प्रेरणा – विराट विश्वाशी नाते…!

444

>> दिलीप जोशी

आपल्या अवतीभवती पृथ्वीवर आणि मान वर करून पाहिलं की अंतराळात जे काही दिसतं, ते संपूर्ण दृश्य विश्व आपल्या एकूण विश्वाच्या केवळ 0.4 टक्के इतकेच आहे. त्यातच आपली ग्रहमाला, अब्जावधी तारे, दीर्घिका, तेजामेघ, कृष्णविवरं असा सगळा ‘विराट’ वाटणारा विश्वाचा हा पसारा अगदी ‘एवढासा’ आहे. 23 टक्के डार्क मॅटर आणि 73 टक्के डार्क एनर्जी यांनी तर विश्व भरलंय.

खगोल मंडळाच्या गेल्या पस्तीस वर्षांच्या काळात खगोलीय गोष्टींविषयी जनजागृती करण्याचं काम सुरू आहे. त्याचा आरंभ झाला तो 1986 मध्ये आलेल्या ‘हॅले’ धूमकेतूपासून. त्यावेळी मुंबईतल्या ‘लोक विज्ञान संस्थे’ने खगोल अभ्यासवर्ग आयोजित केला होता. ही गोष्ट फेब्रुवारी 1985 मधली. वर्षभर आधी धूमकेतूची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू त्यामागे होता. त्या अभ्यासवर्गाच्या आयोजनात भाग घेताना पुढे पस्तीस वर्षे आपण हे काम करू अशी कल्पना नव्हती. मात्र, त्यावेळी अनेकांनी स्वतंत्र संस्था स्थापन करायला अनुकूलता दर्शवली. त्यांचा संघटनात्मक कामात मात्र रस असल्याने खगोल मंडळाच्या स्थापना सभेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

तेव्हापासूनच ही नोंदणीकृत संस्था कार्यकर्त्यांची संस्था म्हणून ओळखली जाईल आणि व्यक्तीकेंद्रित राहणार नाही याची काळजी घेतली. प्रत्येक टप्प्यावर आलेल्या नव्या, उत्साही कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यात सामावून घेत संस्था पुढे जात राहिली.

6 जुलै 1985 रोजी ‘खगोल मंडळा’ची स्थापना झाल्याबरोबर लगेच नोंदणी प्रक्रिया, साप्ताहिक भेटीची जागा याचा विचार सुरू झाला. जागेचा प्रश्न मुंबईतील शीव येथील साधना विद्यालयाने सोडवला. तेव्हापासून आजतागायत आम्ही दर बुधवारी तिथे भेटतो. शाळेशी मंडळाचा अतूट ऋणानुबंध जुळला आहे.

स्थापनेनंतर वर्षभरातच आम्ही ‘खगोल प्रकाशना’तर्फे ‘खगोल परिचय’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. आज मंडळाची लोकप्रिय ‘तारांगण’सह अनेक मराठी, इंग्रजी पुस्तके खगोलप्रेमी वाचत असतात. त्याचबरोबर खगोलीय पुस्तकांचं वाचनालय ग्रंथालयही सुरू केलं. 1986च्या मार्चमध्ये वांगणी येथे ‘हॅले’ धूमकेतू पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सुमारे 670 लोक जमले होते. स्वातंत्र्यसैनिक दुर्गाताई पाटोळे यांची ती जागा होती. तिथे पुढे पंचवीस वर्षे राज्यभराच्या आकाशदर्शनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर चव्हाण यांच्या फार्महाऊसवर ते होऊ लागले. आता नेरळला ‘सगुणाबाग’ येथे होतात.

…तर ‘हॅले’ धूमकेतूच्या निमित्ताने आम्ही ‘खगोल वार्ता’ हे मासिक सुरू करण्याचं ठरवलं. पहिला अंक चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाइल) होता. योगायोगाने त्यावेळी तिथे आलेले प्रसिद्ध लेखक अरुण साधू यांच्याहस्ते ‘खगोल वार्ता’चं प्रकाशन झालं. पुढील काळात मंडळाने सूर्यग्रहणाच्या वेळी ‘टोटॅलिटी’ आणि नंतर ‘वैश्विक’ ही इंग्रजी नियतकालिकं प्रसिद्ध केली. टोटॅलिटी वर्षभरापुरतंच होतं. आता नाशिक विभागाच्या सुजाता बाबर ‘खगोल विश्व’ उत्तम प्रकारे प्रसिद्ध करतात.

