नवे ‘राजकीय सौहार्द्र’ किती काळ टिकणार?

22

>> नीलेश कुलकर्णी
[email protected]

कर्नाटकाची लढाई जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने परस्परांवर समशेरी उपसल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विमान हुबळीमध्ये भरकटल्यामुळे ‘घातपाताचा संशय’ काँग्रेसने व्यक्त केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल यांना फोन करून ‘राहुलजी आप ठीक तो है ना?’ अशी ख्यालीखुशाली विचारली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या. मोदींचा स्वभाव ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तर हा ‘४४० व्होल्टेज’चा धक्काच होता. त्यामागील कारणे काहीही असोत हे ‘राजकीय सौहार्द’ किती काळ टिकणार हाच खरा प्रश्न आहे.

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर व्यक्तिद्वेषाचे द्वेषमूलक राजकारण वाढीस लागल्याचा आरोप विरोधक नेहमीच करत असतात. त्यामुळेच संसदेतील काही कार्यक्रमात एकत्र आल्यानंतरही ना मोदींनी राहुल गांधींना नमस्कार-चमत्कार केला ना राहुल गांधींनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे गेल्या चार वर्षांत देशाच्या राजकारणात कटुताच वाढली. अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही. राहुल यांनी लोकसभेत अनेकदा पंतप्रधानांचा उल्लेख ‘तुम्हारे प्रधानमंत्रीजी’ असा केला हेही विसरून चालणार नाही. मात्र सर्वांना त्रस्त करणारी ‘शनि मंगळ’ युती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी ६५ वर्षांचे हाडवैर विसरत एकमेकांची गळाभेट घेतली. ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चा नारा देणाऱ्या भाजपने मिझोराममधील सत्तेसाठी चक्क काँग्रेसलाच गळामिठी मारली. थोडक्यात राजकारणात वैचारिक शत्रुत्व जरूर असावे, मात्र त्याला वैराचे स्वरूप प्राप्त होऊ नये असे आशादायक चित्र दिसत आहे. हिंदुस्थानच्या राजकारणाचा इतिहास तर जिंदादिल असाच आहे. आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या काळातील काही अपवाद वगळला तर देशाने राजकीय कटुता अभावानेच अनुभवली. पंडित नेहरू सर्वच राजकीय विरोधकांचा आदर बाळगत. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकणारे लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ‘जनता राजवटीच्या काळात तुम्हाला काही होणार नाही’ असा धीर इंदिराजींना भेटून दिला होता. इंदिरा गांधी व अटलजी तसेच अटलजी आणि पी. व्ही. नरसिंह राव अशी राजकीय मैत्रीची मोठी परंपरा आहे. सोनिया गांधींचे भाजपच्या प्रमोद महाजनांशी उत्तम संबंध होते. मोदी यांनी राहुल यांना याच परंपरेनुसार खुशाली विचारली असेल असे समजायला हरकत नाही. अर्थात काँग्रेसने सत्तेत असताना व्यक्तिद्वेषातून राजकारण केल्याचा तसेच ‘मौत के सौदागर’ असा केलेल्या उल्लेखाचा राग मनात बाळगून मोदींनी काँग्रेसला तशीच वागणूक दिली हादेखील इतिहास आहे. किंबहुना विद्यमान पंतप्रधान व काँग्रेसमधील कटुता इतकी टोकाला गेली आहे की संसदेत एकमेकांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देण्याची औपचारिकता पाळली गेली नाही. नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत असल्याचे पाहून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘नजरानजर’ टाळण्यासाठी दुसरा रस्ता पकडला. हुबळीतील घटनेच्या निमित्ताने आता दोन्ही पक्षांतील कटुता कमी झाली असे मानायचे का, हा खरा प्रश्न आहे. देशातील पारा टोकाला पोहचलेला असताना भाजप आणि काँग्रेसमधील बर्फ खराच वितळला आहे काय?

घर घर (टाइल्स) मोदी!

