मानसिक आरोग्य – सर्वाधिक आजारांचे मुख्य कारण

>> सीमा उपळेकर

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2030 पर्यंतच्या कार्यक्रमानुसार मानसिक आरोग्य हे सर्वाधिक आजारांचे मुख्य कारण असेल. आधीच आपल्याकडे ही सेवा देणाऱयांची प्रचंड कमतरता आहे. केवळ त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य मार्गदर्शकाच्या मराठी भाषांतराची पुस्तिका उपयुक्त आहे. याआधारे या क्षेत्रातील विशेष माहिती नसलेल्यांनाही प्रशिक्षण देऊन सक्षम करता येईल. त्यामुळे सामाजिक जाणीवही वाढीस लागेल अशी आशा आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस 1992 पासून साजरा होत आहे. यावर्षीचा मुख्य विषय ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य, अधिक गुंतवणूक, अधिक जागरूकता, मानसिक आरोग्य हा मानवी हक्क’ असा आहे. दुर्दैवाने आज 28 वर्षांनंतरही मानसिक आरोग्य सुविधा, जागरूकता यात अपेक्षित प्रगती झालेली नाही. गरज आहे यात झपाटय़ाने वाढ होण्याची.

हिंदुस्थानात राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम (NMHP) 1982 पासून सुरू झालेला आहे. तसेच 1996 मध्ये यात जिल्हा मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम जोडला आहे. सन 2003 मध्ये राज्य मानसिक रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि सरकारी मेडिकल कॉलेज / सामान्य रुग्णालयातील सद्य मन चिकित्सा विभागाची सुधारणा, उन्नतीकरण करण्याचे ठरले. सन 2009 पासून जनशक्ती विकास योजनाही या उपक्रमाशी जोडली गेली. या उपक्रमातील तीन मुख्य घटक पुढीलप्रमाणे – 1) मानसिक विकारांनी पीडित व्यक्तीस उपचार 2) पुनर्वसन आणि 3) मानसिक आरोग्य नियंत्रण आणि प्रोत्साहन. या उपक्रमाचा उद्देश, ध्येय आणि योजना उत्तम आहे. परंतु योग्य अंमलबजावणी होत नाही याची खंत आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनी दरवर्षी वेगवेगळ्या मुख्य विषयांवर भर दिला जातो. तरीही इतर विषय दुर्लक्षून चालणार नाहीत. कारण सगळेच घटक सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय खरंच परिपूर्ण आयुष्य जगता येणार नाही. आपले शरीर म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे. ज्या चांगल्या, वाईट भावना आपल्या मनात येतात त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. अनेक म्हणी याचा प्रत्यय देतात. जशा ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ (काळजी), ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ (भीती), ‘खाई त्याला खवखवे’, ‘अर्धा वैद्य मरणास खाद्य’ (अज्ञान) इत्यादी.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य मार्गदर्शकाच्या दुसऱया आवृत्तीचे मी मराठीत भाषांतर केले आहे. यात औदासीन्य (Depression), मनोदुर्दशा (Psychosis) , अपस्मार (Epilepsy), लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांचे मानसिक आणि वर्तणूक आजार (Child Mental Health), अवमनस्कता (Dementia), अंमली द्रव्य सक्तीमुळे उद्भवणारे विकार (Substance Abuse), आत्महत्या (Suicide) आणि इतर लक्षणीय मानसिक आरोग्य तक्रारी (Other) यांचा समावेश आहे. तसेच मूलभूत काळजी आणि प्रत्यक्ष कृती हे मार्गदर्शन कसे अंमलात आणावे आणि स्पष्टीकरणकोष हे देखील आहे.

विशेष गटासाठी – लहान आणि पौगंडावस्थेतील मुले, गर्भधारणा करू शकणाऱया स्त्रिया आणि वयस्कर व्यक्तींसाठी विशेष सूचना आणि घ्यावयाची काळजी याचा समावेश आहे. काळजी वाहकांची काळजी कशी घ्यावी असेही महत्त्वाचे स्पष्टीकरण आहे. विश्रांतीकरिता प्राणायाम कसा करावा याची माहिती आहे.

महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 11 कोटी 60लाख आहे. मी प्रथम राज्य मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे उपनिर्देशक, आरोग्य आयुक्त आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी प्रयत्नांचे कौतुक केले आणि 1645 प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC, 2014) आणि 11 लाख आरोग्य कर्मचारी, ज्यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते, त्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल याची आवश्यकता मान्य केली. मला ऑक्टोबर 2018 मध्ये एमएच प्रशिक्षणात भाग घेतलेल्या 20 जिह्यांतील मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांना मार्गदर्शक पुस्तिका सादर करण्याची संधी देण्यात आली. उपस्थित प्रत्येकाने अनुवादाचे कौतुक केले आणि ते क्षेत्रात उपयुक्त ठरेल अशी भावना व्यक्त केली. मुंबई आणि पुण्यात कमीत कमी 20 एनजीओजशी संपर्क साधला आहे आणि 50 हून अधिक मानसोपचार तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांना भेटले आहे. प्रत्येकाने सकारात्मक प्रतिसाद दिला. mhgap लोकप्रिय करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

