महाराष्ट्राचे मानकरी

  • सतीश पितळे

मुंबई आणि महाराष्ट्र यांचा जसा अविभाज्य संबंध आहे तसाच मुंबई आणि पुण्यश्लोक नामदार नाना शंकरशेट यांचाही आहे. या जोडय़ा एकमेकांना पूरक होऊन राहिलेल्या आहेत. नाना शंकरशेट हे मुंबईचे आद्यशिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक. त्यांनी मुंबई शहराच्या व शहरवासीयांच्या विकासासाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक सुधारणांचा खंबीर पाया घातला.

मुंबईत सार्वजनिक जीवनाचा व लोककल्याणकारी अशा अनेकविध सुधारणांचा व उपक्रमांचा पाया निर्माण करण्यात नाना शंकरशेट व त्यावेळचे राज्यपाल माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबईत उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ एल्फिन्स्टन शिक्षण संस्थेद्वारे रोवली गेली. त्यांच्या प्रयत्नांतून एल्फिन्स्टन महाविद्यालय या नामवंत व आदर्श शिक्षणसंस्थेचा जन्म झाला.

मुंबईचे वैभव चारही बाजूंनी वृद्धिंगत झाले पाहिजे यासाठी नाना शंकरशेट जीवनभर परोपरीने झटत होते. या प्रयत्नांतूनच मुंबईत ते ठाणे हा पहिला रेल्वेमार्ग सुरू झाला. युरोप-अमेरिकेत आगगाड्या सुरू झाल्यामुळे जनतेच्या कल्याणात व धंद्यात कसकशी भर पडत चालली आहे याचा अभ्यास नाना करीत होते. १८४३च्या सुमारास आगगाडीची कल्पना प्रामुख्याने पुढे आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या कंपनीच्या प्रवर्तकांत नाना शंकरशेट व त्यांचे सहकारी जमशेटशी जीजीभॉय होते. इंग्रज सरकार खरे तर कलकत्त्यात रेल्वे सुरू करण्याच्या मानसिक स्थितीत होते परंतु नाना शंकरशेट यांच्यापुढे नमते घेऊन मुंबईची निवड करण्यात आली.

हिंदुस्थानात लोहमार्गाची योजना पद्धतशीरपणे आखून ती सुरू करण्याचे, अर्थात मुंबई ते ठाणे हा २१ मैलांचा पहिलावहिला लोहमार्ग जनतेसाठी खुला करण्याचे भाग्य मुंबानगरीच्या वाट्याला आले. या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रेल्वे कंपनीचा हिंदुस्थानातील कारभार चालविण्यासाठी नेमलेल्या डायरेक्टर बोर्डात नाना शंकरशेट यांचे स्थान होते. त्या काळात १८५० साली या रेल्वे कंपनीची एक महत्त्वाची कचेरी नाना शंकरशेट यांच्या ठाकूरद्वार येथील वाड्यात थाटण्यात आली. एवढ्यावरून या अभिनव उपक्रमाशी नाना शंकरशेट कसे जोडले होते याची कल्पना येते.

मुंबई ते ठाणे या लोहमार्गाची आखणी व इतर कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग तयार करण्याची सुरुवात तारीख ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे करण्यात आली. याप्रसंगी कंपनीचे डायरेक्टर नाना शंकरशेट, कसेंटजी जमशेटजी तसेच इतर बडे अधिकारी आवर्जून उपस्थित होते. आणि तो ऐतिहासिक दिन उगवला. तो दिवस म्हणजे शनिवार तारीख १६ एप्रिल १८५३ या दिवशी पश्चिम हिंदुस्थानातील लोकांनी देशाच्या उन्नतीची चुणूक बघितली. मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू होऊन हिंदुस्थानात अभूतपूर्व सुधारणा घडली.

