मुद्रितशोधक – शब्दांचा जादूगार!

>> एन. आत्माराम

इंग्रजी भाषेतील चुका दुरुस्त करण्यासाठी ‘स्पेलचेकर’ असले, तरी मराठी भाषेसाठी ते निरुपयोगी ठरले आहे. कारण मराठी भाषेतील शब्दांचे विविध अर्थ निघतात. तुम्हाला अभिप्रेत असलेला नेमका शब्द स्पेलचेकरला सापडत नाही. त्यामुळे मराठी भाषा शुद्धीकरणाचे आणि संवर्धनाचे काम केवळ निष्णात मुद्रितशोधकच करू शकतो.

आज महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह वाढू लागला आहे. सर्वच क्षेत्रांत मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांपुरताच मर्यादित असलेला हा विषय आता सार्वकालिक आणि सर्वपक्षीय अजेंडा बनला आहे.

केवळ बोलून किंवा लिहून मराठी भाषेचे महत्त्व कळणार नाही, तर त्यासाठी तिचा वापर अचूक व्हावयास हवा. ती शुद्ध आणि व्याकरणदृष्टय़ा योग्य असावयास हवी. पिढय़ान्पिढय़ा प्रचलित असणारे अशुद्ध शब्द आजही खुलेआम व्यवहारात वावरताना दिसतात. त्यात आमूलाग्र बदल करावे लागतील. भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील अशी गोष्ट आहे. प्र. न. जोशींच्या मते – “मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा.’’ मराठी भाषा बोलण्यास सोपी वाटत असली तरी बऱयाचदा कागदावर उतरताना बिघडते. महाराष्ट्रात अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, त्रैमासिके तसेच शेकडो दीपावली विशेषांक नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात. यात संपादक, सहसंपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर असतात. उपसंपादकाच्याच बरोबरीचा आणखी एक घटक यात असतो- मुद्रितशोधक. नवनीत, चेतना यांसारख्या नामवंत पुस्तक प्रकाशनांमध्ये मुद्रितशोधक कार्यरत असतात. गेली जवळजवळ पाच दशके मुद्रितशोधन हा स्वतंत्र विभाग अस्तित्वात आहे. हे काम अचूक होण्यासाठी डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते.

पूर्वी संपादक, वार्ताहराने लिहिलेला मजपूर कंपोझिंगला पाठवला जात असे. मग पंपोझ झालेल्या मजपुराचे प्रूफ काढून वाचण्यासाठी मुद्रितशोधकाच्या टेबलावर जाई. मूळ काॅपीवरून प्रूफ तपासल्यानंतर ते पुन्हा करेक्शनसाठी कंपोझिंग खात्यात जात असे. यानंतर आले लायनो मशीन. मात्र टाईप झालेल्या मजपुराच्या करेक्शनची पद्धत तशीच राहिली. शुद्धलेखनामध्ये ऱहस्व-दीर्घाच्या अनेक चुका घडत असल्याने शुद्धलेखन म्हणजे ऱहस्व-दीर्घ असा गैरसमज होणे स्वाभाविक आहे, परंतु शुद्धलेखन म्हणजे केवळ ऱहस्व-दीर्घ नव्हे. अनुस्वार, सामान्य रूप, अनेकवचन, जोडाक्षर, विसर्ग, रफार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे, वाक्यरचना अशा अनेक बाबींचा अंतर्भाव शुद्धलेखनात असतो. शुद्धलेखनाला महत्त्व न देता प्रत्येकाने स्वतःच्या मर्जीप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे लेखन केले तर अनेक शब्दांचे अर्थ बदलतील, अनेक निरर्थक शब्द समोर येतील. वाक्यातील अनेक घटकांचा एकमेकांशी योग्य तो समन्वय साधला न गेल्याने विरुद्धार्थी, द्वय़र्थी किंवा निरर्थक वाक्ये तयार होतील. कपडय़ांतील नीटनेटकेपणा ज्याप्रमाणे कपडय़ांचे सौंदर्य वाढवत असतो, तद्वत भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवत असते.

