स्वप्नरंजनाची चार वर्षे!

narendra-modi

>> नीलेश कुलकर्णी
nileshkumarkulkarni@gmail.com

केंद्रातील मोदी सरकारच्या चार वर्षांत जनतेला किती ‘अच्छे दिन’ आले हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षांनी या चार वर्षांतील कारभाराबाबत अपेक्षेनुसार टीका केली आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह सत्ताधारी भाजप ‘कामां’चे ढोल पिटत आहे. या सरकारच्या आजवरच्या कार्यपद्धतीला अनुसरूनच हे सुरू आहे. एकापाठोपाठ एक स्वप्ने दाखवत जनतेला त्यात गुंगवून ठेवायचे या एकसूत्री पद्धतीने विद्यमान केंद्र सरकारची स्वप्नरंजनाची चार वर्षे सरली आहेत. पाचव्या वर्षात जनतेला काय मिळते आणि जनता सरकारला काय देते हे लोकसभा निवडणुकीनंतर कळेलच.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी प्रचारात आणि नंतर प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर अनेक आश्वासनांचा माराच पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाने देशवासीयांवर केला. मात्र त्यातील अनेक गोष्टी अपुऱ्याच राहिल्या आहेत. शिवाय प्रचारात दिलेली आश्वासने कशी अवाच्या सवा होती याचे भानही सत्तेत बसल्यावर भाजपला आले. तथापी जाहिरातबाजीच्या माध्यमातून जनतेला भ्रमित करण्याचे आणि स्वप्नांच्या दुनियेत ठेवण्याचे उद्योग थांबलेले नाहीत. ते सुरूच आहेत. या चार वर्षांत कामांपेक्षा जाहिरातींचा, न्यू इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट ऑफ इंडिया, डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, देश बदल रहा है, नमामी गंगे, स्वच्छ हिंदुस्थान, अशी अनेक विशेषणे आणि नोटाबंदी, जीएसटी अशा धक्कादायक निर्णयांचा माराच जास्त झाला आहे. भाजपला जर ही सर्व त्यांच्या सरकारची कामगिरी आणि कर्तबगारी वाटत असेल तर त्याचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः एखादी पत्रकार परिषद का घेतली नाही आणि जनतेसमोर आपल्या सरकारचा ताळेबंद का मांडला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र त्यांनी आपल्या ऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याची जबाबदारी सोपवली, यातच सगळे काही आले. जनतेची मती भ्रमित करायची असेल तर त्यांच्यावर एकामागोमाग एक स्वप्नांचा मारा करा असा शिरस्ता मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत इमानेइतबारे राबविला आहे. त्यामुळे भाजप वगळता पूर्ण देश ‘बुरे दिन’ ची अनुभूती घेतो आहे. पाकिस्तानी सैन्याने पवित्र रमजानमध्येच घुसखोरी करून आपले शेपूट वाकडेच असल्याचे आणि नोटाबंदीनंतर दहशतवाद संपला अशा आरोळ्य़ा ठोकणाऱ्यांचे अपयश उघड केले आहे. संरक्षणासह, आरोग्य, कायदा-सुव्यवस्था या कोणत्याही क्षेत्रांत नाव घ्यावे अशी कामगिरी मोदी सरकारच्या खाती जमा नाही. आयबी, रॉसारख्या यंत्रणा गाठीशी असताना आणि अजित डोवालांसारखे ‘सल्लागार’ असतानाही हिंदुस्थानच्या सर्व सीमा कधी नव्हे इतक्या अशांत आहेत. उद्या भूतानसारख्या किरकोळ देशानेही आपल्याला वाकुल्या दाखविल्या तर आश्चर्य वाटायला नको. यूपीए सरकार मुर्दाड, अकार्यक्षम आणि भ्रष्ट होते म्हणूनच हिंदुस्थानने त्या सरकारची गठडी वळून ती यमुनेत विसर्जित केली होती, मात्र गेल्या चार वर्षांत देशाने कोणता चांगला फील अनुभवला याचे उत्तर मोदी सरकारला द्यावे लागणार आहे. हजारो कोटी खर्चून ‘देश बदल रहा है’ अशा जाहिराती देणे सोपे आहे, पण देशात प्रत्यक्ष काय बदल झाला हे भाषणांऐवजी पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेतून सांगावे एवढीच देशवासीयांची माफक अपेक्षा आहे.

बाप बाप होता है..!

