तरुणाईचा परिसस्पर्श

876

>> क्षितिज झारापकर

खेळ खुळा’, ‘द बास्टर्ड पेट्रियट’, ‘भूमीही तीन एकांकिकांची नावं मराठी रंगभूमीवरील तरुणाईच्या जिवंत स्पंदनांची द्योतक आहेत.

आपली रंगभूमी ही आता केवळ शिवाजी मंदिर, गडकरीसारख्या नाटय़गृहांमध्ये होणाऱया गल्ल्याची गणितं सांभाळणारी राहिलेली नाही. ती या लिमिटेशन्सच्या बाहेर पडून बाळसं धरू लागली आहे. बोरिवलीत खुल्या बागेतील एम्फी थिएटरमध्ये अभिवाचनाचे प्रयोग विनामूल्य होतात. पार्ल्यात साठे कॉलेजच्या छोटय़ा नाटय़गृहात प्रायोगिक मराठी नाटकांचे शो नियमितपणे होत असतात, मुलुंडात नाटय़विषयक उपक्रम राबवले जातात, पुण्यात सुदर्शन रंगमंचाचं फोफावणारं व्यासपीठ उपलब्ध आहे, नुकतंच सोलापुरात 150 सीटचं वातानुकूलित दालन मराठी रंगकर्मींसाठी खुलं झालेलं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मराठी नाटय़प्रेमी प्रेक्षकांना अल्प खर्चात नाटय़कलेचा आस्वाद घेण्याचा योग. त्यात सध्या विविध एकांकिका स्पर्धांचा मोसम आहे. राज्यभरात विविध शहरांमधून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरतात. आज आपण तीन एकांकिकांचा आढावा घेत आहोत.

द बास्टर्ड पेट्रियट

the-bastard

राजरत्न भोजने लिखित ‘द बास्टर्ड पेट्रियट’ ही एका क्लिष्ट विषयावरची खरोखर लक्षवेधी एकांकिका आहे. एकतर वाङ्मयाला विज्ञानाचं वावगं मानलं जातं तिथे भोजने यांनी फ्रिट्झ हेबर या वैज्ञनिकावर एकांकिका योजावी हे कौतुकास्पद आहे. कथा साधारणतः दुसऱया महायुद्धाच्या काळातील आहे. लिखाणात कुठेही इतिहास वा विज्ञानाचा विपर्यास नाही आणि नाटय़ परिपूर्ण आहे. संकेत पाटील सोबत भोजनेंनी दिग्दर्शनात ही एकांकिका घटनाप्रधान आणि चपळ केलेली आहे. मराठी नाटकात पश्चिमात्य भाषा वापरण्याचा अट्टहास इथेही दिसतो. हेबर व त्याची पत्नी क्लारा जर्मन असून इंग्रजीत का बोलतात? आणि तेही अमेरीकन स्लॅन्ग इंग्रजीत !!! बरं हिंदुस्थानी नट इंग्रजी बोलताना उसना लेहजा का वापरतात? आर्नोल्ड श्वार्झनेगर सारखा नट झेकोस्लावकियन ढबीत इंग्रजी बोलून हॉलीवूडमध्ये सुपरस्टार होतो म्हणजेच त्यांना तुम्ही इंग्रजी कसं बोलता हे महत्त्वाचं नाही. पण या एका त्रुटीमुळे ‘द बास्टर्ड पेट्रियट’ अजिबात कमी लेखलं जाऊ शकत नाही. दिशा थिएटर्सच्या या नाटकात कर्माने योजलेली पोएटीक जस्टीस विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित केली गेलेली आहे. त्यासाठी लागणारा अभ्यास आणि संशोधन या टीमने पूर्णपणे केलेलं आहे. सिमरन या तरुण अभिनेत्रीने साकारलेली क्लारा कमालीची पोक्त किंवा या नाटकाच्या भाषेत मॅच्युअर्ड आहे. स्वतः भोजनेंचा हेबर योग्य तितका उत्कट आणि भावनिक झालाय. स्वानंद केतकरचा आईन्स्टाईन योग्य. सांघिक नाटकातले इतर सगळेच आपापलं काम यथायोग्य साकारतात.

