लेख – चीनवर अंकुश ठेवण्यासाठी तैवानचे महत्त्व

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन

शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. म्हणूनच आपण तैवानला चीनशी लढण्याकरिता सगळ्य़ा प्रकारची मदत करायला पाहिजे. एवढेच नव्हे तर, तैवान ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे. आपण आपल्या आर्थिक व्यवस्थेला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या वेळेला तैवानची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमधली मदत ही महत्त्वाची ठरू शकते. तैवान तांत्रिक क्षेत्र, विशेषतः सेमीकंडक्टर चिप उत्पादनाच्या पुरवठा शृंखलेच्या दृष्टीने महत्त्वाचा देश आहे. याच कारणामुळे जगातील लोकशाही देश प्रामुख्याने जपान, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सने आता एकजुटीने तैवानचे सार्वभौमत्व वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

तैवानविरोधात चीन सतत आक्रमक कारवाया करत आहे. जानेवारी – एप्रिल 2021 या महिन्यांमध्ये चीनने रोज तीन ते चार लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीमध्ये घुसवली . मे महिन्यामध्ये दर दोन दिवसांनंतर चिनी विमाने तैवानच्या आकाशात आक्रमक कारवाया करत होती. अर्थातच याला प्रत्येक वेळेला तैवान आक्रमक प्रत्युत्तर देत होते. काही वेळा तैवानी लढाऊ विमाने चीनच्या विमानांना चॅलेंज करण्याकरिता आकाशात उडाली, तर काही वेळा तैवानची विमानविरोधी क्षेपणास्त्रे चिनी विमानांच्या दिशेने नेम साधून होती, परंतु तरीही चीनची आक्रमकता कमी होत नाही. चीन तैवानवर खरोखरच हल्ला करेल का?

काही महिन्यांपूर्वी तैवानमध्ये चीनचे सुखोई विमान कोसळले. तैवानच्या वायुदलाने चीनचे सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय  व्यक्त करण्यात आला. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचे विमान घुसल्याने विमान पाडण्यात आले. विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा वापर केला.

दर सहा महिन्यांनंतर चीन तैवानच्या समुद्रामध्ये नौदलाची आक्रमक कारवाई करतो. समुद्रातून तैवानच्या किनारपट्टीवर बोटीतून हल्ला करण्याचा सराव चीन वेळोवेळी करते. चीनने तैवानवर समुद्राकडून हल्ला करण्याची आपली क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली आहे. चीनकडे हल्ला करण्याकरिता समुद्रातून जमिनीवर हल्ला करणाऱया सहा ब्रिगेड (Amphibious brigade) आहेत. ब्रिगेडमध्ये लँडिंग शिप मोठी, लँडिंग शिप रणगाडे, लँडिंग क्राफ्ट अशा विविध समुद्रांतून हल्ला करणाऱया बोटी आहेत. शिवाय तैवानवर हल्ला करण्याकरिता चीनने एक स्पेशल फोर्सेस ब्रिगेड आणि एक एव्हिएशन ब्रिगेड पण तयार केली आहे.चीनच्या एव्हिएशन ब्रिगेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत.

तैवानचे चीनला आक्रमक प्रत्युत्तर

परंतु चीनला तैवानच्या पश्चिम किनारपट्टीवर समुद्राकडून हल्ला करणे सोपे नाही. कारण पावसाळा चालू असताना चार ते पाच महिने समुद्र अतिशय खवळलेला असतो आणि हल्ला करणे अशक्य असते. नंतरचे तीन ते चार महिने हिवाळ्यामध्ये इथे प्रचंड प्रमाणामध्ये धुके पसरलेले असते, काही दिसत नाही. ज्यामुळे हल्ला करणे अशक्य होते. याशिवाय तैवानची पश्चिम किनारपट्टी ही अतिशय खडकाळ आहे आणि समुद्राकडून हल्ला करण्याकरिता योग्य नाही. म्हणून चीन आता तैवानच्या मागे जाऊन पूर्व किनारपट्टीवरून हल्ला करण्याकरिता लढाऊ बोटींची क्षमता निर्माण करत आहे. चीनने हवाई दलाची ताकद वाढवली आहे, समुद्राकडून हल्ला करणाऱया बोटींची संख्या वाढवली आहे.