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी आणि परमेश्वरा यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार अखेर सत्तेवर आले. या ‘धर्मनिरपेक्ष’ जोडीला ‘नांदा सौख्य भरे’ (भाजपची नजर न लागता) असा शुभाशीर्वाद देण्यासाठी देशभरातून प्रमुख विरोधी नेते आले होते. अर्थात कर्नाटकच्या सत्तांतराचे संयुक्तपणे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले ते माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा आणि सोनिया गांधी. त्यामुळे या सोहळ्य़ाचे आकर्षणबिंदूही हे दोघेच होते. कुमारस्वामी यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवून देवगौडा यांनी आपलेच एकेकाळचे पट्टशिष्य असलेल्या सिद्धरामय्यांचा हिशेब चुकता केल्याची भावना राजकीय वर्तुळात आहे. कुमारस्वामी जेव्हा देवगौडांचे राजकीय वारसदार ठरले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा या पक्षात कधीच पूर्ण होणार नाही याचा अंदाज सिद्धरामय्यांना आला आणि त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. पुढे सिद्धरामय्यांच्या नशिबाने जबरदस्त उसळी मारली की सुरुवातीला उपमुख्यमंत्री व नंतर थेट मुख्यमंत्री, तेही दणदणीतपणे पाच वर्षे, अशी किमया सिद्धरामय्या यांनी करून दाखविली. मात्र हे करताना एकेकाळी ज्यांच्याकडून आपण राजकारणाची बाराखडी शिकलो आणि ज्यांनी आपल्याला राजकारणात संधी दिली त्या देवगौडांशी सिद्धरामय्यांनी आकसाचे राजकारण केले. माजी पंतप्रधान म्हणून देवगौडा हे कर्नाटकच्या अभिमानानेच प्रतीक असणे साहजिकच आहे. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयात देवगौडांची तसबीर लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर भाजपच्या येडियुरप्पा, सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर या मुख्यमंत्र्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत कर्नाटक प्राइड म्हणून देवगौडांच्या तसबिरीला हात घातला नाही, मात्र सिद्धरामय्यांनी या तसबिरी हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच दिले. त्यामुळे देवगौडा खट्टू झाले खरे, मात्र त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधीच केली नाही. कर्नाटकातील सत्तेपासून सिद्धरामय्या आणि त्यांच्या चिरंजीवाला दूर राखत देवगौडांनी राजकारणात ‘बाप बाप होता है’ हे सप्रमाण सिद्ध केले आहे त्याचबरोबर आपल्या तसबिरींवरची धूळ झटकून त्या भिंतीवर लावण्याचा मार्गही प्रशस्त करून घेतला आहे.

प्रशासनाचे ‘फेफरे..’

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील बाबूगिरीची खाबूगिरी संपली आणि प्रशासन सुतासारखे सरळ झाल्याचे दाखले गाजावाजा करून दिले जात होते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी मनमोहन सिंग सत्तेवर असताना कसे गोल्फ खेळायला जायचे, आता त्यांना माना मोडेस्तोवर काम करावे लागते अशा कथा मीडियात पेरल्या गेल्या. मात्र प्रशासनाची ‘स्टीलफ्रेम’ काही मोदी सरकारला भेदता आलेली नाही. अधिकारी कामच ऐकत नाही अशी ओरड सरकारमधील उच्चपदस्थांना करावी लागते यातच सगळे आले. त्यात पंतप्रधान व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरात राज्यातील एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे संबंध सरकारला ‘फेफरे’ येईल अशी परिस्थिती आहे. दीर्घकाळ रजेवर गेलेल्या रमेशचंद्र फेफर नावाच्या गुजराती अधिकाऱ्याने आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की असून आपल्यामुळे गेल्या १९ वर्षांत देशांत उत्तम पाऊस पडत असल्याचा दावा केला आहे. ‘दैवी अवतार’ असल्यामुळे ‘साधने’साठी वेळ हवा म्हणून सुट्टी घेतल्याचा खुलासा फेफर महाशयांनी केला आहे. जग सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आपण तपश्चर्या करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जाहिरातींद्वारे ‘अच्छे दिन’ जनतेला दाखविण्यापेक्षा मोदी व अमितभाईंनी आपल्याच राज्यातील या कल्की अवताराची मदत घेऊन किंवा त्यांना हायर करून जनतेला खरोखरचे ‘अच्छे दिन’ दाखवायला काय हरकत आहे, असा खोचक सल्ला यानिमित्ताने दिला जात आहे!