आषाढस्य प्रथम दिवसे

199

– डॉ. आसावरी उदय बापट

‘आषाढ’ म्हटला की ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ’मेघदूत’ आठवतं. कालिदासाच्या या सर्वांगसुंदर साहित्यकृतीत निसर्गाबद्दलचं, अवघ्या सृष्टीबद्दलचं प्रेम ठायी ठायी जाणवत राहतं. कालिदासाच्या यक्षाला आषाढसरींचा शिडकावा घेत सुचलेलं हे प्रेमकाव्य म्हणजे मानवी हृदयातील प्रेमाचा आणि विरहवेदनेचा आविष्कारच.जगात विख्यात झालेल्या मेघदूतातील दुसऱ्या श्लोकातील,

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

या ओळीकडे विद्वानांचे लक्ष गेले. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीनुसार कालिदासांचं कार्य हेच महत्त्वाचं मानून विद्वानांनी कालिदास दिवस आषाढाच्या पहिल्या दिवशीच साजरा करायचं ठरवलं.यक्षांचा मुख्य कुबेराच्या शापामुळे प्रिय पत्नीचा विरह सहन करत मेघदूत या काव्यातील यक्ष रामगिरीवर एकेक दिवस कंठत आहे. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशा परिस्थितीत आषाढातील एखाद्या हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून यक्ष त्यालाच आपला संदेश वाहक करतो. मेघदूताची कथा काय आहे असं विचरलं तर दोन शब्दांत त्याचं उत्तर देता येईल-घराचा पत्ता. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला आपल्या घराचा पत्ता असंच मेघदूताचं स्वरूप आहे. पण एखादा पत्ता सिद्धहस्त कवीच्या मुखातून आला तर जगद्विख्यात होतो. एक अत्यंत सुंदर खंडकाव्य त्यातून जन्माला येतं जे साऱया जगाला वेडावून टाकतं.

यक्ष रामगिरीवर आणि त्याची पत्नी दूर हिमालयातील अलकेमधे. असह्य विरहातून मेघदूत हे काव्य जन्माला आलं. वियोग किंवा विरह हा कधीच चटकन न संपणारा. मेघदूत हे विरहकाव्य आणि त्यासाठी वापरलेलं वृत्त मंदाक्रांता. ‘मंदआक्रांत’ हळूहळू पुढे जातं ते मंदाक्रांता. शिवाय हे वृत्त प्रवास, पाऊस आणि करुण प्रसंगांचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. यक्षाची करुण वेदना, पाऊस देणारा मेघ आणि दौत्याच्या निमित्ताने मेघाचा प्रवास साऱया गोष्टी अगदी एकवटून आल्या असताना मंदाक्रांता वृत्ताशिवाय दुसऱ्या वृत्ताचा विचार कालिदासाच्या मनात कसा येईल?

मेघदूत काव्य मेघसंदेश याही नावाने ओळखले जाते. मेघदूतावर जवळपास ३५ टीका लिहिल्या गेल्या. भगवद्गीता आणि बायबलच्या खालोखाल टीका लिहीलं गेलेलं पुस्तक म्हणजे मेघदूत! दूतकाव्य लिहिणारा कालिदास हा पहिला कवी. त्याच्या या दूतकाव्याची मोहिनी एवढी मोठी की, त्यानंतर अनेक दूतकाव्यं लिहिली गेली, पण काव्यप्रतिभेत ती मेघदूताजवळसुद्धा पोचली नाहीत.

मेघाचा सारा मार्ग उंच आकाशातून जाताना दिसतो. अनेक ठिकाणी याची प्रचीती येते. मेघाच्या मार्गात सगळीकडे स्त्रीयांचे डोळे वर करून टाकलेले नेत्रकटाक्ष, उंचावरून वल्मीकाग्र म्हणजे वाळूरावर दिसणारं इंद्रधनुष्य, आम्रकूट किंवा कोणत्याही पर्वताच्या शिखरावर काही क्षण विश्रांती घेऊन पुढचा प्रवास, पांढऱयाशुभ्र नदीवर ओथंबून आलेला कृष्णमेघ मोत्याच्या सरातील नीलमण्याप्रमाणे भासणे हे चित्र फार उंचीवरून पाहिल्याशिवाय स्पष्ट होणार नाही. काव्यातील यांसारख्या संदर्भांवरून काही विद्वानांच्या मते कालिदासांनी हा सारा प्रवास विमानातून केला असावा तर काही लोकांच्या मते कालिदासांनी केवळ कल्पनेतून हा प्रवास केला असावा. कालिदास खरच विमानातून फिरला का? याविषयी सकृतदर्शनी अजून तरी कोणताही पुरावा उपलब्ध नाही. अर्थात त्यामुळे कालिदासांचं महत्त्व कुठेचं कमी होत नाही. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीला अनुसरून कालिदासांनी आकाशस्थ मेघाचा सारा प्रवास फार उंचावरून केला आहे. कोणी म्हणेल की त्यात काय मेघ आकाशात असल्याने त्याच्याकडे डोळे वर करूनच पाहावे लागेल किंवा मेघ पर्वतशिखरावर राहणार यातही काही विशेष नाही. अगदी बरोबर. पण मेघाला दिलेली मोत्याच्या सरातील नीलमण्याची उपमा ही फक्त अतिउंचावरूनच लक्षात येणारी गोष्ट आहे. त्यामुळे कालिदास प्रत्यक्ष विमानाने फिरला किंवा प्रतिभेच्या द्वारे आकाशगमन करून आला यातील काहीही झालं असलं तरी या प्रवासात ते कुठेही खाली आलेले दिसत नाहीत.

कृतघ्न होणं ही हिंदुस्थानी परंपरा नाही मग यक्ष त्याला अपवाद कसा असेल? रामगिरीपासून अलकेपर्यंत केवळ आपल्यासाठी प्रवास करत गेलेल्या या मेघाला त्याच्या महत्कार्याचं फळ म्हणून यक्ष आपल्या वाट्याला आलेल्या प्रिय पत्नी विद्युतच्या विरहाचं दुःख तुझ्या वाटय़ाला कधीही न यावे अशा शुभेच्छा देतो.

‘जे दुःख आपण भोगलं ते इतरांच्या वाट्याला न येवो’ असा विचार करणं हे हिंदुस्थानी संस्कृतीचे वैशिष्टय़! कालिदासांनी याच श्रेष्ठ विचाराने मेघदूत संपवलं आहे. स्वतःच्या वाट्याला आलेलं पत्नीविरहाचं दुःख मेघाच्या वाटय़ाला कधीही न येवो या सदिच्छेने मेघदूत हे काव्य संपतं. १११ श्लोक म्हणजे ४४४ चरणांचं मेघदूत संपत तेव्हा वाचकांच्याही मनात पाझरत जाणारी विरहातील वेदना अलगद शांतरसात परिवर्तित होते. पती-पत्नीतील एकनिष्ठ प्रेम पाहून वाचक एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतो. मेघाच्या मार्गाबरोबर आपणही एका वेगळ्या उंचीवर जातो. हा प्रवास असाच सुरू राहावा असं वाटत असतानाच काव्य संपत तेव्हा आपणही काव्यप्रतिभेच्या एका उच्च आनंदात रममाण झालेले असतो.

आपली प्रतिक्रिया द्या