नाटक ः द बास्टर्ड पेट्रियट आयोजक ः अमर हिंद मंडळ, दादर लेखक ः राजरत्न भोजने नेपथ्य ः तनया प्रकाश ः श्याम चव्हाण संगीत ः संकेत, प्रथमेश दिग्दर्शक ः संकेत पाटील कलाकार ः सिमरन, अनिकेत महाडिक, स्वानंद केतकर, राजरत्न भोजने दर्जा ः

 खेळ खुळा

khel-kjhula

अंतरंग थिएटर्स मुंबई यांची ही एकांकीका. लेखक रोहन पेडणेकर याने रुख्मिणी, राधा आणि कृष्ण हे रूपक वापरून ‘खेळ खुळा’ मध्ये एका चाळीतील निपुत्रिक निर्मलाची कहाणी सांगितली आहे. कहाणी खूप भावनिक आहे. भावनाप्रधान कथानकात अनाहुतपणे मेलोड्रामा डोकावतो. रोहनने इथे तो टाळण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. इथे लेखक जिंकतो. हल्लीच्या तरुण रंगकर्मीमध्ये मेलोड्रामा टाळण्याचा हट्ट दिसतो. कथानकाच्या गरजेप्रमाणे जॉनर असावा ही जाण दिसत नाही. रोहन पेडणेकरला यासाठी पूर्ण क्रेडिट द्यायला हवं. धनंजय पाटील आणि शेखर बेटकर या दिग्दर्शकांनी ‘खेळ खुळा’ उभी करताना बारीक बारीक जागा भरल्या आहेत. पहिल्याचं प्रवेशात मात्र महेश आई आणि बायकोला माधवीच्या अवस्थेबाबत न सांगता एक कृत्रिम सस्पेन्स का निर्माण करतो हे अनाकलनीय आहे. अनाकलनीयपणा प्रेक्षकांना पटवण्यासाठी कलाकारांना खूप सिन्सियरली ते सादर करावं लागतं असं अमिताभ बच्चन एका मुलाखतीत म्हणालेत. ‘खेळ खुळा’चे सगळे कलाकार कमालीच्या सिन्सिएरीटीने आपापली पात्रे साकारतात आणि इथे ‘खेळ खुळा’ जिंकत जातं. रश्मी तांबे, आशिष पवार आणि तृप्ती गावडे हे तीन मुख्य कलाकार हा भार लिलया पेलतात. प्राची पोकळेदेखील योग्य आवेश आणत साटमीण रंगवते. बाकीचे सर्व कलाकार उत्तम साथ देतात.

नाटक ः खेळ खुळा आयोजक ः अमर हिंद मंडळ, दादर लेखक ः रोहन पेडणेकर नेपथ्य ः प्रसाद गुरव संगीत ः निनाद म्हैसळकर दिग्दर्शक ः धनंजय पाटील, शेखर बेटकर कलाकार ः रश्मी तांबे, तृप्ती गावडे, रश्मी शेटय़े, प्राची पोकळे, प्राची मोहिते, रिद्धी म्हात्रे, कौस्तुभ कासार, अमेय परब, ओमकार शिंदे, आशीष पवार  दर्जा ः

भूमी

bhumi

साठे महाविद्यालयाने सादर केलेलं तब्बल चाळीसएक कलाकारांचं नाटक ‘भूमी’. ओरिसातील एक डोंगरमाथ्यावरील आदिवासी समूहाच्या समाजव्यवस्थेचं उर्वरित हिंदुस्थानच्या प्रगतीशी नातं सांगू पाहणारं कथानक. स्पर्धेचे सर्व ठोकताळे तंतोतंतपणे पाळून बांधलेलं हे नाटक. असं करण्यात गैर काहीच नाही. मार्केटिंगचा पहिला नियम आहे की, आपल्या टार्गेट कन्झ्युमर्सच्या आवडीनिवडी प्रमाणेच आपलं प्रॉडक्ट हवं. ‘भूमी’ हे साध्य केलं आहे. स्वप्नील चव्हाण लिखित आणि अभिजीत खाडे दिग्दर्शित ‘भूमी’ हे एक चोख प्रेझेन्टेशन आहे. यातील संगीत, नृत्य आणि वापरलेले प्रॉप्स सगळं प्रोफेशनल वाटतं. एक गोळीबंद परफॉर्मन्स आहे हा. यातील सोमा ही प्रमुख भूमिका करणारी दक्षता जोईल या मुलीचा चेहरा जबरदस्त बोलका आहे ज्याचा ती पुरेपूर वापर करते. शिवाय नाटकात वापरली गेलेली आदिवासी, ओरिया, बंगाली, मराठी आणि हिंदीमिश्रित एक वेगळीच बोलीभाषा खूप परिणामकारक ठरते. सचिन गजमल यांची नृत्यरचना अफाट आहे. तिचा दृष्य बदलण्यासाठी केलेला उपयोग तर खूपच सुंदर आहे. सर्व कलाकार मनापासून नाटक करतात.

नाटक ः भूमी  आयोजक ः अमर हिंद मंडळ, दादर लेखक ः स्वप्नील चव्हाण नेपथ्य ः अविनाश लाड प्रकाश ः राजेश शिंदे संगीत ः समीहन-स्वप्नील दिग्दर्शक ः अभिजीत खाडे कलाकार ः दक्षता जोईल, प्रतीक सावंत, ऋषिकेश जाधव, प्रणय जगताप, भावेश आयरे दर्जा ः

आपली प्रतिक्रिया द्या