मुद्दा : ग्रामीण आरोग्य सेवा आणि परिचारिकांचे योगदान

25


नर्सिंग अर्थात परिचर्येच्या कामाला अपवादात्मक सेवा व त्यागाचा वारसा आहे. प्रत्येक व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची व्याख्या नव्याने करण्यासाठी दररोज लक्षावधी स्त्रिया एक चाकोरी मोडत आहेत. परिचारिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.

आरोग्य सेवेच्या क्षेत्रात प्रगती होत असतानाच, जगभरात परिचारिकांचा तुटवडा मात्र तीव्र जाणवत आहे. सध्या हिंदुस्थानात दर हजार लोकांमागे 1.7 परिचारिका आहेत. जगात हे प्रमाण हजार लोकांमागे 2.5 परिचारिका असे आहे. लोकसंख्या वाढत असल्याने प्रशिक्षित आरोग्य सेवा व्यावसायिकांची गरजही त्याच पटीत वाढली आहे. गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवकांची संख्या लक्षणीय वाढली असली, तरी पर्याप्त आरोग्य सेवांमधील तफावत दूर करण्यासाठी ती पुरेशी नाही. हिंदुस्थानातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा सुधारला जाणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑक्झिलिअरी नर्सेस अँड मिडवाईव्हज् (एएनएम) प्रशिक्षण कार्यक्रम हा इंडियन रेड क्रॉस सोसायटी, महाराष्ट्र व सोसायटी ऑफ जीझस, मेरी अँड जोसेफ या संस्थांनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सहयोगाने सुरू केला आहे. हिंदुस्थानी ग्रामीण भागातील परिचारिका व दायांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियातर्फे चालवल्या जाणाऱ्या बेल एअर कॉलेज ऑफ नार्ंसगमध्ये हा कार्यक्रम 2010 साली सुरू करण्यात आला. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या आर्थिक पाठबळावर दोन वर्षांचा शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवला जातो. यातून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व खर्चाची पूर्तता होते. यात जेवण व निवासखर्चाचाही समावेश आहे. 2016 मध्ये या कार्यक्रमाचा विस्तार करून तो आंध्र प्रदेशातही सुरू करण्यात आला.

बेल एअर कॉलेज ऑफ नार्ंसगमधील निवड झालेल्या उमेदवारांना हिंदुस्थानी परिचर्या परिषदेने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी वर्गातील सत्रे पूर्ण करतात आणि त्यांची क्लिनिकल स्थळांना पोस्टिंग्ज केली जातात. तेथे त्यांना सामूहिक आरोग्य परिचर्या, प्राथमिक आरोग्य सेवा, बालआरोग्य परिचर्या आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड इंडिया (सेंटर फॉर ब्लाइंड विमेन) ही संस्थाही जर्मनीच्या ‘डिस्कव्हरिंग हॅण्ड्स’ या संस्थेसोबत सहयोग करून एक निराळाच कार्यक्रम राबवत आहे. ही संस्था स्तन कर्करोगाच्या निदानासाठी तपासणीची सुविधा देते. बायर क्रॉप सायन्सेसची मदत लाभलेल्या या कार्यक्रमात अंध तसेच दृष्टिदोष असलेल्या स्त्रियांना स्तन कर्करोगाच्या निदानासाठी स्त्रियांना तपासण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या स्त्रियांना मेडिकल टॅक्टाइल एक्झामिनर्स (एमटीई) होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

डिस्कव्हरिंग हॅण्ड्सचे प्रमुख, नेक अँड ब्रेस्ट सर्जन, मेडिकल लीड व मेंटर डॉ. मनदीप मल्होत्रा यांच्या मते, एमटीई हा प्राथमिक तपासणीच्या माध्यमातून लवकर निदान करून आयुष्ये वाचवण्याचा प्रभावी मार्ग आहे. हिंदुस्थानातील स्तनांच्या आरोग्यातील एमटीईच्या प्रो-बोनो स्वरूपातील कामाचा ते सक्रिय पुरस्कार करतात.

गेल्या दशकात आपण खूप काही साध्य केले असले तरी अद्याप आपल्याला खूप मोठा प्रवास करण्याची गरज आहे. नेतृत्वाचे चैतन्य सीमापार नेण्याची क्षमता परिचर्येमध्ये आहे. या निःस्वार्थ योगदानाला आपण मान्यता दिली पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. आपण आपल्या परिचारिका करत असलेल्या कामाचा गौरव करू आणि देशासाठीच्या या सेवेत आणखी अनेक स्त्रिया सहभागी होतील अशी आशा करू.

आपली प्रतिक्रिया द्या