राज्यकर्ता स्वतःच्याच ‘प्रतिमे’च्या प्रेमात पडला की काय होते याचे प्रत्यंतर म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर यापुढे पंतप्रधानांसह आपली छबी झळकविण्याचा निर्धार शिवराजमामांनी घेतला आहे. एकीकडे पंतप्रधान दस्तरखुद्द ‘फोटो सॅव्ही’ असताना असा निर्णय म्हणजे मोदींच्या प्रसिद्धीला ‘चार चाँद’ लागण्यासारखे आहे. देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी पंतप्रधानांची छवी वेगवेगळय़ा जॅकेटांमधून झळकताना दिसते. पेट्रोलपंपावरही पंतप्रधानांचे दर्शन होतेच. मध्यंतरी कॅन्सरग्रस्त पेशंटच्या मदतीच्या पत्रावरही माझा फोटो लावा असे निर्देश मोदींनी दिले होते. फोटोंच्या मदतीने असे हे ‘इमेज ब्रँडिंग’ सुरू असताना शिवराजमामांनी आता घराच्या टाइल्सवरही मोदींसह स्वतःच्या फोटोची तजवीज केली आहे. पूर्वी घर बांधले की लोक देवदेवतांचे फोटो टाइल्सवर लावत. आता मोदी-शिवराज यांचे फोटो लावणे मध्य प्रदेशात तरी बंधनकारक ठरणार आहे. ‘हर हर मोदी घर घर मोदी’ असा भाजपचा नारा आहे खरा, मात्र गेल्या चार वर्षांतील कारभारामुळे मोदी सरकारला घरघर लागलेली असताना हे नवे घरघर शोधण्यात शिवराजसिंग यांनी शक्कल लढविली आहे. वास्तविक, १५ वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिवराजसिंग चौहान यांना ‘ऍण्टी इन्कबन्सी’चा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असे असताना शिवराजमामांचे हे घरघर मोदी भाजपला घरघर तर लावणार नाही ना, असाही प्रश्न विचारला जात आहे.

कॉम्रेड सीताराम…

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी कॉम्रेड सीताराम येचुरी यांची झालेली निवड साम्यवादी चळवळीसाठी दिलासादायक बाब मानावी लागेल. गोपालन भवनामध्ये साम्यवादाची जाडजूड पुस्तके वाचायची आणि इमारतीखाली उतरून सिगार पेटवून साम्यवाद पटवून द्यायचा असे पोथिनिष्ठ राजकारण डाव्यांनी आजवर केले. त्यामुळे हिंदुस्थानी जनतेशी त्यांची जवळीक कधी झालीच नाही आणि पश्चिम बंगालनंतर उरलेसुरले साम्यवादाचे बुरुजही ढासळत चालले आहेत. त्रिपुरासारख्या राज्यातूनसुद्धा साम्यवाद हद्दपार झाल्यामुळे डावे शिल्लक तरी राहतील का, अशी परिस्थिती आहे. हेकेखोर व आढय़ताखोर राजकारणामुळे डाव्यांवर ही वेळ आली. डाव्यांच्या राजकीय सत्तेची गरज ओळखून हरकिशनसिंग सुरजित या प्रॅक्टिकल कॉम्रेडने त्याकाळी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारला पाठिंबा दिला, मात्र प्रकाश कारतांसारख्या पोथिनिष्ठ कॉम्रेडने तो पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर डाव्यांना घरघर लागली ती कायमचीच. सुरजित यांच्यानंतरचे प्रॅक्टिकल कॉम्रेड अशी भाई सीताराम यांची ओळख आहे. सोनिया गांधींशी त्यांचे घनिष्ठ संबध आहेत. सीताराम यांना सरचिटणीसपदी पुन्हा संधी देऊन डाव्यांनी ऐतिहासिक चुकांपासून बोध घेऊन त्यांचा ‘ज्योती बसू’ केला नाही हे विशेष. एच. डी. देवगौडांऐवजी त्यावेळी डाव्यांनी ज्योती बसूंना पंतप्रधानपदी संधी दिली असती तर कदाचित आज देशाचे राजकारण वेगळय़ा प्रकारचे असते. ज्योतीदांवर रुष्ट झालेले कॉम्रेडस् सीतारामभाईंवर ‘मेहरबान’ झाले हेही नसे थोडके!

आपली प्रतिक्रिया द्या