चलतचित्रांची प्रतिसृष्टी

24

>>दिलीप जोशी<<

[email protected]

दृकश्राव्य माध्यम असं सिनेमाचं वर्णन केलं जातं. यापैकी ‘श्राव्य’ म्हणजे ऐकण्याचं माध्यम फार पूर्वीपासून उपलब्ध होतं. पाठांतर करून गाणं म्हणणं किंवा भाषण, प्रवचन देणं या उच्चारी माध्यमाचा आस्वाद घेणारे ‘श्रोते’ होते. म्हणजे कुणाचे तरी शब्द ते श्रवण करत होते. नंतर कीर्तन, नाटक वगैरे कलाविष्कार आले ते प्रेक्षणीयही होते. त्यासाठी गर्दी करणारे प्रेक्षक बनले. थोडक्यात दृक् किंवा श्राव्य प्रकाराने आविष्कार यंत्रयुगाच्या आधीही होतच होते. फोटोग्राफीचा शोध लागल्यावर चित्राच्या जागी यंत्रच माणसाची हुबेहूब प्रतिमा फिल्मबद्ध करू लागलं. उत्तर पेशवाईच्या काळात ‘छाया-प्रकाश धरून चित्र काढण्याचा खोका’ म्हणजे कॅमेरा घेऊन येणाऱ्या प्रवाशांचं वर्णन आहे. अर्थात त्यावेळची फोटोग्राफी बाल्यावस्थेत होती.

कालांतराने या माध्यमात प्रगती होऊ लागली आणि अनेक फ्रेम जोडून वेगाने फिरवल्या तर पडद्यावर हालचाल दिसू शकते याचा ‘शोध’ लागला. कुमिए या फ्रेंच फोटोग्राफरने एक माळी बागेत झाडांना पाणी देत असतानाची ‘फिल्म’ केली. पॅरिसच्या रेल्वे स्टेशनात येणाऱ्या ट्रेनची पडद्यावरची गती पाहून प्रेक्षक भीतीने पळत सुटले! दरम्यान, कोणताही ध्वनीसुद्धा ‘मुद्रित’ करण्याचा शोध एडिसनने लावला होता. या दोन्हींची सांगड  घालून दृश्राव्य माध्यमाची प्रगती सुरू झाली.

मात्र चलत चित्रांची कल्पना अनेकांनी पूर्वीही केली होती. रशियात एका सरोवराकाठीची शिल्पं पाण्याच्या लहरींमुळे ‘चलत’ असण्याचा भ्रम निर्माण करत. आपल्याकडे कल्याण येथील पटवर्धन कुटुंबाने तर ‘शांबरिक खरोलिका’ म्हणजे ‘जादूचा दिवा’ बनवून काचेवर चितारलेल्या रंगीत चित्रांचे ‘सिनेमा’ वाटावा अशा कौशल्याचे ‘खेळ’ हिंदुस्थानभर केले. त्यांच्या त्या ‘शांबरिक खरोलिका’चा प्रयोग १९८०च्या काळात ‘ग्रंथाली’ने आयोजित केला होता.

फिल्मवर घटना नोंदणं शक्य झाल्यावर दृश्राव्य माध्यमाला प्रगत स्वरूप येऊ लागलं. सुरुवातीला फिल्मवरच्या दृक्माध्यमात आवाजाच्या ‘श्राव्य’ माध्यमाचा समावेश नव्हता. एका बाजूला चित्रपट पडद्यावर दाखवला जात असताना बाजूला त्यातील संवादाची रेकॉर्ड लावली जायची. अनेकदा ऍक्शन आणि आवाजाची एकरूपता (सिक्रोनायझेशन) होत नसल्याने लिप मूव्हमेन्टस् आणि आवाजात विसंवाद निर्माण व्हायचा; परंतु हे माध्यमच नवीन असल्याने प्रेक्षक-श्रोत्यांनाही काही कळत नसे. पडद्यावरची माणसं बोलतात याचंच त्यांना आश्चर्य वाटायचं.