हिंमत असेल तर आमच्यावर वार करूनच दाखवा, आम्ही स्वागतासाठी तयार आहोत असे आव्हान तैवानने चीनला दिले आहे. नजीकच्या काळात घडलेल्या घडामोडींवरून तैवान आणि चीनमधील संबंध कमालीचे तापल्याचे दिसते. तथापि, तैवानने चीनला शिंगावर घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. हेरगिरी जहाजांपासून ते लढाऊ विमानांनी घिरटय़ा घालून तैवानला घाबरविण्याचे उद्योग चीन करत आहे. तथापि, चीनने घुसखोरीचे, भीती दाखविण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तैवान अतिशय निधडेपणाने त्याचा सामना करत आहे.

तैवाननेसुद्धा चीनला आपली प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवणे सुरू केले आहे. तैवान आपल्या पश्चिम किनारपट्टीवर चिनी सैन्याला येता येऊ नये म्हणून अनेक अडथळे निर्माण करत आहे. अनेक मोठय़ा तोफा आणि इतर शस्त्रे चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरिता तिथे तैनात केली आहेत. यामुळे चीनने तैवानच्या पश्चिम किंवा पूर्व किनारपट्टीवर जर हल्ला केला तर त्याची चीनला मोठी किंमत चुकवावी लागेल.

याशिवाय जपाननेसुद्धा म्हटले आहे की, तैवानवर हल्ला झाला तर जपान तैवानला मदत करेल. अमेरिका तैवानला मदत करेल की नाही याबाबत शंका निर्माण होत होती, परंतु आता अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी चीनच्या विरोधात आक्रमक धोरण सुरू केलेले आहे. जी-7 देशसुद्धा चीनविरोधात आहेत.

चीनने त्यांच्या तटरक्षक दलाला गरज पडल्यास परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी दिली आहे. चीन-तैवान संघर्ष सुरू असतानाच अमेरिकी नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेने दक्षिण चिनी समुद्रात प्रवेश केला. समुद्री स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे जरी कारण अमेरिकेने दिले असले तरी त्याचे मुख्य कारण हे दक्षिण चीन समुद्रातील चीनची दादागिरी रोखणे हे आहे.

चीनने तैवानवर आक्रमण केले व त्यात तैवानचा पराभव झाला तर काय होऊ शकते? असे झाल्यास चीनचा दक्षिण चीन समुद्रासह प्रशांत महासागरात दबदबा वाढेल. सोबतच त्यानंतर चीन हिंदी महासागरावरही आपले एकहाती वर्चस्व गाजवण्यासाठी हरतऱहेने प्रयत्न करणार. त्यामुळे अमेरिका, युरोप, जपान व ऑस्ट्रेलिया आणि नंतर हिंदुस्थानसमोरही बिकट परिस्थिती निर्माण होईल.

  • तैवान हा पूर्व आशियातील एक अंदाजित 36 हजार चौरस किमी पसरलेला तीन कोटी लोकसंख्येचा देश आहे. मात्र, या देशाचे स्वातंत्र्य सुरुवातीपासूनच चीनच्या आक्रमक राजकारणामुळे अमान्य होत राहिले. चीन आजही या देशाला आपलाच भूभाग मानतो. एवढेच नाही तर तैवानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले तर हल्ल्याची धमकीही चीनने तैवानला दिली आहे. त्यामुळे जागतिक अर्थकारणात महत्त्वाचा हिस्सा असलेला व लोकसंख्येच्या दृष्टीनेही महत्त्व असणाऱया या देशाला संयुक्त राष्ट्रांत केवळ चीनच्या दबावामुळे आपला प्रतिनिधी अद्याप पाठवता आलेला नाही. तैवानला स्वतःचा ध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, स्वतःची वेगळी संस्कृतीही आहे, धर्मही आहे, परंतु चीनने वारंवार दादागिरी केल्याने हा देश चीनचाच एक भाग म्हणूनच पाहिला जातो. मात्र, आज इतक्या वर्षांनीही तैवानने चीनचे अधिपत्य मानले नाही. आपले स्वतंत्र राष्ट्र होते आणि आहे यावरचा त्यांचा विश्वास तिळभरही ढळला नाही. मातृभूमीच्या स्वातंत्र्याची सर्वोच्च भावना तैवानी जनतेमध्ये आणि सरकारमध्येही आहे. याचे कारण तैवानमध्ये 80 टक्के जनता ही मूळची तैवानीच आहे.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या