संतांचे मराठी भाषाप्रेम

884

>> नामदेव सदावर्ते

महाराष्ट्रातील सर्व संतांनी मातृभाषा मराठीवर खूप प्रेम केले. बहुजन समाजातील अज्ञ जनतेशी मराठी भाषेतूनच संत संवाद करीत. समाजाला समजेल अशा बोली, ग्रामीण मराठी भाषेतून साधलेल्या संवादातून जनमानसाला आनंद वाटत असे. संत ज्ञानदेवांना तर मराठीविषयी अभिमान वाटतो. सर्व संतांच्या अभंगरचना, ग्रंथरचना मराठी भाषेचे वैभव आहे. मानवता धर्माच्या शिकवणीबरोबर समाजाला अध्यात्म, परमार्थ समजून सांगण्यासाठी संतांनी मराठीतून  अभंग रचले. अमृतालाही पैजेवर जिंकण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत आहे हे संत ज्ञानदेवांनी सिद्ध केले.

संत नामदेवांनी चरित्र, आत्मचरित्र, तीर्थावळी, संतांच्या समाधी प्रसंगाचे वृत्तचित्रण, संतकथा, पुराणकथा आदी विविधांगी रचना मराठीत करून या भाषेचे सामर्थ्य प्रकट केले. संत ज्ञानदेवांनी ‘भावार्थदीपिका’ हा गीतेवरील भाष्यग्रंथ लिहून संस्कृतइतकीच मराठीही श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. ‘अमृतानुभव’ हा अध्यात्म, तत्त्वज्ञानावरील स्वतंत्र गूढग्रंथ लिहून आपला अमृतानुभव सहजपणे भोळ्या भाविकांना समजावून सांगितला. ज्ञानदेवादि संतांनी हरिपाठांतून परमार्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला. चांगदेवांना पासष्ट ओव्यांचे पत्र मराठीत लिहून सर्वांना ज्ञान दिले. संतांनी अनेक रचनांमधून आपल्या भाषेची थोरवी सांगितली.

संत एकनाथांनी मराठीत विविधअंगी रचना करून संस्कृतच्या जाणकारांनाही आश्चर्यचकित केले. व्यासकृत भागवत ग्रंथातील एकादश स्कंधावर एकनाथांनी ओवीबद्ध 31 अध्यायांचा ग्रंथ लिहिला. अध्यात्मरामायण, रुक्मिणी स्वयंवर, लोकरंजक भारुडे, अभंग अशी प्रचंड ग्रंथसंपदा लिहून नाथांनी मराठी भाषा समृद्ध केली.

ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरीत मराठीसंदर्भात केलेले उल्लेख महाराष्ट्राला, मराठी भाषिकांना आनंद देणारे आहेत. तुकोबा म्हणाले, आमच्या घरी शब्दांचीच रत्ने आहेत, शब्दांचीच शस्त्र्ाs आहेत. शब्दांनीच आम्ही देवाची पूजा करू!

माझा मराठाचि बोलु कौतुकें ।

परि अमृतातेंहीं पैजासी जिंके ।

ऐसी अक्षरें रसिकें । मेळवीन ।। 6.14

ज्ञानदेव म्हणतात, आपण मराठी भाषेत भगवंताचे मनोगत व्यक्त करीत आहोत. त्यासाठी मी साहित्याची लेणी निर्माण करीन. माझी मराठी भाषा अमृताशी पैज जिंकील. माझ्या मराठीच्या कोवळीकेपुढे स्वरांचे रंग फिके पडतील. माझी मराठी भाषा रसाळ आहे. माझी भाषा ऐकण्यासाठी कानांना जिभा फुटतील. इंद्रियांत भांडण लागेल. शब्द हा विषय कोणाचा? तर कानांचा. पण रसना म्हणेल, हा तर माझा रस! नाक म्हणेल, हे शब्द किती सुगंधी आहेत. मी बोललेल्या शब्दरूप रेषेचे प्रवाह पाहून डोळे म्हणतील, हे शब्दलेणे रूपाची खाणच आहे. रसिकांना माझे शब्द आवडतील. रसिकांसाठी मी मराठीतच बोलेन. हे माझे केवळ शब्द नाहीत तर कैवल्यरसांची मिष्टान्ने वाढलेली ताटेच आहेत.

अभिप्राय मानलिया उचिता ।

कवण भूमी हें न चोजवे ।। 10.43

ही मायबोली मराठी अशी श्रीमंत असेल, अशी सुसंस्कृत असेल, की हा शांतरस शृंगार रसावर वरकडी करील. या ओव्या जणूं मराठी साहित्याचे भूषणच आहे. गीता हा मूळ ग्रंथ संस्कृत, त्यावरची ही मराठी टीका. पण गीता-ज्ञानेश्वरी जाणकारांना असा भ्रम पडेल की यातले मूळ कुठले? संस्कृत की मराठी? ज्ञानराज म्हणतात –

या कारणे मिया । गीतार्थ मऱहाठिया ।

केला लोका यया । दिठीचा विषो ।। 18-1735

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे नुसते श्रवणसुद्धा समाधीसुख मिळवून देईल. हा ग्रंथ पाठ केला तर पांडित्य सतेज होईल. या ग्रंथातील मराठी शब्दचातुर्याने लोक अत्यंत आनंदित व संतुष्ट होतील. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गुरुदेव निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभव आहे.

परी मऱहाटी बोल रंगे । कवळिता पै गीतांगे ।

तै गायताचेनि पांगे । येकाढता नोहे ।। 1836

माझ्या मराठी शब्दाच्या रंगाने जेव्हा गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृतभाषेत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात कमीपणा येणार नाही. माझ्या मराठी ओवीरूप शब्दांनी संस्कृतभाषेतील अर्थ स्पष्ट करील. मी संस्कृत गीतेचा अर्थ स्पष्टपणे मराठी भाषेत सांगितला आहे.

किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हे सिद्धी गेलें।

येथ माझे जी उरलें । पाईकपण ।। 18-1792

ज्ञानराज अत्यंत आनंदाने पण नम्रतेने सांगतात. हे गुरुराजा, आपण माझ्याकडून हे धर्मकीर्तन करून घेतले. हे धर्मकीर्तन तुमच्या आशीर्वादाने पूर्ण झाले. मी तर केवळ संतांचा सेवक आहे. ज्ञानदेवाची एकच इच्छा आहे. या ग्रंथाच्या पुण्याईनें सर्व जिवांना सतत सुखी ठेवावे. मराठी भाषेत भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा अजोड ग्रंथ लिहून मराठीभाषेला ऐश्वर्य व सामर्थ्यसंपन्न बनविणाऱया ज्ञानवीरांना विनम्र वंदन!

आपली प्रतिक्रिया द्या