पेपरफुटी आणि कॉपी : कुंपणच शेत खातंय!

संदीप वाकचौरे

राज्यातील परीक्षा पेपरफुटीचे आणि कॉपीचे वाढते प्रकार चिंताजनक आहेत. त्याहीपेक्षा यामध्ये विद्यार्थी, पालक, शाळांचा सहभाग असणे ही बाब अधिक काळजीची आहे. विद्यार्थी फुटलेला पेपर मिळवून, कॉपी करून अधिक मार्क मिळविण्याचा प्रयत्न करत आई -बाबांची इच्छा पूर्ण करू पाहत आहे, तर पाल्यास वाममार्गाने जरी अधिक मार्क मिळाले तर उद्याच्या अपेक्षित अभ्यासक्रमांचा मार्ग मोकळा होईल म्हणून पालकच पाल्याला वाममार्गाला घेऊन जात आहेत. शाळांची गुणवत्ता उंचावलेली दिसल्यास विद्यार्थ्यांचा, पालकांचा ओढा अधिक वाढेल. त्यातून ‘अर्थ’गणित सहजतेने जुळवता येईल म्हणून या प्रकारात शाळा आणि शिक्षकांचा सहभाग वाढताना दिसत आहे. हे वास्तव भविष्य अंधारमय बनवणारे आहे.

राज्यात बारावीच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याचदरम्यान राज्यात काही ठिकाणी काही विषयांचे पेपर फुटले आहेत. समाजमाध्यमावर पेपर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पेपरफुटीमागे शिक्षकांचा हात असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एका केंद्रावरून गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच बाहेर आल्याचा प्रकार घडला. तिकडे गडचिरोलीतही शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणात सहकार्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेतल्याचे यात दिसत आहे. अशा अनेक सुरस कहाण्या, बातम्या आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमातून आणि वाहिन्यांवरून दाखवल्या जात असून त्यातून शिक्षणक्षेत्राची दिशा स्पष्ट होत आहे. वास्तविक, कॉपी प्रकरणात सारेच सहभागी असल्याचे चित्र आहे. कारण काही ठिकाणी पाल्याला अधिक मार्क मिळविण्यासाठी पालकांचा उत्साह अधिक असून तेच कॉपी पुरवत आहेत. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर इतर जिह्यांतून विद्यार्थी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. हमखास पास करून देणारी केंद्रे म्हणून काही केंद्रे ओळखली जाऊ लागली आहेत. परीक्षेतील वाढते कॉपीचे प्रकार लक्षात घेता हा सारा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खाऊ लागल्याचे चित्र आहे.

शालेय शिक्षण स्तरावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांना कमालीचे महत्त्व दिले जाते. दरवर्षी लाखो मुले या परीक्षेत प्रविष्ट होतात. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा असतो. बारावीनंतर विद्यार्थ्यांस व्यावसायिकदृष्टय़ा कोणत्या शाखेस प्रवेश घ्यायचा आहे त्यादृष्टीने या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावी म्हणजे ‘करेंगे या मरेंगे’ असाच जणू लढा असतो. त्यामुळे रात्रीचा दिवस करत पालक आणि विद्यार्थी या परीक्षांसाठी लढत असतात. पालक आपला पाल्य दहावी, बारावीला आहे म्हटल्यावर घरातील वातावरण पूर्णतः बदलवतात. घरातील दूरदर्शन संच बंद, घरात पाहुणे-रावळे यांचे येणे-जाणे नाही, अशा प्रकारचे अत्यंत गंभीर वातावरण निर्माण केले जाते. या परीक्षांमध्ये अधिकाधिक मार्क मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणी लावली जाते. गेल्या काही वर्षांत राज्यभरातील शिकवणी वर्गांची वाढती संख्या डोळे विस्फारणारी आहे. अनेक शिकवणी वर्गांनी शाळा, महाविद्यालयांशी करार केले आहेत. मुले शाळेत प्रवेश घेतात त्यांची नावे प्रत्यक्ष शाळेच्या पटावर असतात आणि शिकण्यासाठी शिकवणी वर्गात असतात हे उघड गुपित आहे. या शिकवणीच्या व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल होते आहे. त्यातील आर्थिक स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. शिकवणी वर्गाच्या स्पर्धेतून आणि संघर्षातून खून करण्यापर्यंत मजल गेलेली राज्याने अनुभवली आहे. राज्यातील काही गावे आणि शहरे फक्त शिकवणी वर्गासाठी प्रसिद्ध झाली आहेत. काही ठिकाणच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिकवणी वर्गांची जाहिरात राज्यभर होताना दिसत आहे. काही पालक आपल्याला पाल्याला आयआयटीसारख्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा म्हणून राज्याबाहेर शिकवणी वर्गांना प्रवेश घेत आहेत. त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी पालकांची असते. हा सारा व्यवहार कोटय़वधीच्या घरातील आहेत. यावरून ही परीक्षा किती महत्त्वाची बनली आहे हे सहजतेने लक्षात येईल. एका अर्थाने हे शिकण्यापेक्षाही मार्कांना अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे मार्कांसाठी वाटेल ते करण्याची मानसिकता वाढत चालली आहे. शिकणे, शिकवणे आणि मूल्यमापन हा शिक्षण प्रक्रियेचा त्रिकोण आहे. त्यांचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. ते एकमेकांपासून अलग करता येणार नाही. मूल्यमापन म्हणजे मूल कसे शिकते आणि किती शिकले आहे हे जाणून घेण्याची प्रक्रिया आहे, पण तो विचार हरवत जाऊन अलीकडच्या काळात संपूर्ण शिक्षण हे परीक्षाकेंद्रित झाल्यानेच गैरमार्गाने जाणे पसंत केले जात आहे. शिक्षणाच्या मूलभूत ध्येयापासून दूर जाणे घडत गेल्याने कॉपीसारखे प्रकार वाढत आहेत.

