गफलत – पुराण लिहायला परवाच एक कारण घडलं. फ्रेंच संसदेने ‘राइट टू मिस्टेक’ किंवा ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ असा ठराव संमत केला. त्याचा उद्देश असा की अनेकदा अनेकांकडून अनावधानाने ज्या चुका घडतात त्याबाबत कठोर उपाय न करता एक चूक सुधारण्याची संधी सर्वांना मिळावी. त्यामुळे त्या व्यक्तीला दिलासा तर मिळेलच पण जबाबदारीची जाणीव वाढेल आणि जागरूक नागरिक निर्माण होतील. अर्थात यामध्ये हेतूपूर्वक केलेल्या गुन्हय़ांसारख्या गंभीर ‘चुकांचा’ समावेश अर्थातच नाही. कोणतीही चूक करून सुटून जाऊ अशी सवलत हा कायदा देत नाही. मात्र माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीला आवाहन करण्याचा हा एक प्रयोग आहे. त्यातून समाजात सुधारणा दिसली तर हा ठराव अचूक ठरेल अन्यथा ‘चूक’ सुधारून तो मागे घ्यावा लागेल पण तेव्हा माणसातल्या चांगूलपणाचा, तात्पुरता का होईना पराभव झालेला असेल.