मराठी भाषेचा वृथा अभिमान बाळगून मराठी भाषेचा अर्थबोध होणार नाही. त्यासाठी शुद्धलेखनाचा अभ्यास करावयास हवा. त्याचे नियम वाचले पाहिजेत. मराठी साहित्य मंडळाने 1961 साली 14 आणि 1972 साली 4 असे शुद्धलेखनविषयक एकूण 18 नियम केले आहेत. महाराष्ट्र शासनाने या नियमांना मान्यता देऊन शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत या नियमांनुसार लेखन व्हावे असे जाहीर केले आहे. याचा आपण सर्वांनी गांभीर्याने अभ्यास केला तर काही अंशी तरी मराठी भाषेतील चुका कमी होतील.

इंग्रजी भाषेतील चुका दुरुस्त करण्यासाठी ‘स्पेलचेकर’ असले तरी मराठी भाषेसाठी ते निरुपयोगी ठरले आहे. कारण मराठी भाषेतील शब्दाचे विविध अर्थ निघतात. तुम्हाला अभिप्रेत असलेला नेमका शब्द स्पेलचेकरला सापडत नाही. त्यामुळे मराठी भाषा शुद्धीकरणाचे आणि संवर्धनाचे काम केवळ निष्णात मुद्रितशोधकच करू शकतो.

आज बाजारात प्र.न.जोशी, अरुण फडके, मो.रा.वाळिंबे, प्रा. यास्मिन रोख आदींची शुद्धलेखनाची पुस्तके उपलब्ध आहेत. मराठी भाषेचा डांगोरा पिटणाऱया मराठी जनांनी मराठी भाषेला अधिक सुदृढ आणि समृद्ध करण्यासाठी या पुस्तकांची पाने चाळली पाहिजेत. पिढय़ान्पिढय़ा डोक्यात फिट्ट बसलेल्या मराठी भाषेतील उणिवा दूर करण्यासाठी नवे नियम आत्मसात करावयास हवेत. केवळ मुद्रितशोधकाच्या नावाने बोटे मोडण्यात काय अर्थ? दिवसेंदिवस मुद्रितशोधकांची संख्या घटत चालली आहे. तरुण पिढीला यात काही स्वारस्य नाही. पदवीधर झालेली मुले पत्रकारितेचा अभ्यास करून वार्ताहर, प्रतिनिधी, उपसंपादक म्हणून स्थिरावतात. मुद्रितशोधनाकडे कुणीच वळत नाही. यात त्यांना स्वारस्य नाही. त्यांना कमीपणाचे वाटते. काही संपादकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अनेक मुद्रितशोधक उपसंपादक, वार्ताहर, सिने पत्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत, तर कित्येक मुद्रितशोधक विद्वत्ता असूनही खितपत पडले आहेत. पालेकर आयोगामुळे मुद्रितशोधकाला श्रमिक पत्रकार म्हणून दर्जा मिळाला. काही मुद्रितशोधकांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. पण त्यांच्या माथी बसलेला मुद्रितशोधकाचा ठसा आयुष्यभर त्यांना काही पुसता येत नाही. सरकारने त्यांच्या या प्रगल्भतेचा उपयोग करून घेतल्यास मराठीतील शुद्धलेखनाचे दोष काही अंशी तरी कमी करता येतील. 35-40 वर्षे नोकरी करून शिफ्ट इनचार्ज आणि विभागप्रमुख एवढीच त्याची आयुष्यभराची पदोन्नती. आज महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांत मुद्रितशोधक हा विभाग कालबाह्य झाला आहे. मुंबईत आज केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे अक्षरमित्र (मुद्रितशोधक ) आहेत. त्यांच्या अनुभवाचा नव्या पिढीला उपयोग व्हावा यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावयास हवा; अन्यथा ‘चुकांची दुरुस्ती’ हा नवा काॅलम उदयास येईल.

आपली प्रतिक्रिया द्या