याचबरोबर मंडळाचे डोंबिवली, पनवेल, ठाणे, बदलापूर आणि नाशिक विभागही लवकरच कार्यरत झाले. लोकांमध्ये खगोलीय घटना आणि आकाशदर्शन यांची आवड वाढीला लागल्याचं ते द्योतक होतं. 1987 मध्ये शालेय अभ्यासक्रमातील खगोल शास्त्र्ा लक्षात घेऊन सुमारे 100 शिक्षकांचं शिबीर घेण्यात आलं आणि आंतरशालेय खगोल विज्ञान स्पर्धाही सुरू झाली. 1993 मध्ये खगोलबिंदू भास्कराचाऱयांच्या 800व्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही एक छोटा माहितीपट बनवला. त्याच वर्षी लोणार विवर सरोवराचा माहितीपट तयार केला. ठिकठिकाणच्या राज्यस्तरीय खगोल संमेलनात आमचे कार्यकर्ते सहभागी होऊ लागले. अभ्यासपूर्ण व्याख्यानं देऊ लागले.

1995च्या ऑक्टोबरमध्ये ‘खग्रास’ सूर्यग्रहणाची 300 जणांची अभ्यास सहल आम्ही उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे नेली. त्यानंतर 1999 ला भूज, 2009ला नंदुरबार (दोंडाईचा) 2010 मध्ये कन्याकुमारी आणि 2019 मध्ये उटी येथे सूर्यग्रहण अभ्यास सहली आयोजित केल्या. शेकडो लोकांची सर्व व्यवस्था करताना आमच्या कार्यकर्त्यांना आपोआपच सामूहिक जीवनाचं प्रशिक्षण मिळालं. ‘कोरोना’ काळात आम्ही ‘वेब’ व्याख्यानं दिली!

2002 मध्ये लोणार येथे दोन दिवसांची ‘अशनी आघात विवर परिषद’ भरवण्यात आली. 2005 मध्ये प्रसिद्ध खगोल अभ्यासक, लेखक प्रा. मोहन आपटे यांना भास्कराचार्यांच्या नावाचा ‘भास्कर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

रात्रीच्या आकाशदर्शन कार्यक्रमातील विलोभनीय घटना म्हणजे उल्का वर्षाव. 1998 च्या नोव्हेंबरात तो उत्तम (म्हणजे ताशी 300 उल्का) असा दिसणार होता. आम्ही वांगणीला जय्यत तयारी केली. अपेक्षेपलीकडे गर्दी वाढली. सुमारे 10 हजार लोक आले. …आणि धो धो पावसाने सगळय़ा कार्यक्रमावर अक्षरशः पाणी पडलं. त्यावेळी आम्ही मोजक्या कार्यकर्त्यांनी एवढय़ा जनसमुदायाशी रात्रभर यशस्वी संवाद साधला. ते पाहून वांगणी ग्रामपंचायतीने आमच्या आकाशदर्शन क्षेत्राकडे जाणाऱया मार्गाला ‘तारांगण मार्ग’ असं नाव दिलं. एखाद्या खगोलप्रेमींच्या संस्थेला मिळालेला हा बहुमान विशेष म्हणायला हवा.

खगोल अभ्यासाचे प्राथमिक आणि प्रगत वर्ग यातून आमचे कार्यकर्ते तयार होऊ लागले. त्यातल्या कित्येकांनी खगोलशास्त्र्ाात डॉक्टरेट (पीएचडी) प्राप्त केली ती मंडळी आज प्रसिद्ध खगोल संस्थांमध्ये व्यावसायिकदृष्टय़ा कार्यरत आहेत. ‘आकाश बघून काय मिळणार?’ या सुरुवातीला वाटणाऱया कोडय़ाचं हे कदाचित चांगलं उत्तर आहे.

खगोल मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे ज्येष्ठ खगोलशास्त्र्ाज्ञ प्रा. जयंत नारळीकर, प्रा. शशीकुमार चित्रे यांच्याशी मुक्त संवाद करण्याची संधी मिळाली. रॉजर पेनरोल, ज्यो लॉड पेकर अशा व इतर विदेशी खगोल अभ्यासकांना भेटता आलं. मुंबईत स्टीफन हॉकिंग यांना ऐकता आलं. जगातील अनेक देशातली इथे येणारी मंडळी आमच्या आकाशदर्शनाला आली. मंडळाने स्वतःची एक एकर जागाही बदलापूरजवळ उंबरोली येथे घेतली. हे सर्व कार्यकर्त्यांचं सामूहिक यश आहे. त्याचबरोबर अनेक देणगीदारांनी उदार हस्ते दिलेल्या देणग्यांमधून काही प्रकल्प हाती घेता आले.

आपली प्रतिक्रिया द्या