पहिली गाडी बोरीबंदर स्टेशनातून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुटली. या गाडीला १८ डबे व तीन इंजिने जोडण्यात आली होती. नामदार नाना शंकरशेट यांच्या अथक प्रयत्नातून ही गाडी मूर्तस्वरूपात धावणार होती व त्याचे श्रेय इंग्रज सरकारने उदारपणे नाना शंकरशेट यांना दिले. गाडीचा पहिला प्रवास हा नानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुंबई ते ठाणे हा अवघा २०-२१ मैलांचा लोहमार्ग! कशाला त्याचे एवढे कौतुक करावयाचे? त्याला कारणे अनेक होती. खरोखर या घटनेचे व ही घटना यशस्वी व्हावी म्हणून नामदार नाना शंकरशेट यांच्यासारख्या पुढाऱ्यांनी त्या काळी जो पुढाकार घेतला त्याचे कौतुक अलौकिक आहे. प्रथमच स्थापन झालेल्या या कंपनीच्या पहिल्यावहिल्या २० मैल लोहमार्गाने गेल्या १५० वर्षाच्या काळात संपूर्ण देशभरात रेल्वेचे जाळे पसरविण्यापर्यंत मजल मारली. आज हीच रेल्वे मुंबईकरांची जीवनवाहिनी बनली आहे.

रेल्वेच्या जन्मापासून तिची जडणघडण नानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली होत राहिली. कंपनीला जागेची अडचण भासली असता नानांनी आपल्या वाड्यात कंपनीला आश्रय दिला. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना कंपनीचे पहिले महाराष्ट्रीय डायरेक्टर होण्याचा मान मिळाला. बोरीबंदरसारखी प्रासादतूल्य स्टेशने या कंपनीने उभारली. बोरीबंदर स्टेशनच्या इमारतीच्या दर्शनी भागावर कंपनीच्या पहिल्या डायरेक्टरांचे अर्धपुतळे कायमचे बसविण्यात आले आहेत त्यात नामदार नाना शंकरशेट यांचाही अर्धपुतळा (बस्ट) आपणास पाहावयास मिळतो. अशा रीतीने या पहिल्या मार्गदर्शकाचे चिरंतन स्मारक कंपनीने व तत्कालीन इंग्रज सरकारने करून ठेवले आहे. पहिली १२ वर्षे म्हणजे १८५३ ते १८६५ पर्यंत रेल्वे कंपनीचा कारभार स्थानिक डायरेक्टर बोर्डाच्या नेतृत्वाखाली व संमतीने चालत असे. हा नानांचा काळ. याच महत्त्वाच्या काळात भोर व थळ घाटासारख्या अनुल्लंघनीय व अवघड घाटातून आगगाडी नेण्याची आश्चर्यकारक कर्तबगारी कंपनीच्या स्थापत्य शास्त्रज्ञांनी करून दाखविली. आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत रेल्वेची वाढ झपाट्याने होत असलेली त्यांनी पाहिली. त्यामुळे व्यापार व उद्योगधंद्यांना ऊर्जितावस्था आली. रेल्वेचे आद्यसंस्थापक व पहिले डायरेक्टर या नात्याने कंपनीत त्यांचा दर्जा व मानमरातब फार मोठा होता. मुंबईला प्राप्त झालेल्या आजच्या वैभवाचे प्रमुख कारण म्हणजे १५० वर्षांपूर्वी सुरू झालेली रेल्वेची सुविधा.
देशातील जनतेच्या उन्नतीचा त्यांना अतोनात ध्यास घेतलेल्या नानांनी त्या काळात दळणवळण व वाहतुकीसाठी देशात रेल्वे सुरू करण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. त्यामुळे मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी म्हणून जगभर प्रसिद्ध पावली. यानिमित्त मुंबईचे आद्यशिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक यांच्या कर्तृत्वाचा आदर करायलाच हवा.

(लेखक हे नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे एक विश्वस्त आहेत.)
sameerbapu@gmail.com