परीक्षा पेपरफुटीचे वाढते प्रकार शिक्षण प्रशासनातील ढिसाळपणा दर्शवणारे आहेत. कॉपी करण्यात विद्यार्थी, पालक, शाळा या तिघांचाही सहभाग असल्याने प्रशासन फिके पडताना दिसत आहे. विद्यार्थी स्वतः कॉपी करून अधिक मार्क मिळविण्याचा प्रयत्न करत आई-बाबांची इच्छा पूर्ण करत आहेत, तर आपल्या पाल्यास वाममार्गाने का होईना, पण अधिक मार्क मिळाले तर उद्याच्या अपेक्षित अभ्यासक्रमांचा मार्ग मोकळा होईल म्हणून पालकही त्याला या मार्गाने घेऊन जात आहेत. तिसरीकडे आपल्या शाळांची गुणवत्ता उंचावलेली दिसल्यास विद्यार्थ्यांचा, पालकांचा ओढा अधिक वाढेल. त्यातून आपल्याला ‘अर्थ’गणित सहजतेने जुळवता येईल म्हणून या प्रकारात शाळा आणि शिक्षकांचा सहभाग वाढताना दिसत आहे. आपली शाळा, महाविद्यालयांची पटसंख्या टिकली पाहिजे. अनुदानाची लढाई लढण्याच्या दृष्टीने निकालाला महत्त्व असल्याने येनकेनप्रकारे अधिक मार्कांचा आलेख उंचावण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे कॉपी, पेपर फुटण्याच्या प्रकारात सर्वांचाच सहभाग वाढत आहे. जोवर आपण प्रामाणिकपणाच्या पायावर उभे राहिलेले समाजमन घडवत नाही तोवर ही मार्कांची स्पर्धा कायम राहील. स्पर्धा आहे म्हटल्यावर गैरमार्गाचा वापर अनिवार्यच आहे, अशी विचारसरणी घातक आहे. शिक्षणातून मूल्यांच्या विचारांची पेरणी आवश्यक आहे. आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांना नैसर्गिकरीत्या शिकू देण्यासाठी मोकळी वाट दाखविण्याची गरज आहे. मार्क म्हणजे गुणवत्ता नाही. गैरमार्गाने मार्क मिळाले तर पुढील आयुष्य प्रकाशमान होणार नाही हा विचार पेरला जाण्याची गरज आहे. तसे घडले तरच गैरप्रकारांना आळा बसेल. यासाठी सारे प्रशासन कामाला लावावे लागेलच, पण ज्यांनी सत्याची वाट दाखवायची तेच असत्याच्या वाटेने चालू लागले तर भविष्याचे काय होणार?

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)