माझ्या फॅशनेबल नायिका – तिची साडी

3614

>> लीना टिपणीस,  [email protected]

साडी सर्वांगसुंदर हिंदुस्थानी पोशाख. आपल्या बहुतेक बॉलीवूड नायिका साडीला प्रथम पसंती देतात. या सदरातून मी तुमची ओळख करून देणार आहे माझ्या आवडत्या फॅशनेबल नायिकेशी!

फॅशन जगतात सेलिब्रिटींसोबत काम करताना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. प्रत्येक सेलिब्रिटीचं व्यक्तिमत्त्व, त्याची स्टाईल वेगळी असते. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांची भन्नाट फॅशन स्टाईल अनेक चाहते फॉलो करत असतात. त्यांच्या याच स्टाईलबाबत आपण जाणून घेणार आहोत.

 आज ट्रेंडमध्ये असलेले कपडे आपल्या उंचीला, आपल्या शरीरयष्टीला सूट होत आहेत की नाही याचं भान ठेकणं जास्त गरजेचं असतं. आजकाल ई कॉमर्सच्या माध्यमातून छान छान डिझाइन्स आल्या आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी चांगले ड्रेसअप करून येतात. त्यातूनही काही जणी ट्रेण्डस् आणि फॅशनला न जुमानता  स्वतःच्या शरीरयष्टीला जे सूट होतं ते घालतात. त्यांच्यापैकीच एक नाव घेईन रेखा. कांजीकरम साडी म्हटले की, रेखा. त्यामुळे रेखा आणि कांजीकरम साडी जणू एक समीकरणच बनले आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षीही ती तरुणींसाठी फॅशन आयकॉन आहे. सार्वजनिक कार्यक्रमात तिने नेसलेल्या साडय़ा या नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मला त्यांची पेहरावाची स्टाईल आवडते. तिने कायम स्वतःची स्टाईल निर्माण केली. तिची ती स्टाईल हिंदुस्थानातील महिलांमध्ये प्रसिद्ध झाली. आपले संस्कार, संस्कृती हे तिच्या पेहरावात कायम दिसते. . कांजीवरम साडी, गजरा, झुमके हा तिचा पेहराव  प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर लांग स्लीव्ह ब्लाऊज आणि हाय बॅक ब्लाऊज हे तिचे लूक टिपिकल कल्चरल आणि पारंपरिक आहेत. त्यामुळे रेखा एखाद्या कार्यक्रमात येणार असेल तर सगळ्या कॅमेऱयांची नजर तिच्यावर असते. दुसरे स्टाईल आयकॉन यंगर जनरेशनमध्ये पाहिले तर माझ्या मते दीपिका पदुकोण, खरंतर प्र्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की, दीपिकाने काय घातले आहे? तिच्या ड्रेसिंगकडे साऱयांचेच लक्ष लागून राहिलेले असते. रेड कार्पेट इव्हेंटना  हिंदुस्थानी स्टाईल रिप्रेझेंटर म्हणून दीपिका हमखास असते. त्यानंतर नाव घ्यायचे तर विद्या बालन. तिच्या अभिनयाचे जितके कौतुक होते, तितकेच तिच्या कपडय़ांचे. तिचे ड्रेस, फॅशनेबल साडय़ा कायम चर्चेत असतात. ती तिच्या शरीरयष्टीप्रमाणे स्वतःची फॅशन फॉलो करत असते. त्यानंतर बॉलीकूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी. तिच्याकडे बघताना कायम आदराने पाहिले जाते. कुठल्याही कार्यक्रमाला येताना ती कायम साडी नेसून येते हे वैशिष्टय़. ती साडीही अगदी डौलदारपणे कॅरी करते.

माझ्या मते सलवार कमीज, घागरा चोली हे पोशाख साडीची जागा घेऊ शकत नाहीत. हल्ली आपल्यावर वेस्टर्न कपडय़ांचा एवढा प्रभाव झाला आहे की प्र्रत्येकाला वाटते, गाऊन घातला की आपण परिपूर्ण दिसतो. म्हणजे रेड कार्पेट इव्हेंट आला की, आपण गाऊनच घालायला पाहिजे, पण असे अजिबात नाही. शिल्पा शेट्टीही अनेकदा साडीमध्ये दिसून येते. तिच्या स्टाईलच्या बाबतीत कोण तिचा हात पकडू शकत नाही. ती साडीतही तेवढीच स्टायलिस्ट आणि प्रतिष्ठत वाटते. आलिया भट कायम डिझायनर जे काही देतात ते घालते. कारण तिची शरीरयष्टी चांगली आहे. तिला कोणतेही कपडे चांगले दिसतात, पण ते स्टाईल आयकॉनच्या बाबतीत कितपत लक्षात राहतील हे वेळच सांगू शकते. स्टाईल आयकॉन कोण बनू शकतं तर जे स्वतः चांगल्या प्रकारे फॅशन कॅरी करून स्वतः चे वेगळेपण जपू शकतात. पूर्वीच्या अभिनेत्रींमध्ये शर्मिला टागोर, वहिदा रेहमान, मधुबाला… तिघांनाही एक स्ट्रॉग सिग्नेचर स्टाईल आहे. सगळ्यांना सांगू इच्छिते की, फॅशन आणि ट्रेण्ड डोळेबंद करून फॉलो करू नका. तुम्हाला सांस्कृतिकदृष्टय़ा, सामाजिकदृष्टय़ा आणि तुमचा कामाचा प्रकार लक्षात घेऊन कपडय़ांची निवड करा.

आपली प्रतिक्रिया द्या