अटलांटातील मराठी महिला कोविड योद्धा, रुग्णालयांना पुरवते मास्क

>> श्वेता पवार- सोनावणे

अमेरिकेत सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पंधरा लाखाहून अधिक रुग्ण सध्या अमेरिकेत आहेत तर नव्वद हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची आरोग्य व्यवस्था देखील कोलमडून पडली आहे. हिंदुस्थानने देखील हायड्रोक्लोक्सीक्वीन हे औषध अमेरिकेला देऊन या कठिण परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला. हिंदुस्थानी हे कायम मदतीसाठी तत्पर असतात असे बोलले जाते. सरकारने हे त्यांच्या कृतीतून दाखवले असले तरी अमेरिकेत राहणारे अनेक हिंदुस्थानी देखील त्यांच्या त्यांच्या परिने तेथील आरोग्यकर्मींची, पोलिसांची मदत करत आहेत. यातीलच एक आहेत लीना साठे जोशी. 

अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या मराठमोळ्या लीना साठे जोशी यांनी देखील मदतीत खारीचा वाटा उचलला आहे. लीना या पैशांची मदत, दान धर्म करुन गप्प बसू शकल्या असत्या. मात्र सभोवतालच्या परिस्थितीने त्यांना गप्प बसू दिले नाही. त्यांनी रुग्णालयांसाठी मास्क शिवण्याचे काम सुरू केले. सध्या अटलांटामधील काही रुग्णालयांना मास्क पोहोचविण्याचं काम त्या करतात. त्या राहत असलेल्या परिसरातील अनेक रुग्णालये आता त्यांच्या संपर्कात असून त्यांना लीना या मास्क तयार करून देतात. दिवसाला 10 ते 15 मास्क त्या तयार करतात. एखाद्या कंपनीएवढं प्रोडक्शन होत नसलं तरी त्यांच्या मास्कमुळे रुग्णालयातील डॉक्टरांचा मोठा प्रश्न सुटत आहे. अमेरिकेत एन-95 मास्कचा मोठा तुटवडा असल्याने डॉक्टरांना चांगल्यातले मास्क मिळत नव्हते. त्याचवेळी लीना यांनी मास्कचा पुरवठा सुरू केला. लीना यांचे मास्क डॉक्टर त्यांच्या एन-95 मास्कच्या वर वापरतात. त्यामुळे त्यांचा एन-95 मास्क खराब होत नाही. त्यामुळे डॉक्टर व नर्स त्यांचा एन95 मास्क आणखी काही दिवस वापरू शकतात. मास्कचा तुटवडा असताना अटलांटामधील डॉक्टरांसाठी लीना साठे यांचे मास्क वरदान ठरत आहेत.

leena-joshi-mask

त्यांच्या या कार्याविषयी लीना सांगतात ”मार्च महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेत मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडू लागला. परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि डॉक्टरांकडे रुग्णांना हाताळण्यासाठी मास्क नव्हते. त्यावेळी मी मास्क तयार करण्याचे ठरवले. घरात शिलाई मशीन तर होतीच पण अडचण होती ती कापड व इलास्टिक शोधून आणायची. लॉकडाऊनमुळे बाजार बंद. तरिही मी शोधाशोध करून कापड आणले. मात्र इलास्टिक फार मिळालं नाही. त्यावेळी मला माझ्या एका मैत्रिणींना केसांचे रबर वापर म्हणून सांगितले. त्या मैत्रिणीने मला 160 रबर उपलब्ध देखील करून दिले. तिच्यामुळे माझी मोठी अडचण सुटली. त्यानंतर माझे 40-50 मास्क शिवून झाले की मी फेसबुकवर त्याविषयी पोस्ट करायचे. ती पोस्ट पाहून रुग्णालयांमधून मला संपर्क केला जायचा. ते मास्क न्यायला येणार त्या दिवशी मी ते मास्क लेटर बॉक्समध्ये ठेवायचे. बाहेरच्या बाहेर ते मास्क घेऊन जाऊ लागले. आपण समाजासाठी काहीच करत नाही ही खंत मला कायम असायची मात्र मास्क द्यायला लागल्यानंतर मला समाधान मिळू लागलं. एका डॉक्टरने मी तयार केलेला मास्क घातलेला फोटो जेव्हा मी पाहिला तेव्हा प्रचंड आनंद झाला. प्रत्येक नागरिक हा समाजाचे देणे असतो. हीच ती वेळ असते, जेव्हा ते देशासाठी थोडा वेळ देऊन समाजऋण फेडू शकतात. मी कोणतेही महान कार्य करत आहे असे मला वाटत नाही. मी फक्त समाजाचे देणे देत आहे. मी काहीतरी करतेय याचं मला आंतरिक  समाधान सध्या मिळतंय. या सर्वात मला माझे पती व मुलांची यांची खूप मोलाची साथ लाभली.’