यासंदर्भात वाचलेली एक गोष्ट आठवते. १९१८ मध्ये लोकमान्य टिळकांची फिल्म पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये दाखवल्याचा उल्लेख केव्हातरी वाचनात आला होता. पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी योग्य उपचार करून घेण्याचं आवाहन लोकमान्यांनी केलं तरच लोक ऐकतील असं इंग्रज सरकारला वाटलं. फिल्म तयार झाली. पण तो मूकपटांचा जमाना असल्याने फिल्म सुरू होताच बाजूला सिलिन्ड्रिकल (बांगडी) रेकॉर्डवर लोकमान्यांचा आवाज लावला जायचा. आता फिल्म आणि रेकॉर्ड कुठे असेल? शोध घ्यायला हवा.

तर अशा सामाजिक कामापासून हे मनोरंजनापर्यंत सर्वच बाबतीत चित्रपटाचं दृश्राव्य माध्यम उपयुक्त ठरू लागलं. दादासाहेब फाळके यांनी विविध ठिकाणी चित्रीकरण करून सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेनुसार ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट १९१३ मध्ये बनवला. म्हणून त्यांना चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात; परंतु त्याआधी भक्त पुंडलिक नाटकाचं चित्रीकरण दादासाहेब तोरणे यांनी केलं होतं. सावेदादा (भाटवडेकर) यांनी १९०१ मध्ये रँग्लर परांजपे यांच्यावर माहितीपट बनवला होता. १८९६ मध्ये ‘गंगाघाट’ हे चित्रण झालं होतं. या सर्वांचं योगदान फाळके यांच्याइतकंच महत्त्वाचं आहे.

काळाचा चित्रपट पुढे सरकला. सिनेमा मूकपट होता तो बोलपट झाला. फिल्मवर ‘साउंड ट्रक’ नोंदण्याची सोय झाल्याने अभिनय आणि आवाजातला विसंवाद गेला. चित्रांची चलत गती वैज्ञानिक अभ्यासाने नैसर्गिक वाटावी अशी (सेकंदाला २४ फ्रेम) ठरली. सिनेमा ‘खरा’ वाटू लागला. पाश्चात्त्य जगात फोटोग्राफी, चित्रपट निर्मिती, रेल्वे, तारायंत्र, मोटारींचं वेगवान यंत्रयुग सुरू झालं आणि थोडय़ाच काळात ते हिंदुस्थानात अवतरलं. दृश्राव्य माध्यमाने तर हिंदुस्थानात इतकी प्रगती केली. हिंदुस्थानी सिनेसृष्टी विविध भाषांमध्ये चित्रपट बनवणारी जगातली मोठी सिनेसृष्टी ठरली.

मागील महिन्यात म्हणजे २७ ऑक्टोबरला जागतिक ‘ऑडियो-व्हिज्युअल हेरिटेज’ दिवस होता. आपल्या देशातील दृश्राव्य ‘हेरिटेज’ म्हणजे वारसा खूप मोठा आहे. अत्यंत भावस्पर्शी असे चित्रपट देशात तयार झाले आहेत. हॉलीवूडचं तंत्रज्ञान आजही बरंच पुढे असलं तर कल्पकतेने दृश्राव्य सादरीकरण करणाऱ्यांना ते उपलब्ध होऊ शकते. सिनेमाचा उद्योग एकूणच खर्चिक. पण प्रभावी कथा-दिग्दर्शन, अभिनय आणि फोटोग्राफीचा मेळ साधून बनवलेले चित्रपट ‘सैराट’ चालतात. हे दृश्राव्य माध्यमही मानवनिर्मित प्रतिसृष्टी आहे. सहाजिकच त्यात बऱ्या-वाईटाची सरमिसळ आहे. चोखंदळ प्रेक्षकाने आपला मार्ग तारतम्याने निवडायचा आहे. त्यासाठी प्रेक्षकाचं प्रबोधन जितकं जास्त होईल तितका या माध्यमाला खरा न्याय मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या