खासगी डॉक्टर हे हिंदुस्थानातील आरोग्य यंत्रणेचा मुख्य आधार आहेत आणि आरोग्य सेवा शोधणाऱया बहुतेक लोकांचा पहिला थांबा आहे. मी बऱयाच खासगी व्यावसायिकांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना मार्गदर्शक वापरण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्याची विनंती केली आहे, जेथे गरीब रुग्णांना सेवा देतात अशा ज्ञात स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठानांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश आहे.

शैक्षणिक जगाला गुंतवण्यासाठी मी मानसशास्त्र आणि नैदानिक मानसशास्त्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना स्त्राsत मार्गदर्शक म्हणून वापरण्यासाठी विद्यापीठांकडे संपर्क साधला आहे. ब्राझीलमध्ये वैद्यकयी विद्यार्थ्यांना इंग्रजीत याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच पोर्तुगालमध्ये आरोग्य सेविकांना प्रशिक्षण दिले आहे.

मला असे वाटते की आरोग्य मंत्रालय आणि डब्ल्यूएचओचे देशातील कार्यालय यासह सर्व संबंधित घटकांचे मोठे समर्थन आणि गुंतवणूकीमुळे समाजातील गरजू भागांमध्ये एमएचजीपीआयजी प्रसारित करणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात फरक पडण्यासाठी ते व्यवहारात वापरणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनामुळे एक सकारात्मक बदल झाला आहे. सामान्य माणसे मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाली आहेत. कुटुंबात जवळीक निर्माण झाली आहे. हरवलेले संभाषण परत सुरू झाले आहे. मुले थोडीशी तणावमुक्त झाली आहेत. सर्वांना या विषयांचे गांभीर्य लक्षात आले आहे. यामुळे निश्चितच भविष्यकाळात सर्वांच्या मनाची काळजी घेतली जाईल अशी खात्री आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2030 पर्यंतच्या कार्यक्रमानुसार मानसिक आरोग्य हे सर्वाधिक आजारांचे मुख्य कारण असेल. आधीच आपल्याकडे ही सेवा देणाऱयांची प्रचंड कमतरता आहे. केवळ त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य मार्गदर्शकाच्या मराठी भाषांतराची पुस्तिका उपयुक्त आहे. याआधारे या क्षेत्रातील विशेष माहिती नसलेल्यांनाही प्रशिक्षण देऊन सक्षम करता येईल. त्यामुळे सामाजिक जाणीवही वाढीस लागेल अशी आशा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य विषय

वर्ष मुख्य विषय

 • 2019 मानसिक आरोग्य प्रोत्साहन आणि आत्महत्या प्रतिबंध
 • 2018 बदलत्या जगात तरुण लोक आणि मानसिक आरोग्य
 • 2017 कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य
 • 2016 मानस शास्त्रीय प्रथमोपचार
 • 2015 मानसिक आरोग्यामधील सन्मान
 • 2014 स्किझोफ्रेनियासह जगणारे
 • 2013 मानसिक आरोग्य आणि वृद्ध प्रौढ
 • 2012 औदासीन्यंः एक जागतिक संकट
 • 2011 उत्तम प्रेरणाः मानसिक आरोग्यात गुंतवणूक
 • 2010 मानसिक आरोग्य आणि तीव्र शारीरिक आजार
 • 2009 प्राथमिक आरोग्यामध्ये मानसिक आरोग्यः उपचार वाढवणे आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देणे
 • 2008 मानसिक आरोग्यास जागतिक अग्रक्रम बनविणेः नागरिकांच्या समर्थनाने मानसिक आरोग्य सुविधांतवाढ करणे
 • 2007 बदलत्या जगातील मानसिक आरोग्यः संस्कृती आणि विविधतेचा प्रभाव
 • 2006 जागरूकता वाढवणे – जोखीम कमी करणेः मानसिक आजार व आत्महत्या
 • 2005 संपूर्ण जीवन अवधीतशारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी
 • 2004 शारीरिक आणि मानसिक आरोग्यामधील सहवर्ती विकार
 • 2003 मुले आणि पौगंडावस्थेतील भावनात्मक आणि वर्तणूक विकार
 • 2002 मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांवर आघात आणि हिंसाचाराचे परिणाम
 • 2000-01मानसिक आरोग्य आणि कार्य
 • 1999 मानसिक आरोग्य आणि वृद्धत्व
 • 1998 मानसिक आरोग्य आणि मानवी हक्क
 • 1997 मुले आणि मानसिक आरोग्य
 • 1996 महिला आणि मानसिक आरोग्य
आपली प्रतिक्रिया द्या