leena-joshi-letter

लीना यांनी मास्क शिवण्यासोबतच समाजातील गरजूंना मदत करता यावी यासाठी सेवा फाऊंडेशन, डॉक्टर पारनेरकर फाऊंडेशन व फूड फॉर लाईफ या तीन संस्थांसोबत काम करायला सुरुवात केली. या तीन संस्था मिळून समाजातील गरजूंना दर शनिवारी जेवण पुरवतात. यात सेवा फाऊंडेशन व डॉक्टर पारनेरकर फाऊंडेशनमधील बहुतांश मंडळी ही मराठी असल्याने अनेकदा महाराष्ट्रीय स्वयंपाकच केला जातो. लीना साठे या संस्थांसाठीही काम करतात. या विषयी लीना सांगतात, ‘मी जेव्हा मास्क तयार करायचे काम सुरू केले. त्यावेळी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिने तिच्या मुलाला व त्याच्या काही मित्रांना काही मास्क हवे असल्याचे सांगितले. त्यावेळी आधी मी नकार दिला. मात्र त्यावेळी तीला कारण विचारले असता तिने मला या अन्नतज्ञाविषयी सांगितले. सेवा फाऊंडेशन, डॉक्टर पारनेरकर फाऊंडेशन व फूड फॉर लाईफ या संस्थांनी तयार केलेले जेवण गरिब व गरजूंमध्ये वाटण्याचं काम तिचा मुलगा व त्याचे मित्र करायचे. ते ऐकल्यानंतर मी लगेचच तिला मास्क तयार करून दिले. त्यानंतर मी देखील त्यांच्यासोबत या कामात सहभागी झाले. तेव्हापासून डॉ. पारनेरकर फाऊंडेशनच्या गीता मंत्रीसाठी मी, वंदना, मिनल, दिपा, दिपश्री, धनू, स्वप्ना, स्वप्ना दानी, वंदना वैद्य, शिल्पा, श्रद्धा, मुक्ता,संयोगिता,शर्वरी, सुषमा व नम्रता या आम्ही नऊ जणी दर शनिवारी कुकींगचे काम करतो. त्यानंतर ते तयार पदार्थ फुड फॉर लाईफ द्वारे गरजूंमध्ये वाटले जाते. सुरुवातीला नवख्या असलेल्या माझ्यावर आता या ग्रुपने आणखी एक जबाबदारी सोपविली आहे. दर गुरुवारी शनिवारच्या जेवणाचे शेकडो किलो अन्नधान्य माझ्याकडे येते. ते अन्नधान्य मी नऊ जणींच्या बॉक्समध्ये वेगवेगळं बांधून ठेवते. भाजी, डाळीला लागणारं सर्व सामान वेगळं दिलं जातं. मग त्या नऊ जणी माझ्या घराच्या गॅरेजमधून त्यांचं सामान घेऊन जातात.”

मूळच्या मुंबईच्या असलेल्या लीना या 2001 मध्ये लग्नानंतर अमेरिकेतील अटलांटा येथे स्थायिक झाल्या. त्यांचे पती राजेश जोशी हे कॉम्प्युटर्स फिल्डमध्ये आहेत तर लीना यांचा ‘थीम वर्क्स’ (Theme works) हा आर्टचा स्टुडिओ असून तेथे त्या दर शनिवार रविवार कलेचे क्लासेस घेतात. तसेच कलेची आवड असलेल्या या जोशी दाम्पत्याची कलासंवाद ही एक नॉनप्रॉफिट नाट्य संस्था आहे. ‘आम्ही अमेरिकेत राहत असलो तरी मातृभूमीचे ऋण आम्ही विसरलो नाही. म्हणूनच आम्ही ‘कला संवाद ‘ ही नॉनप्रॉफिट संस्था काढली आहे. त्यातूनच आम्ही नाटक, गाण्याचे कार्यक्रम करून, महाराष्ट्र फाउंडेशन व आन फाउंडेशनसाठी देणगी स्वरुपात रक्कम उभी करतो’ असे लीना सांगतात.

leena-joshi-sathye

आपली प्रतिक्रिया द्या